ध्यानबदरी : हिमालयातील पंचबदरींपैकी एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र. उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात, बद्रीनाथाला जाताना जोशीमठाच्या अलीकडे सु. ११ किमी. कुम्हारचट्टी किंवा हेलंगचट्टी आहे. तेथून अलकनंदेच्या डाव्या काठाने सु. २·५ किमी. उतरून गेल्यावर लागणाऱ्या पुलापलीकडे ६·५ किमी.वर उर्गम गाव आहे. तेथे गर्द झाडीत पंचकेदारांपैकी कल्पेश्वर महादेवाचे मंदिर असून जवळच ध्यानबदरीचे देवालय आहे. तेथे दुर्वासाच्या शापाने पीडलेल्या देवतांनी तपश्चर्या केली, असे सांगतात.
सावंत, प्र. रा.