पाम : ही इंग्रजी संज्ञा सर्व ‘ताल’ वृक्षांना उद्देशून वापरली जाते. संस्कृत वाङ्मयात ‘ताल’ ही संज्ञा ताड, माड, खजूर, पोफळी (सुपारी). अनेक व आप्तसंबंध (अनेक गुणधर्मांत साम्य) दर्शविणाऱ्या झाडांना वापरलेली आढळते. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने त्या सर्वांच्या सामान्य लक्षणांचे वर्णन ⇨ पामी  (पामेसी) या नोंदीत दिले आहे. येथे ‘पाम’ या सदरातील काहींची स्वतंत्र वर्णने पुढे दिली आहेत. ताल वृक्षाच्या उपयोगाने बनविलेल्या धनुष्याचा उल्लेख महाभारत आणि काशिकावृत्ती यांत आढळतो. पाणिनी यांच्या अष्टाध्यायीमध्ये ( स. पू. सहावे शतक) ताल वृक्षाचा निर्देश आढळतो. तसेच कौटिलीय अर्थशास्त्रातही ताल व ⇨ ताड आणि वात्सायन यांच्या कामसूत्रातखजुराचा  उल्लेख केलेला आढळतो. चरकसंहितेत व सुश्रुतसंहितेत खर्जूर, नारिकेल [→ नारळ], ताल यांचा निर्देश केलेला आहे. यावरून अनेक ताल वृक्षांचे गुणधर्म भारतीयांना परिचित होते हे स्पष्ट आहे. सुपारी भेर्ली माड गुलगा माझरी तेल माड शेवरा शिंदी पिनांगा बास वेत ताड नारळ इ. ताल वृक्षांच्या स्वतंत्र नोंदी आहेत.

परांडेकर, शं. आ.

चिनी पाम :  (इं. ड्वार्फ ग्राउंड रतन, लार्ज लेडी पाम लॅ. र्‍हॅपिस एक्सेल्सा, र्‍हॅ. फ्लॅबेलिफॉर्मिस कुल-पामी). हे सदापर्णी शोभिवंत, काटक व झुबक्याप्रमाणे पसरून वाढणारे क्षुप (झुडूप) मूळचे चीन व जपान येथील असून हल्ली त्याचा प्रसार शोभेकरिता बागेत सर्वत्र झाला आहे. ते दलदलीतही वाढते, बहुधा ओलसर जागी व सावलीत अधिक चांगले वाढते. जमिनीतून आलेल्या अनेक बारीक खोडांची बेटे बनतात. र्‍हॅपिस  हे वंशनाम त्याच्या पानांचा निमुळता आकार किंवा पाकळ्यांची सुईसारखी टोके (प्रशुके) ह्यांना अनुलक्षून असावे. र्‍हॅपिस  वंशात सु. पंधरा जाती असून त्या द. चीन ते जावापर्यंत आढळतात. त्यांची सर्वसामान्य लक्षणे पामी कुलात (ताल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. चिनी पामचे खोड बोरूसारखे, सु. २ मी. उंच असून त्याचा व्यास सु. २.५ सेंमी. असतो. खोडापासून जमिनीत वाढलेल्या अनेक फांद्या (अधश्चर) नंतर जमिनीवर वाढून बेट मोठे होत जाते.

खोडावर अनेक, मोठी, एकाआड एक, संयुक्त, जाडसर, काहीशी चुण्या पडलेली (चूणित) व ५-७ लांबट दलांची पाने असतात. ती पंख्यासारखी अर्धवर्तुळाकृती असून दले रेखाकृती, टोकास छेदित (कापल्यासारखी) व कडेने काटेरी असतात. मुख्य देठ बारीक, दोन्ही बाजूंस फुगीर व कडेने काटेरी असतो. आवरक (खोडास वेढणारा पानाचा देठ) जाळीदार व लांब असतो. फुलोरे [स्थूल कणिशे→पुष्पबंध] पानापेक्षा लहान असून महाछदे २-३ व पातळ फुले पिवळी, विभक्तलिंगी, तीन संदले, पुष्पमुकुटात तीन पाकळ्या, केसरदले सहा, स्त्री-पुष्पात तीन सुटी किंजदले [→फूल] व त्यांपासून तीन अश्मगर्भी फळे (आठळी फळे) बनतात.

इंटरमेडिया  या प्रकारात पाने जमिनीला समांतर असतात. चिनी पाम बागेमध्ये पिपात किंवा कुंडीत लावतात, कुंपणाकडेनेही लावतात. अधश्चर किंवा बिया वापरून अभिवृद्धी करतात. एक भाग वाळू, एक भाग पानांचा भुगा व तीन भाग पोयट्याची माती या मिश्रणाची माती चांगली उघड्यावर किंवा सावलीत ते वाढते. सोनेरी पानाचा व पांढऱ्या पानाचा असे दोन उद्यानप्रकार लागवडीत आहेत. चिनी पामच्या खोडापासून हातात धरावयाच्या काठ्या (हात-काठ्या) व छत्रीचे दांडे बनवितात. पाने छपराकरिता वापरतात. र्‍हॅ. ह्यूमिलिस  ही जातीही बागेत लावतात.                   

आ. १. चिनी पाम (१) संपूर्ण झुडूप (२) स्त्री-पुष्प, (३)पुं-पुप्पाचा उभा छेद (४) स्त्री-पुप्पाचा उभा छेद (५) तीन फळे (६) एका फळाचा उभा छेद

 जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं. आ.


टॅलिपॉट पाम : (म., हिं. बजरबट्टू, क. श्रीताली, बैनी सं. ताली, श्रीताल, अल्पायुषी इं. फॅन पाम लॅ. कॉरिफा, अँत्रॅक्युलिफेरा कूल-पामी). सु. १८-२४ मी. उंच व ०.९-१.२ मी. व्यास असलेला, सरळ वाढणारा हा मोठा शोभिवंत ताल-वृक्ष भारत (मद्रास व मलबार), अंदमान बेटे, मलेशिया व श्रीलंका येथे आढळतो. तेथे व इतरत्र त्याची लागवड केलेलीही आढळते.

आ. २. टॅलिपॉट पाम (फॅन पाम) : (अ) वृक्ष (आ) फुलोरा (इ) फुलोन्चाची शाखा : (१) महाछद, (२) स्थूल कणिश (ई) कळीचा उमा छेद (उ) फूल (ऊ) फल.

खोडावर वर्तुळाकार कंगोरे व पानांच्या देठांचे अवशेष असतात. पाने साधी, मोठी (१.८ X ३.९ मी.) व पंख्यासारखी असून पाते अर्ध्यापर्यंत विभागलेले व अर्धवर्तुळाकृति असते. खंड दुभंगलेले व चूणित (घडी पडलेला), देठ सु. २ मी. लांब, जाड, वर पन्हळासारखा अंतर्गोल असून बाजूस लहान तपकिरी काटे असतात. खोडाच्या माथ्यावरील पानांच्या झुबक्यातून टोकास एक (सर्व वनस्पतिसृष्टीत) मोठा, सु. ६ मी. उंच असा फुलोरा या वृक्षाच्या जीवनात एकदाच येतो. त्या वेळी हा वृक्ष सु. ३०-५० वर्षाचा असतो. हा फुलोरा परिमंजरीसारखा असून त्यावर अनेक नळीसारखी महाछदे व त्यांत स्थूल कणिशे असतात. एकूण फुलांची संख्या सु. पाच लक्ष असते ती हिरवट पांढरी व द्विलिंगी असतात (फुलांच्या संरचनेकरिता ‘पामी’ ही नोंद पहावी). त्यानंतर सु. एक वर्षाने फळे येतात. ती अश्मगर्भी, हिरवट करडी, गोटीएवढी लहान असतात. त्यानंतर तो वृक्ष मरतो. बीगोलसर, गुळगुळीत व कठीण असते. फुले येण्यापूर्वी खोडातील भेंडापासून ⇨ साबुदाणा  करतात. बिया (बजरबट्टू) हस्तिदंतासारख्या असल्याने त्यांचा उपयोग बटणे, मणी, दागिने इत्यादींकरिता होतो. पानांपासून साध्या छत्र्या, पंखे, चट्या, तंबू व छपरे करतात. वाळविलेल्या कोवळ्या पानांचा कागदासारखा उपयोग केला जात असे. पवित्र बौद्ध ग्रंथ त्यावर लिहिले होते. ताली वृक्षाचा उल्लेख महाभारतात व कौटिलीय अर्थशास्त्रात आला आहे. त्यावरून हा भारतीय वृक्ष आहे हे दिसून येते. मोठ्या बागेत शोभेकरिता ही झाडे लावतात. कुटलेल्या कोवळ्या फळांचा लगदा माशांना गुंगी आणण्यास वापरतात. [→वनस्पति, विषारी].                

जमदाडे, ज. वि.

  


तागुआ पाम : ( इ.कोरोझो नट, आयव्हरी नट, व्हेजिटेबल आयव्हरी पाम लॅ. फायटेलेफस मायक्रोकार्पा कुल-पामी). एक लहान शोभिवंत ताल वृक्ष. हा मूळचा कोलंबियातील (द. अमेरिका) असून काही देशांत (उदा., भारत व श्रीलंका) बागेत लावलेला आढळतो. पनामा ते पेरू या प्रदेशातील नद्यांच्या काठाने तो वाढतो. एक्कादोरमधून विशेषतः यूरोपकडे व अमेरिकेकडे या वृक्षाच्या कठीण व अंड्याएवढ्या बियांची फार मोठ्या प्रमाणावर (सु. दोन लक्ष टन) निर्यात होते. या वृक्षाचे खोड प्रथम जमिनीवर जवळजवळ दिसतच नाही परंतु भूमिस्थित (जमिनीतील) खोडापासून मोठी, सु. ४.५-६.० मी. लांब पिसासारखी, संयुक्त, मूलज (मुळातून आल्यासारखी), गर्द हिरवी (नारळाच्या पानांसारखी) पाने जमिनीवर सरळ पण काहीशी तिरपी वाढतात. हा वृक्ष फार मंदपणे वाढतो.

आ. ३. तागुआ पाम : (अ) संयुक्त फळासह मादी वृक्ष (आ) फुलोन्यासह नर वृक्ष (इ) स्त्री-पुप्पाचा (परिदलाशिवाय) भाग : (१) वंध्य केसरदले, (२) किंजल, (३) किंजल्क (ई) लहान फळ (उ) फळाचा आडवा छेद व स्यातील सहा विया ( येथे वृक्षाची आकृती मूळच्या वृक्षाध्या १/५० पट असून स्त्री-पुष्प मुळच्या फुलाच्या ३/२ पट आहे).

खूप जुन्या वृक्षांना जमिनीवर आडवे वाढणारे खोड असते. नर व मादी झाडे स्वतंत्र असतात. नरावर लोंबते, कणिशासारखे, शाखाहीन फुलोरे (पुष्पबंध) असतात पण मादीवर स्त्री-पुष्पबंध म्हणजे उभी कणिशे असतात. प्रत्येक कणिशाचा देठ व अक्ष खवलेदार असून महाछदे जोडीने त्यांना वेढून संरक्षण करतात. पुं-पुष्पे लहान, त्यांची परिदले अतिसूक्ष्म व केसरदले लांब व असंख्य असतात. गुच्छामध्ये स्त्री-पुष्पे सहा व मोठी (५-८ सेंमी. लांब) संदले तीन, प्रदले पाच ते दहा व मांसल आणि वंध्य केसर अनेक असतात. किंजपुट गोलसर, पाच कप्प्यांचा असून किंजल व किंजल्क लांब असतात [→फूल]. प्रत्येक स्त्री-पुष्पापासून एक मृदूफळ व सर्वांपासून एक संयुक्त मोठे फळ बनते व त्यावर कठीण साल असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. संयुक्त फळ पानांच्या झुबक्याच्या तळाशी असून प्रत्येक लहान फळात सहा ते नऊ मोठ्या अंडाकृती बिया असतात. अपक्व व कोवळ्या बियांतील खोबरे गोड व खाद्य असते मात्र पक्व बिया फार कठीण असून हस्तिदंताप्रमाणे उपयोगात आहेत. जडावाचे काम, फासे, मुठी, बुद्धिबळे, बिलियर्डचे चेंडू, बटणे, खेळणी व काही नवलपूर्ण वस्तू बियांतील कठीण पुष्कापासून (गर्भाबाहेरील अन्नांशापासून) बनवितात. पुष्कात ६०% मान्ना हा पदार्थ असून त्यापासून ⇨ मान्ना शर्करा  बनविता येते. बीजांभोवतालच्या फिकट पिंगट आच्छादनापासून ३५% अर्धघन, खाद्य, गोड तेल निघते. फार कोवळी पाने भाजीप्रमाणे खातात. जून मोठी पाने छपराकरिता वापरतात. महाछदातील धाग्यांपासून दोर बनवितात. मध्य अमेरिकेतील एका उंच व समवांशिक जातीच्या (फायटेलेफस सीमानी ) ताल वृक्षाच्या बियांचा हस्तिदंताप्रमाणे तोच उपयोग करतात.                               

परांडेकर, शं. आ.


डूम पाम : (इं. ईजिप्शियन डूम पाम लॅ. हायफीने थेबैका कुल-पामी). हा सु. १०-१२ मी. उंच, विभक्तलिंगी, द्विशाखाक्रमी (पुनःपुन्हा दोन फांद्यांत विभागणारा) वृक्ष मूळचा ईजिप्तमधील असून त्याची भारतात आणि इतरत्र बागेत लागवड करतात. आफ्रिकेतही तो आढळतो. मूळचा रुक्ष व उच्च तापमानात वाढणारा हा वृक्ष वर्षारण्यातील (पावसाळी वनातील) दमट व ओलसर प्रदेशात चांगला फोफावतो. सु. २० वर्षांत तो ९.३० मी. पर्यंत उंच होतो. रुक्ष व निकस जमिनीत पाने व फळे लहान होतात. ईजिप्तमध्ये लागवडीस असलेल्या वृक्षांत याचा खजुरानंतर दुसरा क्रमांक लागतो. तो पुरातन असून प्राचीन ईजिप्त-संस्कृतीत त्याला स्थान आहे. तो पवित्र व मर्दानीपणाचे प्रतीक होता. ‘थौत’ हा तेथील विज्ञानदेव प्राचीन ईजिप्तमध्ये ⇨ आयबिस  (खाली वळलेल्या लांब चोचीचा पक्षी) व बॅबून (माकडाची एक जाती) या रूपात दर्शविला जात असे बॅबून डूम पामची फ़ळे खात व त्या झाडाच्या माथ्यात वस्ती करीत.त्यामुळे डूम पामच हा थौतचा विशेष वृक्ष झाला आणि बॅबून थौतचा पवित्र प्राणी मानला जाऊ लागला डूम पाम व बॅबून एकत्र असलेली चित्रे काढली गेली. बॅबून डूम पामची फळे खातात, हे खरे आहे. हायफीने इंडिका (इंडियन डूम पाम) हा भारताच्या प. किनाऱ्यावरचा वृक्ष त्यासारखाच असल्याने दोन्हीबद्दल समजुतीचा घोटाळा होतो. हायफीनेच्या एकूण तीस जातींपैकी भारतात फक्त दोन आढळतात. हा. इंडिका  समुद्रकिनाऱ्याखेरीज इतरत्र लागवडीत आहे. जे. ग्रॅहॅम यांच्या मते १८२८ मध्ये डूम पाम मुंबईत निग्मो यांनी आणून लावला पुढे १८३७ मध्ये पुन्हा मॅक्युलोफ यांनी लावला. डूम पामची पाने मोठी, पंख्यासारखी असून फांद्यांच्या टोकांना दाटीने येतात फुले लहान, पिवळी व सु. १.२ मी. लांबीच्या फुलोऱ्यावर (स्थूल कणिशावर) येतात. ती कणिशे अनेक, दंडगोलाकृती महाछदांनी वेढलेली असतात. अश्मगर्भी फळ (७.५ x ५ सेंमी.) तिरपे, अंडाकृती, चमकदार व पिंगट असते. त्यात रसाळ गोड मगज (गर) असतो. बी एकच व फळातील अंतःकवचाला चिकटलेले असून त्यात पांढरा व कठीण पुष्क असतो पुष्कात पोकळी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बियांनी होते. रेतीयुक्त ओलसर चिकण माती व दमट हवा त्याला मानवते. फलावरण धागेदार, मांसल, गोड व खाद्य आफ्रिकेत मांसल भाग कुटून पोळ्यांत व मिठाईत घालतात. तसेच तो उकळून काकवी व सरबत करतात.

आ. ४. डूम पाम वृक्ष : द्विशाखाक्कम.

अपक्व फळे कुटून तृणधान्याऐवजी खातात. खोडापासून साबुदाणा मिळतो. शेंड्यावरच्या कळ्या व जमिनीखालचा रोपाचा भागही खाद्य असून उंट कोवळी पाने खातात. फळ स्तंभक (आकुंचन करणारे), मूत्रल (लघवी साफ करणारे) व कृमिनाशक असते. आठळ्या कुटून जखमांवर बांधतात. कातड्यांना काळा रंग येण्यासाठी पक्व फळे इतर काही पदार्थाबरोबर वापरतात. करवंटीपासून कड्या, माळा, तपकिरीच्या डब्या इ. वस्तू बनवितात. कठीण मगजाची (पुष्काची) बटणे, अत्तराच्या डब्या, सुया व कातीव वस्तू करतात. छपरे, चटया, हॅट, टोपल्या, दोर, तंबू, झोपड्या, कागदाचा लगदा इत्यादींकरता पाने वापरतात. पानांतील धाग्यापासून दोर व मासेमारीची जाळी बनवितात. लाकूड फिकट भुरे, बळकट, घन व जड असून खांब, तुळ्या, दरवाजे, सजावटी सामान, घरगुती भांडी, लहान पडाव इ. विविध प्रकारे उपयोगात आणले जाते.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.


बाॅटल पाम :  (सं. कूपी ताल इं. मौंटन ग्लोरी, क्यूबन रॉयल पाम लॅ. ओरिओडोक्सा रेजिया, रॉयस्टोनिया रेजिया कुल-पामी). हा मोठा, शोभिवंत, बिनकाटेरी ताल वृक्ष मूळचा क्यूबातील (वेस्टइंडीज) असून आन्टोग्वा, जमेका, पनामा, द. फ्लॉरिडा व इतर उष्ण प्रदेशांत आढळतो मध्य अमेरिकेत तो काही ठिकाणी लागवडीतही आहे. रॉयस्टोनिया  या आधुनिक वंशनामाने काही वृक्ष ओळखले जातात, हा रॉयल पाम म्हणून अधिक परिचित असून त्याचा समावेश या नावाच्या वंशात केलेला आढळतो. या वंशात सु. १२ जाती असून काही संकरज प्रकारही लागवडीत आहेत. भारतात बॉटल पाम आणि त्याच वंशातील दुसरी जाती ‘कॅबेज पाम’, ही झाडे बागेत कडेने लावलेली आढळतात, रस्त्यांच्या दुतर्फाही लावतात. बॉटल पामचे खोड शाखाहीन, सरळ, जाड, बळकट, करडे, काहीसे गुळगुळीत व सु. १२-१८ मी. (क्वचित ३१-४० मी.) उंच आणि बाटलीसारखे (त्यावरून इंग्रजी नाव पडले) असून त्यावर वाटोळे कंगोरे असतात. त्याचा आकार मध्ये काहीसा फुगीर असून तळाशी मुळाजवळ थोडा पसरट असतो. शेंड्याकडे सु. २-२.५ मी. लांब आणि पिसासारख्या संयुक्त व मोठ्या पानांचा झुबका असतो. खोडावर हाताने थापटल्यावर विशिष्ट आवाज (पाण्याने भरल्यासारखा) येतो. पानांच्या मध्यशिरेवर दलांच्या चार रांगा असून प्रत्येक दल ७५ सेंमी. X २.५ सेंमी. रेषाकृती, निमुळते व टोकदार असते. पानांचा पर्णतल (आवरक) ०.९ – १. २५ मी. लांब व नळीसारखा असून त्याखाली फुलोरे साधारण वर्षभर येत असतात. नंतर ते घोसासारखे पानांच्या झुबक्याखाली लोंबतात. प्रत्येक फुलोरा स्थूलकणिश प्रकारचा असून महाछदे दोन व नौकेसारखी असतात फुले लहान, पांढरी व एकलिंगी पुं-पुष्पे स्त्री-पुष्पापेक्षा मोठी असून कळीमध्ये केसरदले पूर्णपणे वेढलेली असतात. अश्मगर्भी फळ गोलसर आयत, जांभळट व लहान (१ – १.५ सेंमी. लांब) आणि बी लांबट गोल व सपुष्क असते. फळांच्या एका घोसाचे वजन सु. २२ – २७ किग्रॅ. असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

आ. ५. बॉटल पाम ( फुलोन्यासह )

फळातील मगज वजनाने ५०% असून त्यापासून ३% पिवळट तपकिरी रंगाचे तेल काढतात. खोबऱ्यात १८% तेल असते व त्यात अनेक ⇨ वसाम्ले  असतात. क्यूबात फळांची तेलकट साल डुकरांना मेदवृद्धीकरिता खाऊ घालतात. बियांच्या चूर्णात ६% प्रथिने असून तेही डुकरांचे चांगले खाद्य आहे. फळे आदिवासी खात असत. कोवळी पाने भाजीकरिता वापरतात.

रॉयस्टोनिया ओलेरॅशिया   (इं. कॅबेज पाम) ही बॉटल पामच्या वंशातील दुसरी जाती भारतात शोभेकरिता बागेत लावतात. हा वृक्ष अधिक उंच (सु. ३७ मी.) असून त्याच्या पानावरची दले दोनच रांगांत असतात, खोड मध्ये फुगीर नसते पुं-पुष्पातून केसरदले बाहेर डोकावतात, फळे अधिक लांबट असतात. कोवळ्या पानांच्या कळ्य़ा वेस्ट इंडीजमध्ये भाजीकरिता वापरतात. बॉटल पाम हे इंग्रजी नाव प्रिचार्डिया राइटाय  आणि आणखी काही ताल वृक्षांनाही लावलेले आढळते.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.


रॅव्हेनेला पाम : (इं. ट्रॅव्हलर्स ट्रि, ट्रॅव्हलर्स पाम, सोअर्ड ट्रि लॅ. रॅव्हेनेला मादागास्करेन्सिस कुल – म्यूझेसी). सु. ९-१२ मी. उंचीच्या या लहान, डौलदार, पंख्यासारख्या वृक्षाचे मूलस्थान मॅलॅगॅसी (मादागास्कर) असून भारतात व इतरत्र बागांतून शोभेकरिता लावलेला आढळतो. खोड काष्ठयुक्त व पाने ⇨ केळीच्या  पानांसारखी मोठी (२-३ x १.५ मी.) व दोन रांगांत येतात. पर्णतल आवरक, लहान व परस्परांजवळ असून त्यापासून बनलेल्या खोळीत साचलेल्या स्वच्छ पाण्यासारख्या रसाचा उपयोग प्रवाशांना तहान भागविण्यास होतो, त्यामुळे इंग्रजी नावे पडली आहेत. सु. १७ सेंमी. लांबीच्या महाछदाच्या बगलेत पांढरी द्विलिंगी फुले एकपद वल्लरीत [→पुष्पबंध] येतात. बोंड तडकल्यावर तीन शकले होतात. प्रत्येक शकलात भडक निळ्या अध्यावरणयुक्त (मूळच्या बीजावरणावरचे तिसरे आच्छादन असलेल्या) बियांच्या दोन रांगा असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सिटॅमिनी  गणातील (कदली गणातील) म्यूझेसी कुलवर्णनाप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया आणि अधश्चरांपासून (जमिनीतून वर आलेल्या फांद्यांपासून) करतात. याच्या पानांची पाती देठापेक्षा आखूड असतात, परंतु रॅव्हेनेला गियानेन्सिस  ह्या ब्राझील आणि गियाना येथील लहान जातीत ती देठांइतकी लांब पण महाछेदे साधारण दुप्पट मोठी असतात. खोडांचा व लांब देठांचा उपयोग तेथील गरीब लोक घरबांधणीत करतात. बियांतील पौष्टिक स्टार्च विशेषतः मुलांना खाऊ घालतात. बियांच्या अध्यावरणातील चरबी जंतुनाशक असून ती स्वयंपाकात वापरतात. कोवळी पाने कोबीप्रमाणे भाजीकरिता उपयोगात आहेत.

आ. ६. रॅव्हेनेला पाम : (अ) वृक्ष : (१) पान, (२) फुलोरा (आ) फुल (इ) तडकलेले बोंढ (ई) अध्यावरण.

देठांचा कागद बनविण्यास उपयोग होतो. ह्या वनस्पतीच्या रसापासून साखर तयार करतात व पाने छपरांकरिता वापरतात.               

जमदाडे. ज. वि.


लिव्हिस्टोना : पामी कुलातील एका वंशाचे शास्त्रीय नाव. या वंशात एकूण १० जाती (काहींच्या मते ३०) असून त्यांपैकी भारतात फक्त दोन जाती आढळतात. त्यांपैकी (१) लि. चायनेन्सिस  ही फक्त लागवडीत असून तिला ‘चायनीज फॅन पाम’ म्हणतात आणि (२) लि. जेकिन्सियाना   ही देशी असून तिला ‘टोको पाट’ हे आसामी व ‘आसाम फॅन पाम’ हे इंग्रजी नाव आहे. सर्व जाती उंच व भव्य असून त्यांची पाने पंख्यासारखी असतात. आग्नेय आशिया, मलेशिया व ऑस्ट्रेलिया येथे त्यांचा प्रसार आहे.

चायनीज फॅन पाम :  हा सुंदर ताल वृक्ष मूळचा चीनमधला असून त्यांचा विशेष प्रसार चीन व जपान येथे आहे. भारतात उद्यानांत शोभेसाठी लावलेला असून अंदमानातही आढळतो. हा सु. ७-१० मी. उंच असून त्याचे खोड सरळ, बळकट आणि राखी रंगाचे असते. नारळाच्या खोडाप्रमाणे याच्याही खोडावर पर्ण-किण (पानांच्या तळाच्या वलयाकार खुणा) असतात. पंख्यासारख्या साध्या पण अंशतः विभागलेल्या पानांचा झुबका शेंड्यावर असून प्रत्येकाचा पन्हळासारखा देठ लांब व काटेरी असतो. पानाचे पाते मध्ये चिरलेले व जमिनीकडे झुकलेले असते. पान १.२-१.८ मी. व्यासाचे असून त्याचे ५०-६० विभाग (खंड) असतात. फुले द्विलिंगी, हिरवट व लहान असून ती फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये संयुक्त स्थूल कणिशावर येतात. अश्मगर्भी फळ गोलसर व पूर्णपणे पिकल्यावर निळसर काळे दिसते. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे पामी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. हा वृक्ष कुंडीत (किंवा पिपात) लावून घरात ठेवतात किंवा बागेत लावतात. पानांचे पंखे, टोपल्या व दोर बनवितात.

आसाम फॅन पाम :  ही भारतातील दुसरी पण देशीय जाती सिक्कीम टेकड्यांत व दऱ्यांत आणि आसामात सर्वत्र, विशेषतः नौगाँग प्रदेशात व नागा टेकड्यांत आढळते. हा वृक्ष सु. ६-९ मी. उंच असून पाने १.८-२.१ x १.५-१.८ मी. व मूत्रपिंडाकृती, पंख्यासारखी (अधिक रुंद व तळाशी देठाजवळ खोलगट असलेली) असून त्यांचे प्रत्येकी ७०-८० खंड झालेले असतात. फुलोरे लहान झुबक्यासारखे असून अश्मगर्भी फळ १.८-२.५ सेंमी. व्यासाचे आणि निळसर काळे असते. हा वृक्ष उद्यानात शोभेकरिता लावतात. त्याच्या जाड, हलक्या आणि टिकाऊ पानांचा उपयोग नावा व डोल्या यांवर बांधण्याकरिता आणि छपरे व हॅटकरिता करतात. फळांच्या सालीची बटणे करतात.

ऑस्ट्रेलियन फॅन पाम (लि. ऑस्ट्रेलिस ) व जावा फॅन पाम (लि. रोटुंडिफोलिया ) ह्या दोन विदेशी जातीही भारतात बागेत लावतात.           

पाटील, शा. दा. परांडेकर, शं.आ.

व्हेजिटेबल हेअर पाम : (इं. यूरोपीयन फॅन पाम, ड्वार्फ फॅन पाम लॅ. कॅमीरॉप्स ह्यूमिलिस कुल-पामी). हे लहान ताल क्षुप (तालाचे झुडूप) मूळचे उ. आफ्रिका व द. यूरोप (भूमध्य सामुद्रिक प्रदेश) येथील असून अमेरिकेत, भारतात व इतरत्र शोभेसाठी बागेत (वाफ्यात किंवा मोठ्या कुंडीत) लावतात. सर्व ताल वृक्षांत हे काटक असते. ग्रीक भाषेतील कॅमीरॉप्स   शब्दाचा अर्थ ‘खुजी फांदी’ असल्याने (तसेच ह्यूमिलिस  म्हणजेही खुजे किंवा लहान) त्याच अर्थाचे शास्त्रीय नाव बनले आहे. या झुडपात अनेक खोडे जवळजवळ वाढून त्यांचा झुबका बनतो आणि तेथून अनेक ताठर व लांब देठाची, हस्ताकृती, पण अपूर्णपणे विभागलेली पाने येतात. खोड सु. ३०-४५ सेंमी. उंच असते. पानाचे पाते तंतुमय, देठाजवळ अर्धवर्तुळाकृती, तळाशी छेदित (सपाट कापल्यासारखे) दृढ आणि मध्याच्यावर विभागलेले असते. प्रत्येक खंड निमुळता, चूणित व टोकाशी चिरलेला असतो. देठावर बळकट, सरळ किंवा वाकडे काटे असतात. स्थूल कणिशे सरळ व आखूड असून फुले एकलिंगी, लहान व पिवळी आणि विभक्त झाडांवर येतात. फळ गोलसर, तळाशी तिकोनी, पिवळट किंवा पिंगट असून बियांतील पुष्क रेषाभेदित (सुपारीप्रमाणे) असतो इतर सामान्य शारीरिक लक्षणे पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या वनस्पतीचे आठ-नऊ प्रकार आढळतात. एक प्रकार ६ मी. पर्यंत उंच असतो. डॅक्टिलोकार्पा  प्रकाराचे फळ खारकेसारखे लांबट असते. बियांपासून किंवा अधश्चरांपासून नवीन लागवड करतात.

आ. ७. व्हेजिटेबल हेमर पामचे पान

भुसभुशीत व निचऱ्याची जमीन आवश्यक असते. पानांपासून निघणाऱ्या कुरळ्या धाग्यांचा उपयोग गाद्या, लोड, तक्के भरण्याकरिता आणि गालिचे, शिडाचे कापड इत्यादींकरिता करतात. त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे. धागा बळकट व लवचिक असल्याने ‘फ्लॅक्स कॉटन’ च्या [→अळशी अंबाडी] निर्मितीत उपयुक्त असतो. धाग्यांना ‘क्रिन व्हेजिटल’ म्हणतात. अल्जीरियातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धाग्यांची निर्यात होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत कित्येक हजार टन धाग्यांची दरवर्षी आयात केली जाते. कोवळ्या पानांची भाजी करतात, फळ स्तंभक असते.                    

जमदाडे. ज. वि.


सलाक पाम :  (इं. सलाक लॅ. सलाका एड्युलिस, झलाक्सिया एड्युलिस ). पामी कुलातील खाद्य फळांबद्दल प्रसिद्ध असलेला एक झुडूपवजा वृक्ष. हा मूळचा इंडोमलायातील असून याच्या वंशात (सलाकात ) दहा जाती आहेत. या वंशाचे जुने नाव झलाक्सिया  आहे. याची एक जाती (सलाका सेकंडा ) भारतात (आसामात) आढळते तिचीही फळे खाद्य आहेत.

सलाक पामचे खोड जमिनीवर फारसे दिसत नाही. मोठ्या पानांचा झुबका मात्र ठळकपणे दिसतो. या झुडपाची उंची सु. १.५-५ मी. पर्यंत असून पाने ४-७ मी. लांब व पिसासारखी आणि संयुक्त असतात. देठ लांब व काटेरी दले असंख्य व प्रत्येक दल २०-७० X २-७.५ सेंमी. व खालच्या बाजूस राखी हिरवे असते. पानांच्या मध्य शिरेवर १-३ दलांचे झुबके काहीसे समोरासमोर व परस्परांपासून अलग असतात. फुले सामान्यपणे वर्षभर येतात पण त्यातल्या त्यात ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये त्यांचा विशेष बहार असतो. फुलोरे लोंबते व पानांच्या बगलेत येतात. फुले एकलिंगी, लहान आणि स्वतंत्र झाडावर येतात. पुं-फुलोरा संयुक्त स्थूल कणिश प्रकारचा सु. ५०-१०० सेंमी. लांब असून कोवळेपणी सर्वच फुलोरा अनेक महाछदांनी वेढलेला असतो. त्यावर अनेक लहान खवलेही असतात. फुले त्रिभागी, लाल रंगांची व बिनदेठाची असतात. त्यात सहा केसरदले असतात. स्त्री-फुलोरा एक ते तीन कणिशांचा असून प्रमूख अक्ष १०-२० सेंमी. लांब व बाजूच्या फांद्या ७-१० सेंमी. लांब असतात त्या सर्वांवर २०-३० सेंमी. लांबीची मोठी छदे (वेष्टने) असतात. स्त्री-पुष्पातील पाकळ्या आतून गर्द लाल पण बाहेरच्या बाजूस पिवळट हिरव्या असून त्यांवर लालसर ठिपके असतात. सहा वंध्य केसरदलांचे तंतू सपाट, किंजल त्रिभागी व लालबुंद आणि किंजल्क चमच्यासारखे असतात [→फूल]. फळे काहीशी त्रिकोणी, गोलसर व काटेरी खवल्यांनी वेढलेली असून प्रत्येकात तीन कप्पे असतात. त्याचा रंग तपकिरी सोनेरी व आकारमान चिकूएवढे असून सालीच्या आत फणसासारखी चव असलेला, गोड मलईच्या रंगाचा नरम मगज असतो. जानेवारी ते एप्रिल हा फळांचा मोसम असतो. तथापि तो वर्षभर कमीजास्त प्रमाणात बाजारात मिळतो. बिया कठीण, २-३ सेंमी. लांब (वजन २-४.५ ग्रॅ.) गोलसर, एका बाजूस बहिर्वक्र (बाहेरच्या बाजूस वळलेली), चकचकीत आणि प्रत्येक फळात १-३ बिया असतात. पक्व फळात वजनाने प्रतिशत ग्रॅ. ०.४ प्रथिने, २०.९ कार्बोहायड्रेटे आणि ७८.० पाणी असते कॅल्शियम २८.० मिग्रॅ. व फॉस्फरस १८.० मिग्रॅ. व लोह ४.२ मिग्रॅ. शिवाय ब१ आणि क जीवनसत्त्वेही असतात. फळात असलेल्या प्रथिनांपैकी वजनाने ५०% खाद्य प्रथिने असतात स्निग्ध पदार्थ कमी असतात. फळाचे कॅलरीमूल्य सु. ७७ आहे.  

जावा, मलेशिया व सिंगापूर येथील उद्यानांतून याची बरीच लागवड आढळते. फळे चविष्ट व पौष्टिक असतात. भारतात अद्याप लागवड नाही. द. भारतातील ओलसर व दमट हवामानात या झाडांची वाढ चांगली होण्यास अडचण पडू नये, असे तज्ञांचे मत आहे. भारतात लागवड केल्यास ती फायदेशीर होईल, असाही अंदाज व्यक्त केला गेला आहे. बिया रुजण्यात अडचण नसते. भरपूर पाऊस, दमट हवा, छाया इ. पारिस्थितिक घटक वाढीस अनुकूल असतात. झाडाच्या तळाशी आलेल्या अधश्चरापासूनही अभिवृद्धी होते.

 आ. ८. सलाक पामकलकत्त्यातील रॉयल बोटॅनिकल गार्डन्समध्ये फक्त काही नर वृक्ष आहेत. कोणत्या बियांतून मादी वृक्ष येतील हे अद्याप निश्चितपणे सांगणे शक्य झालेले नाही. तथापि बियांच्या प्रायोगिक अंकुरणातून थोड्या बिया तरी मादी वृक्षांना जन्म देतील हे निश्चित. फुले येईपर्यंत वाट पाहून नंतर थोडे नर वृक्ष व अनेक मादी वृक्ष ठेवून बाकीचे काढून टाकावे लागतात. अभिवृद्धीकरिता पावसाळ्याच्या आरंभी केळींच्या आसपास (त्यांच्या सावलीत) बिया लावतात किंवा बियांची लागण अन्यत्र पन्हेरीत करून रोपे नंतर केळीखाली लावतात. बहुधा ज्या फळांत तीन बीजे बनतात त्यांपैकी बी लागवडीस वापरत नाहीत. कारण त्यातून जोमदार रोपे मिळत नाहीत. लागण करताना प्रत्येक रोप दुसऱ्यापासून भरपूर अंतरावर लावतात. कारण पुढे त्या प्रत्येकापासून झाडाचा झुबका बनतो. साधारणपणे फलधारणा कमी झाल्यास ती झाडे काढून टाकून नवीन लागवड करावी लागते. कोरड्या ऋतूत पाटाचे पाणी द्यावे लागते. पाणथळ जमीन व उन्हाचा ताप त्यांना सहन होत नाही. सकस जमीन उपयुक्तच असते परंतु ती निकस असल्यास खते द्यावी लागतात. फळ अतिपक्वावस्थेत तडकते व त्याची बाजारातील किंमत उतरते म्हणून अर्ध पक्वावस्थेतील फळे थोडी साखर व अधिक मीठ घातलेले पाणी यांसह डबे भरून व ते बंद करून बाहेर पाठवितात. अशा स्थितीत फळे घेऊन मक्केच्या यात्रेसही लोक जातात. एरवी कच्ची फळे (ती फारच आंबट असतात) मीठ टाकून शिजवून खातात किंवा स्वयंपाकात वापरतात. त्यांचे लोणचेही करतात.

 

 

पहा : पामी पामेलीझ.                             संदर्भ : 1. Corner, E. J. H. The Natural History of Palms, London, 1966.

             2. Cowen, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965.

             3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vols. V, VI, VII, New Delhi. 1959.

             4. Davis, T. A. Salak-a promising food-yielding palm for India, Science Reporter, March, 1975.

             5. Hill, A. F. Economic Plants, Tokyo, 1952.

             6. Santapau, H. Henry, A. N. A Dictionary of the Flowering Plants in India, New Delhi, 1973.

             7. Uphof, J.C. Th. Dictionary of Economic Plants, Lehre (Germany), 1968.

परांडेकर, शं. आ.