पेंडसे, शंकर दामोदर : (२८ फेब्रुवारी १८९७ — २३ ऑगस्ट १९७४). मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या गावी. १९०८ साली लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली, त्या वेळी पेंडसे वाशिम येथील शाळेत शिकत होते. ह्या शिक्षेच्या निषेधार्थ ते शाळेत अनुपस्थित राहिले आणि एका जाहीर सभेत त्यांनी भाषणही केले. ह्या कृत्याबद्दल सरकारी हुकुमाने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी सरकारी शिक्षणसंस्थांकडे पाठ फिरवून तत्कालीन पाठशाळांतून आपले शिक्षण चालू ठेविले. त्यासाठी जळगाव, अमळनेर, काशी, कलकत्ता, दिल्ली, लाहोर इ. ठिकाणी जाऊन तत्त्वज्ञान आणि प्राच्यविद्या ह्यांचे सखोल अध्ययन त्यांनी केले, कलकत्त्यास ‘वेदान्ततीर्थ’ ही पदवी त्यांनी मिळविली (१९२०). दिल्लीच्या हिंदू कॉलेजातून ते बी.ए. झाले (१९२३). लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजातून एम्.ए. आणि एम्.ओ.एल्. (मास्टर ऑफ ओरिएंटल लर्निंग) ह्या संस्कृत व प्राच्यविद्या ह्या विषयांतील सर्वोच्च पदव्या त्यांनी मिळविल्या. त्यानंतर १९२५ साली लोकमान्य टिळकांचे भाचे धोंडोपंत विद्वांस ह्यांच्या कन्या चंद्राताई ह्यांच्याशी पेंडसे ह्यांचा विवाह झाला. १९२७ मध्ये नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पेंडसे ह्यांच्या पदव्या संस्कृतच्या असूनही त्यांचा मराठीतील लेखनाचा लौकिक लक्षात घेऊन ही नेमणूक करण्यात आली. पुढे १९३० मध्ये नागपूर विद्यापीठाची एम्. ए. परीक्षा मराठी हा विषय घेऊन ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व त्या वर्षीचे मराठीचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक मिळविण्याचा मान पण त्यांनी मिळवला. श्री ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हा प्रबंध लिहून त्यांनी १९३९ मध्ये नागपूर विद्यापीठाची पीएच्. डी. मिळविली. निवृत्त होईपर्यंत त्यांनी हिस्लॉप कॉलेजमध्येच मराठीचे प्रमुख म्हणून काम केले.
संस्कृत साहित्याचा आणि मराठी संतसाहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा असल्याने त्यांचे बहुतेक लेखन ह्याच विषयाशी संबंधित आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास (१९३१) या ग्रंथात त्यांनी ऋग्वेद-काळापासून रामदासकाळापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासाचे चित्र रेखाटले आहे. श्री ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान (१९४१) या आपल्या प्रबंधात त्यांनी संस्कृतातील गीता-भाष्यांशी ज्ञानेश्वरीची तुलना करून ‘भाष्यकाराते वाट पुसतु’ ह्या ज्ञानेश्वरांच्या वचनातील भाष्यकार शंकराचार्य हेच होत, असा सिद्धांत प्रतिपादन केला आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास (१९५४), मराठी संत-काव्य आणि कर्मयोग (१९६१), ज्ञानदेव-नामदेव (१९६९), भागवतोत्तम संत एकनाथ (१९७१), साक्षात्कारी संत तुकाराम (१९७२), राजगुरु समर्थ रामदास (१९७४) या त्यांनी लिहिलेल्या संतवाङ्म यविवेचक ग्रंथांतूनही त्यांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग आणि त्यांची रसिकता ह्यांचे दर्शन घडते. विशेषत: महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या पाच संतकवींच्या कार्याचे आपल्या विद्वात्तापूर्ण ग्रंथांमधून त्यांनी केलेले विवेचन आणि मूल्यमापन अतिशय मूलगामी झालेले आहे. वैदिक वाङ्म यातील भागवत धर्माचा विकास (१९६५) या ग्रंथात त्यांनी भागवत धर्म हे मूळच्या सूर्योपासनेचे विकसित रूप होय, हे साधार प्रस्थापित केले आहे. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेले पौराणिक भागवत धर्म (१९६७) हे पुस्तक उल्लेखनीय आहे. ह्याशिवाय त्यांचे स्फुट लेखनही बरेच आहे. त्यात ‘कर्मयोग की कर्मसंन्यास’, ‘टिळकांची धर्मविषयक मते’, ‘शिवकालीन संस्कृती व धर्म’, ‘मराठी राजकारणाचा आत्मा’, ‘विद्यापीठे व मातृभाषा’ इ. लेखांचा समावेश होतो. यांशिवाय राजगुरु समर्थ रामदास व त्यांचे आक्षेपक व श्री ज्ञानेश आणि शैवागम यांसारख्या लेखमालांचाही उल्लेख अवश्य करावयास हवा. या दोन्ही लेखमाला नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या आहेत. १९५३ मध्ये मोझरी येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते व १९५५ मध्ये पंढरपूर येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
अदवंत, म. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..