जामी : (७ नोव्हेंबर १४१४–९ नोव्हेंबर १४९२). फार्सी वाङ्मयसृष्टीतील शेवटचा महान अभिजात कवी. खोरासान प्रांतातील जाम जिल्ह्यामध्ये जन्म. जन्मस्थळावरून ‘जामी’ ओळखला जाई नूरुद्दीन अब्दुर्रहमान इब्न अहमद हे पूर्ण नाव. त्याचा इस्लामी शास्त्रांच्या सर्व शाखांशी परिचय असल्यामुळे काव्यशास्त्र, गद्यवाङ्मय आणि सूफीवाद यांवर त्याने अधिकाराने ग्रंथलेखन केले. सूफी पंथाच्या ‘नक्शबंदी’ शाखेतील प्रख्यात संत ख्वाजा मोहमद पारसा यांच्या प्रभावामुळे तो सूफी झाला. १४७८ मध्ये त्याने रचलेला नफहातुलउन्स हा सूफी संप्रदायावरील विश्वसनीय ग्रंथ होय. या ग्रंथात ६१६ गूढवादी विद्वान, संत व कवी यांची चरित्रे आहेत. जामी याचा लवाएह (इं. भा. फ्लॅशेश ऑफ लाइट, १९०६) हा ग्रंथ त्याचा पूर्वकालीन सूफी कवी इराकी याच्या लमआतवरील भाष्य आहे. त्याचा बहारीस्तान (छोट्या बोधकथांचा संग्रह) म्हणजे सादीच्या गुलीस्तानचे अनुकरण होय. जामीचे कवितालेखनही गद्यवाङ्मयाइतकेच महत्त्वाचे आहे. सादी, निजामी, हाफिज, अमीर खुसरौ इ. पूर्वसूरींचा त्याच्यावर प्रभाव असला, तरी त्याने स्वतःची अशी खास शैली कमावली होती. त्याचे तीन ‘दीवान’ म्हणजे कवितासंग्रह (१४७९–९१) प्रसिद्ध असून त्यांत त्याच्या उद्देशिका व भावकविता संगृहीत आहेत. त्याने ‘कसीदा’ आणि ‘गझल’ या प्रकारांतही काव्यनिर्मिती केली तसेच सात ‘मस्नवी’ (खंडकाव्य वा दीर्घकाव्य) लिहिल्या. हफ्त औरंग म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यातील यूसुफ व जुलैखा ही दंतकथेच्या स्वरूपाची गूढवादी प्रणयकाहणी सर्वांत अधिक प्रसिद्ध आहे. तिचे राल्फ टी. एच्. ग्रीफिथ यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे (१८८२). हेरात येथे त्याचे निधन झाले.
नईमुद्दीन, सैय्यद