जावडेकर, शंकर दत्तात्रेय : (२६ सप्टेंबर १८९४–१० डिसेंबर १९५५). प्रज्ञावंत गांधीवादी भाष्यकार व एक तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते १९१२ साली मॅट्रिक व मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामधून ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन १९१७ साली बी.ए. झाले. एम्.ए.चा अभ्यास अर्धवट टाकून ते १९२० च्या गांधीच्या असहकारितेच्या चळवळीत पडले. त्या वेळी भारतीय राजकारणात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झाले होते. रशियामध्ये मार्क्सवादी राज्यक्रांती होऊन साम्यवादी राजवट सुरू झाली होती. जावडेकरांचे मन आणि बुद्धी अत्यंत जागरुक असल्यामुळे, त्यांनी गांधीवाद व मार्क्सवाद यांचे सखोल अध्ययन चालू ठेवले. गांधीच्या राजकीय चळवळीत त्यांना १९३० साली सहा महिने, १९३२–३३ साली पावणे दोन वर्षे, १९४२ च्या लढ्यात अडीच वर्षे कारागृहवास भोगावा लागला. कारागृहातच त्यांनी मार्क्सचा कॅपिटल, लास्कीचा अ ग्रामर ऑफ पॉलिटिक्स इ. ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांचा राजनीतिशास्त्रपरिचय हा ग्रंथ १९२६ साली प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी त्यांची पुणे येथील टिळक महाविद्यालयामध्ये इतिहास, अर्थशास्त्र आणि राजकारण हे विषय शिकविण्याकरिता नियुक्ती झाली आणि त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी मिळाली. स्वराज्य, नवशक्ति, लोकशक्ति या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून तसेच लोकशिक्षण, नंतर नवभारत (नवभारताच्या संपादकवर्गात ते होते), साधना, अखंड भारत या मासिकांतून त्यांनी विपुल लेखन केले. १९१९ ते १९५५ या काळात त्यांनी जे लेखन केले, त्यापासून अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व स्फूर्ती लाभली. १९४७ पर्यंत ते काँग्रेसचे सभासद होते. पुढे त्यांनी प्रजासमाजवादी पक्षास वाहून घेतले. त्यांनी गांधीवाद, मार्क्सवाद व इतर राजकीय व सामाजिक विषय यांवर मूलगामी विवेचन करणारे अनेक ग्रंथ लिहिले. १९४९ साली पुणे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. त्यांचे वास्तव्य सांगली (पूर्वीचा द. सातारा) जिल्ह्यातील इस्लामपूर येथे असे. इस्लामपूरला त्यांनी अस्पृश्यांकरिता एक शाळा चालविली होती. त्यांना दम्याचा विकार होता. त्यांचा समन्वयाचा दृष्टीकोन आणि आध्यात्मिक वृत्ती यांमुळे त्यांचे राजकीय लिखाणही फार सोज्वळ असे. ते अजातशत्रू होते. अनेक पक्षांचे कार्येकर्ते त्यांच्याकडे सल्ला व मार्गदर्शन यांकरिता जात. दम्याच्या विकाराने ते इस्लामपूर येथे निधन पावले.
जावडेकरांच्या ग्रंथांतील सर्वांत महत्त्वाचा व प्रमुख ग्रंथ म्हणजे आधुनिक भारत (१९३८). या ग्रंथात पेशवाईच्या अस्तापासून गांधीयुग स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हिंदुस्थानात, विशेषतः महाराष्ट्रात, ज्या वैचारिक चळवळी झाल्या, त्यांचे संपूर्ण समालोचन आणि स्वतंत्र भारताची रचना कोणत्या पद्धतीने व्हावी याची तात्त्विक रूपरेषा दिलेली आहे. आचार्य जावडेकर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात समरस झालेले असल्यामुळे, या ग्रंथातील विवेचनात जिव्हाळा आणि वैचारिकता यांचा उत्कृष्ट संगम झालेला दिसतो. आधुनिक भारताशिवाय त्यांचे इतर ग्रंथ म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षाची उत्क्रांती (१९२१), हिंदी राजकारणाचे स्वरूप (१९२४), विश्वकुटुंबवाद (१९२९), राज्यशास्त्रमीमांसा (१९३४), गांधीवाद (१९४२), काँग्रेस आणि महायुद्ध (१९४५), लोकमान्य टिळक व गांधी (१९४६), गांधी जीवनरहस्य (१९४६) इ. होत.
जावडेकर शेवटी गांधीवाद व मार्क्सवाद यांचा समन्वय साधणाऱ्या ‘सत्याग्रही समाजवाद’ या सिद्धांतावर स्थिरावले होते. भिन्न भिन्न विचारांचा समन्वय करणे ही त्यांची प्रकृती होती. त्यांनी राजकारणात १९२१ साली पदार्पण केले. तेव्हापासून १९३७ सालापर्यंत टिळकसंप्रदाय व गांधीसंप्रदाय यांच्यात तीव्र वैचारिक संघर्ष चालू होता. जावडेकर गांधीवादी असले, तरी त्यांनी आपल्या समन्वयी वृत्तीला अनुसरून असे निक्षून प्रतिपादन केले की, टिळकांच्या राजकारणाचा खराखुरा वारसा गांधींच्याच वाट्यास आला आहे. समाजक्रांतीचा मार्ग म्हणून गांधीवादाचा विकास समाजवादाच्या दिशेने व्हावा, समाजवादावाचून सत्याग्रहाचे (सत्याचा आग्रह व अन्यायाचे परिमार्जन) साफल्य होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे सर्वांभूती प्रेम करावयास सांगणाऱ्या अहिंसेशिवाय माणुसकीची बंधने पाळणे अशक्य असून, अहिंसाधिष्ठित मानवतेशिवाय केवळ मार्क्सवादाचा अर्थप्रदान दृष्टिकोन नवसमाजनिर्मितीसाठी अपुरा आहे, या कारणामुळे गांधीवाद आणि मार्क्सवाद यांच्या समन्वयावर अधिष्ठित झालेला ‘सत्याग्रही समाजवाद’ आवश्यक आहे, असा जावडेकरांच्या प्रतिपादनाचा आशय आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनसंस्था समाजवाद्यांच्या हाती सोपवून सत्याग्रही विचाराच्या व अहिंसक आचाराच्या मानवतावादी (गांधीवादी) सेवकांनी सत्तेपासून स्वतः दूर राहून विशुद्ध मार्गांनी जनतेला संघटित करण्याचे कार्य हाती घ्यावे, असा दृष्टीकोन शेवटी जावडेकरांनी प्रतिपादन केला होता. जावडेकरांचा पिंड अहिसंक असला, तरी वृत्ती क्रांतिकारकाची होती, हे त्यांनी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून आधुनिक साहित्याचा मानदंड म्हणून क्रांतिरसाचे जे विवेचन केले, त्यावरून सिद्ध होते. ‘ही क्रांतिरसाची कल्पना हे जावडेकरांच्या सूक्ष्म संवेदनाशील अशा नवसाहित्यविषयक सहृदयतेचे प्रमाण होय’ हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेले त्यांचे मूल्यमापन सार्थ ठरते.
नवभारत मासिकाच्या जावडेकर विशेषांकात (मे १९४९) व कै. जावडेकर : विविध दर्शन या अंकात (जानेवारी १९५६) तसेच साधना साप्ताहिकाच्या जावडेकर विशेषांकात (१७ डिसेंबर १९५५) त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची चांगली माहिती दिलेली आहे.
बेडेकर, वि. म.
“