पॅगोडा : पवित्र बौद्ध धर्मीय वास्तुप्रकार. प्रामुख्याने आशिया खंडात आढळणाऱ्या या स्मारकवास्तू बौद्धाच्या व बौद्ध भिक्षूंच्या अवशेषांचे जतन करण्यासाठी बांधण्यात आल्या. पॅगोडा किंवा पागोडा हा शब्द मुळात ‘पागुडम्’ (अर्पित किंवा देणगी) या तमिळ शब्दावरून आलेला असावा. श्रीलंकेत ‘डागोबा’ ही सिंहली भाषेतील संज्ञा रूढ आहे. पॅगोड्याचा उगम प्राचीन भारतीय ⇨स्तूपातून झाला असावा. स्तूपाच्या धार्मिक उद्दिष्टांशी व वास्तूशैलीशी त्याचे निकटचे साधर्म्य आढळते. पहिल्या कनिष्काच्या कारकीर्दीत (इ.स. दुसरे शतक) पेशावर येथे बौद्धाच्या अवशेषांवर अनेक मजली लाकडी मनोरेवजा वास्तू बांधली गेली तिच्या प्रेरणेतून चीन, जपान, कोरिया, ब्रह्मदेश इ. ठिकाणी पॅगोडे निर्माण झाले असावेत. त्याच्या बांधकामासाठी मुख्यत: विटा तसेच दगड व लाकूड यांचा वापर करतात. गोल, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी वा अष्टकोनी यांपैकी एका आकाराच्या पायावर त्याच आकारात वरपर्यंत चढवत नेलेले आणि निमुळते होत जाणारे मजले व त्यावर कळस याप्रमाणे याचे अनेक रचनाबंध आढळतात. प्रत्येक मजल्याला पुढे झुकणारे छप्पर असते. चिनी पॅगोडे प्राचीन असून, त्यांची वास्तूशैली इ. स. ५०० च्या पूर्वीपासूनच विकसित झाली होती. त्यावर भारतीय व असिरियन मंदिर-वास्तूशैलींचा प्रभाव दिसतो. चिनी पॅगोडे प्राय: नऊ मजली वा त्याहूनही उंच असत व अष्टकोनाकृती पायांवर उभारलेले असत. गुंतागुंतीचे रचनाकल्प असलेल अलंकृत मजले हे त्यांचे वैशिष्ट्य होय. नानाकिंग येथिल ‘पॉर्सलिन टॉवर’ हा चीनमधील एक उल्लेखनीय पॅगोडा होय. हा चकाकणारा पॅगोडा नऊ मजली व सु. ७९·२५ मी. उंच होता. तो पंधराव्या शतकात उभारण्यात आला आणि १८५० च्या सुमारास नामशेष झाला. त्याच्या विटांच्या भिंती चिनी मातीच्या नाजुक रंगीत फरशांनी मढवलेल्या होत्या. चौकोनी पायावर उभारलेला तेरा मजली विटांचा पॅगोडा (सातवे शतक) हा चीनमधील एक अत्युच्च पॅगोडा होता. ब्रह्मदेशातील रंगून येथील ‘श्वे डागोन’ हा जगप्रसिद्ध आणि सर्वांत उंच (सु. ११२·१६ मी.) पॅगोडा होय. तो फार प्राचीन असून इ.स.पू. ५८८ मध्ये उभारला, असे मानले जाते. त्याचा आकार एखाद्या प्रचंड घंटेसारखा होता व त्यावर सोनेरी मुलामा चढवला होता. त्याची रचना व सजावट यांतून स्थानिक शैली प्रकर्षांने दिसून येते. चिनी धर्तीवरच जपानमध्ये अनेक आकर्षक लाकडी पॅगोड्यांची रचना झाली. त्यांपैकी काही पॅगोडे अजूनही पाहावयास मिळतात. त्यांपैकी एक सातव्या शतकातील चौरस पायावरील पाच मजली पॅगोडा होन्शू बेटावरील होर्यूजी येथे आहे. मुळात पॅगोडा हा विश्वरचनेचा प्रतीकरूप वास्तुकल्प म्हणून अवतरला. पॅगोड्याच्या वास्तुरचनेच्या गाभ्याशी असलेला भव्य स्तंभ हा स्वर्ग-पृथ्वीचा मध्य सांधणाऱ्या अदृश्य विश्वअक्षाचे प्रतिक मानले जाई. जपानमध्ये लाकडी पॅगोड्याच्या कोपऱ्यातील चार स्तंभ हे आकाशाचे खांब अद्यापही मानले जातात. ही विश्वरचनेची वास्तुशिल्पीय प्रतिकृती त्यात जतन करून ठेवलेल्या पवित्र अवशेषांमुळे सजीव होते, अशीही समजूत आहे.
पेठे, प्रकाश
“