धावडा : (धवळ हिं. धाव, बाकली गु. धावडो, डाब्रिया क. दिदुंग, बेज्जाळू सं. धव इं. बटन ट्री, ॲक्सलवुड लॅ. ॲनोजिसस लॅटिफोलिया कुल-काँब्रेटेसी). सु. ९–१५ मी. उंच, मोठ्या व सरळ वाढणाऱ्या ह्या पानझडी वृक्षाचा प्रसार आसामखेरीज भारतात सर्वत्र शुष्क जंगलात आहे शिवाय तो श्रीलंकेतही आढळतो. वैदिक वाङ्मय, महाभारत व बृहत्संहिता इ. प्राचीन ग्रंथांत धव या नावाने याचा उल्लेख आढळतो. याची साल गुळगुळीत, फिकट आणि ढलप्या सोलून गेल्यामुळे खाचदार असते. कोवळे भाग लवदार, पाने साधी, संमुख (समोरासमोर) चिवट, अंडाकृती विशालकोनी वा निम्नमध्य (टोकास खाच असलेली) असतात. ती थंडीत गळतात व एप्रिल–मेमध्ये नवीन पालवी येते. फुलांचे गुच्छ – (झुबके) पानांच्या बगलेत मंजरीवर मे–जुलैमध्ये येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ काँब्रेटेसी कुलात (अर्जुन कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुलांना पाकळ्या नसतात. फळ लहान, शुष्क, सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेले) एकबीजी, पिंगट व दीर्घकाल राहणाऱ्या संवर्ताशी (पुष्पकोशाशी) जुळलेले असून त्यांचे झुबके नोव्हेंबर-फेब्रुवारीत येतात.
धावड्याच्या वाळलेल्या सालीत १०–१५% टॅनीन असून ⇨ तरवडाबरोबर ती अधिक परिणामकारक होते. या झाडापासून ‘धौरा’ नावाचा डिंक मिळतो. तो बाभळीच्या डिंकाऐवजी वापरतात पण तो कमी प्रतीचा असतो चिटाच्या कापडाची छपाई, औषधे, कागद-निर्मिती, मिठाई इत्यादींत तो वापरतात. पानांत सु. ३२% टॅनीन असते. पानांपासून काळा रंग काढतात. वाळविलेल्या कोवळ्या लाल पानांच्या शेंड्यांत सु. ५५% टॅनीन असते व कातडी कमाविण्यास ते उपयुक्त असते. लाकूड जांभळट तपकिरी, कठीण व घट्ट असून त्याला चांगली झिलई होते. खांब, तराफे, गाड्या, नावा, हत्यारांचे दांडे, चरखे, शेतीची अवजारे, मुसळे, कणे, दांडे इ. कमीअधिक महत्त्वाच्या वस्तूंकरिता फार उपयुक्त असते. लाकडापासून उत्तम कोळसा बनतो. साल कडू व स्तंभक (आकुंचन करणारी) असते. फळे कफनाशक (खोकला नाहीसा करणारी) व पित्तनाशक असतात.
जमदाडे,ज. वि.
“