‘धूमकेतु’– गौरीशंकर गोवर्धनराम जोशी : (१२ डिसेंबर १८९२–११ मार्च १९६५). प्रख्यात गुजराती कथाकार व कादंबरीकार. ‘धूमकेतु’ ह्या नावानेच ते विशेष प्रसिद्ध आहेत. कथा, कांदबरी, नाटक, निबंध, आत्मचरित्र इ. विविध साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले असले, तरी कथाकार म्हणूनच त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचा जन्म सौराष्ट्रात वीरपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून बी.ए. झाल्यावर त्यांनी शिक्षकाचा पेशा पतकरला. साहित्य अकादेमीचेही ते काही काळ (१९५७-५८) सदस्य होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची संख्या सत्तरावर आहे. आधुनिक तंत्राचा अवलंब करून अनेक सुंदर लघुकथा धूमकेतूंनी लिहिल्या व गुजरातीतील सर्वश्रेष्ठ कथालेखक म्हणून स्वतःचे स्थान सिद्ध केले. तणखा (४ भाग, १९२६–३६), अवशेष (१९३२), प्रदीप (१९३३), आकाशदीप (१९४७) यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या ‘पोस्ट ऑफिस’ ह्या कथेला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. त्यांच्या सात उत्कृष्ट कथांचा संग्रह सप्तपर्ण नावाने तसेच पाटणपति (१९७३) ही कादंबरीही हिंदीत भाषांतरित झाली आहे. धूमकेतूंना जीवनात अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले. त्यातून त्यांच्या कथा साकार झाल्या. मानवी जीवनाचे बहुविध दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या कथांमध्ये समाजाच्या सर्व स्तरांतील स्त्रीपुरुष व मानवी जीवनाची अनेक अंगे अवतरली. त्यांच्या कथा भावनाप्रधान असून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक इ. प्रकारचे कथाविषय त्यांनी हाताळले आहेत. कथेच्या केंद्रस्थानी एखादे चिंतनतत्त्व अथवा भावसूत्र कल्पून पात्रप्रसंगांच्या साहाय्याने ते कथेचा पट विस्तारतात. त्यातून मानवी मनाचे सूक्ष्म संघर्ष व कोमल भाव रेखाटण्यात तसेच कथेचे आदी, मध्य व अंत आकर्षक करून ती कथा प्रभावी करण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते.
लघुकथांव्यतिरिक्त धूमकेतूंनी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. चालुक्य वंश तसेच गुप्त कालातील पार्श्वभूमीवर लिहिलेल्या चौलादेवी (१९४०), आम्रपाली (१९५४), नगरी वैशाली (१९५४), महाआमात्य चाणक्य (१९५५) इ. अनेक कादंबऱ्यांमधून त्यांनी सुंदर प्रसंग, भावनोचित वातावरण, प्रभावी व्यक्तिरेखा व कौशल्यपूर्ण कथावस्तू साकार केल्या आहेत. तथापि ⇨ कनैय्यालाल मुनशींच्या ऐतिहासिक कांदबऱ्यांपुढे ह्या कांदबऱ्या निस्तेज वाटतात. किंबहुना धूमकेतूंची यशस्विता कांदबऱ्यांपेक्षा लघुकथांमध्येच अधिक दिसून येते.
ठंडी क्रूरता अने बीजा नाटको (१९४२) हा धूमकेतूंचा एकांकिकांचा संग्रह आहे. यातील ‘ठंडी क्रूरता’ एकांकिकेत दृश्य परिणाम चांगले साधले आहेत परंतु इतर एकांकिकांत प्रयोगक्षमतेचा अभावच जाणवतो. रजकण (१९३४), सर्जन अने चिंतन (१९३७), पगदंडी (१९४०), पद्मरेणु (१९५१) आदी त्यांचे निबंधसंग्रह आहेत. जीवनचक्र (१९३६), जीवनपंथ (१९४९) व जीवनरंग (१९५६) यांत त्यांचे आत्मचरित्र आले आहे. त्यांची शैली अत्यंत आकर्षक असून जीवनाचे भावगंभीर चिंतन हा त्यांच्या लेखनाचा विशेष होय.
पेंडसे, सु. न.