धारवाडी संघ : भारतात आढळणाऱ्या अतिप्राचीन ⇨ आर्कीयन काळातील प्रामुख्याने सुभाजा (चपट्या थरांत सहज विभागणाऱ्या) गटातील खडकांना धारवाडी संघ व त्या कालावधीला धारवाडी कल्प असे नाव दिले आहे. कर्नाटकातील धारवाडी गावानजीक सापडणाऱ्या या प्रकारच्या खडकांचा अभ्यास प्रथम झाला असल्याने त्यावरून हे नाव पडले आहे. धारवाडी संघातील खडक भारतात प्रामुख्याने पुढील ठिकाणी आढळून येतात : (१) दक्षिण भारतात धारवाड व बेल्लारीच्या आसपास, तसेच कर्नाटक राज्यातील बराचसा भाग व दक्षिणेकडे निलगिरी, मदुरा आणि श्रीलंकेपर्यंतचा प्रदेश (२) जबलपूर व नागपूर, रेवा, हजारीबाग, धनबाग, रांची व सिंगभूममधील बराचसा भाग (३) अरवली पर्वतरांगांमधील बराचसा भाग म्हणजे उत्तरेकडे जयपूरपर्यंत तर दक्षिणेकडे उत्तर गुजरातपर्यंतचा प्रदेश (४) हिमालय पर्वतरांगांमधील मध्य व उत्तर भाग आणि आसामातील पर्वतरांगांमधील शिलाँगचे पठार येथेही या संघाचे खडक आढळतात.
खडक : धारवाडी संघातील खडकांमध्ये खूपच विविधता आढळून येते. यांत नानाविध मिश्र खडाकांचे गट उदा., काही दलिक अवसाद (आधीच्या खडकांच्या तुकड्याताकड्यांचे बनलेले गाळ) तर काही रासायनिक अवक्षेपणाने (साका खाली बसून) तयार झालेले खडक आढळून येतात. त्यांच्या जोडीला अंतर्वेशित (घुसलेले) व ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे तयार झालेले अग्निज खडक या सर्वांची सरमिसळ झालेली दिसते. वरील सर्व प्रकारचे खडक त्यांच्यावर झालेल्या दाब व उष्णता यांच्या क्रियेमुळे रूपांतरण पावलेले (बदल घडून आलेले) दिसतात. रूपांतरण होताना त्यांची मूळची स्वरूपे पार बदलून गेलेली आणि त्यांच्यात नवीन खनिजे निर्माण झालेली दिसतात. हे रूपांतरण खूपच विस्तृत प्रमाणात झालेले असून त्याची तीव्रता उच्च प्रतीची आढळून येते व खडकांच्या रूपांतरणाच्या विविध प्रतींच्या अभ्यासासाठी हे खडक अतिशय उपयुक्त आहेत. यांतील बहुसंख्य खडक फिलाइट, सुभाजा व स्लेट (पाटीचा दगड) या प्रकारांतील आहेत. सुभाजांत प्रामुख्याने हॉर्नब्लेंड, क्लोराइट, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट व फेल्स्पार ही खनिजे आढळून येतात.
या खडकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ग्रॅनाइटाची अंतर्वेशने झालेली (घुसलेल्या राशी) दिसून येतात. यांच्या जोडीला स्फटिकी चुनखडक आणि सर्पेंटाइनयुक्त संगमरवर व स्टिॲटाइटाचे साठे आढळून येतात. तसेच रंगीत व पट्टेदार जॅस्पर आढळतात. त्याचप्रमाणे लोखंड आणि मँगॅनीज यांच्या धातुकांचे (कच्च्या रूपातील धातूचे) बनलेले खडकही आढळून येतात.
धारवाडी कल्पातील अंतर्वेशने विविध प्रकारची व खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. या अंतर्वेशीत खडकांपैकी काही उल्लेखनीय प्रकार म्हणजे राजस्थानातील नेफेलीन सायेनाईट, क्वॉर्ट्झ, पॉर्फिरी व सेलममधील डनाइट हे होत. अंतर्वेशित ग्रॅनाइट खडकांना जेथे पेग्मटाइटाच्या शिरा भेदून जातात, तेथे पेग्मटाइटामध्ये अभ्रकाचे खूप मोठे स्फटिक तयार झालेले दिसतात. या स्फटिकांचे मोठे सलग पापुद्रे फार मौल्यवान असतात. अभ्रकांचे असे स्फटिक विशेषतः हजारीबाग, नेलोर व राजस्थानामधील काही भागांत आढळतात. अभ्रकाच्या जोडीला या पेग्मटाइटांमध्ये इतर मौल्यवान किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारी) खनिजेही उदा., मॉलिब्डेनाइट, कोलंबाइट, पिचब्लेंड, ॲलॅनाइट, समर्स्काइट इ. आढळतात. तसेच वैदूर्याचे मोठे स्फटिकही आढळतात.
संरचना : धारवाडी संघातील खडकांची संरचना संमुखनती [खोलगट घडीच्या → घड्या, खडकांतील] स्वरूपाची दिसते. आर्कीयन काळातील ग्रॅनाइट पट्टिताश्मांमध्ये त्यांचे अरुंद व लांबट पट्ट्यांच्या स्वरूपाचे बहिःस्थ दृश्यांश (पृष्ठावर उघडे पडलेले भाग) दिसून येतात. धारवाडी गाळाच्या खडकांवर दाब पडून त्यांना घड्या पडल्या, त्यातील संमुखनती जोडणारे विमुखनतीचे (घुमटाकार घडीचे) भाग कालांतराने अपक्षयाने (वातावरणीय क्रियांनी) झिजून गेले आणि संमुखनत भाग तेवढे शिल्लक राहिलेले दिसतात. या संघातील खडक तिरके झालेले असून त्यांची सर्वसाधारण नतिलंब (खडकांच्या थरांच्या कलास म्हणजे नतीस काटकोनात असलेली क्षितिजसमांतर अशी) दिशा पुढीलप्रमाणे आहे. कर्नाटक विभागात नतिलंब दिशा साधारणपणे वायव्य-आग्नेय आहे आणि दक्षिणेकडे जावे तसतसे ती उतर-दक्षिण होते व अगदी दक्षिणेकडे ईशान्य-नैर्ऋत्य आहे, असे दिसते. पूर्व घाट विभागात व बिहार-ओरिसा भागात नतिलंब दिशा ईशान्य-नैर्ऋत्य आहे. मध्य प्रदेशात ही दिशा ईशान्य-नैर्ऋत्य ते पूर्व-पश्चिम होते. राजस्थानामध्ये अरवली पर्वतरांगांतही नतिलंब दिशा ईशान्य-नैर्ऋत्य आहे.
वय : धारवाडी खडकांचे वय हा भूविज्ञानातील एक विवाद्य प्रश्न आहे. एवढे निश्चित की, हे खडक कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळापेक्षा पुष्कळच जुने आहेत व हे खडक तयार झाल्यावर बराचसा कालावधी लोटल्यानंतर त्यावर कँब्रियन काळातील खडक साचलेले दिसतात. हा कालावधी बराच प्रदीर्घ असून त्या अवधीत धारवाडी व आर्कीयन गटातील खडकांवर उष्णता व दाब यांचा परिणाम होऊन व त्यांना घड्या पडून त्यांच्या मोठ्या पर्वतरांगा तयार झाल्या. कालांतराने त्यांची प्रचंड प्रमाणावर झीज झाली व त्या खूप झिजलेल्या पृष्ठभागावर प्रदीर्घ कालावधीनंतर कँब्रियन काळातील थर विसंगतपणे साचलेले दिसतात. या विसंगतीला आर्कीयन कालोत्तर विसंगती म्हणतात [ → आर्कीयन]. यावरून धारवाडी खडक या विसंगतीच्या आधीचे आहेत, हे निश्चित होय.
धारवाडी संघातील खडक हे भारतातील सर्वांत जुने रूपांतरित गाळाचे खडक मानले जातात. हे खडक आर्कीयन पट्टिताश्मांशी अत्यंत संलग्न असून त्यांत मिसळून गेले आहेत. त्यामुळे काही भूवैज्ञानिकांच्या मते ते वेगळे न मानता आर्कीयन व धारवाडी खडक यांचा एक संयुक्त आर्कीयन गट मानावा हे योग्य होय. या संयुक्त गटातील रूपांतरित अवसादी खडकांना विशेषतः सुभाजा प्रकारच्या खडकांना धारवाडी खडक असे नाव दिले जाते. आर्कीयन खडकांची झीज होऊन तयार झालेले गाळांचे थर प्रथमच तयार झालेल्या समुद्रात साठले व या गाळाच्या थरांच्या रूपांतरणामुळे धारवाडी खडक तयार झाले. हे खडक काही ठिकाणी आर्कीयन पट्टिताश्मांवर विसंगतपणे साचलेली दिसतात, तर काही ठिकाणी ते त्या खडकांपेक्षा निश्चित जुने असून त्यांच्यात आर्कीयन ग्रॅनाइटी खडकांची अंतर्वेशने आढळतात.
जीवाश्म : बहुसंख्य धारवाडी खडक मूळचे अवसादी स्वरुपाचे असूनसुद्धा त्यांत जीवाश्म (जीवांचे शिळाभूत अवशेष) आढळून येत नाहीत. कारण इतक्या प्राचीन काळी पृथ्वीवर बहुधा जीवसृष्टी निर्माण झाली नसावी व जरी अगदी प्राथमिक स्वरूपाची जीवसृष्टी थोड्या प्रमाणात अस्तित्वात असली, तरी त्यांच्या गाळातील खुणा त्यांवर झालेल्या उष्णता व दाब यांच्या परिणामांमुळे पूर्णपणे नष्ट झाल्या असाव्यात.
खनिज संपती : धारवाडी खडक खनिज संपतीच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहेत. दगडी कोळसा, खनिज तेल व बॉक्साइट हे खनिज पदार्थ सोडल्यास बाकीची सर्व महत्त्वाची धातवीय व अधातवीय खनिजे प्रामुख्याने धारवाडी खडकांच्या साहचर्याने आढळून येतात. यांतील काही महत्त्वाची खनिजे पुढीलप्रमाणे आहेत. मँगॅनीज धातुक–भारतामध्ये प्रतिवर्षी उत्पादन होणारे बहुतेक सर्व मँगॅनीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने धारवाडी खडकांपासून निर्माण झालेले आहे. याचे मुख्यत्वेकरून तीन प्रकार पडतात : (१) अंतर्वेशित खडकांशी संलग्न–कोडुराइट खडक. उदा., विशाखापटनममधील धातुक, (२) गोंडाइट खडकांशी संलग्न. उदा., मध्य प्रदेश, मध्य भारत व पंचमहालमधील गाळाच्या खडकांच्या रूपांतरणामुळे झालेले स्फटिकरूप मँगॅनीज, (३) जांभा दगडातील धातुके धारवाडी स्लेट व सुभाजांपासून कायांतरणामुळे तयार झालेली आहेत.
धारवाडी संघात लोखंडाचेही उत्तम प्रतीचे कित्येक लाख टनांचे साठे आढळून येतात. भूवैज्ञानिकांच्या मते हे मूळचे सागरी अवसाद (गाळ) आहेत.
वरील महत्त्वाच्या खनिजांव्यतिरिक्त सोने, क्रोमियम, तांबे, टंगस्टन, शिसे, जस्त, इत्यादींची धातुके अभ्रक, कुरुविंद, टिटॅनियम आणि थोरियम यांची खनिजे पिचब्लेंड, मोनॅझाइट, कोलंबाइट इ. यांच्या जोडीला माणिक, वैदूर्य, पाचू, झिर्कॉन, स्पिनेल, गार्नेट, तोरमल्ली इ. मौल्यवान रत्नेही धारवाडी खडकांत आढळून येतात. या खनिजांव्यतिरिक्त धारवाडी संघामध्ये बांधकामासाठी उपयुक्त असणारे ग्रॅनाइट, संगमरवर इ. खडकही आढळून येतात.
संदर्भ : 1. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, Vol. I, Calcutta, 1962.
2. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.
ओक, शालिनी म.