जवाशीर : हा डिंकासारखा पदार्थ इराणातील फेरूला गॅल्बनिफ्लुआ या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) उंच ओषधीय [→ ओषधि] वनस्पतीपासून मिळतो. फेरूला वंशातील अनेक जाती भूमध्यसामुद्रिक प्रदेश व मध्य आशिया या भागांत आढळतात. काही जातींपासून ओलिओरेझिने मिळतात व त्यांना व्यापारी महत्त्व आले आहे कारण त्यांचा उपयोग मसाला व औषधे यांत होतो. त्यांपैकी हिंग, जवाशीर व संबळ यांची इराण व अफगाणिस्तान येथून भारतात आयात होते व नंतर त्यातील काही भाग परत इतरत्र निर्यात होतो. फेरुलाच्या तीन-चार जाती भारतात आहेत : फे. नार्थेक्स [→ हिंग]. फे. ॲसाफेटिडा, फे. गॅल्बनिफ्लुआ, फे. जीस्कियाना. त्यांचा प्रसार पंजाब, काश्मीर, वायव्य प्रदेश या ठिकाणी आहे. ‘गौशीर’, ‘गाओशीर’ आणि ‘गंधबिरोजा’ ही जवाशीरची इतर व्यापारी नावे असून इंग्रजीत त्याल ‘गॅल्बॅनम’ म्हणतात. फेरूला वंशाचा अंतर्भाव चामर कुलात (अंबेलिफेरी) असून त्यातील जातींची सामान्य लक्षणे त्या कुलात [→ अंबेलेलीझ] वर्णिल्याप्रमाणे आहेत. फुलोरा चामरकल्प (चवरीसारखा), फुले लहान व पिवळी पाने संयुक्त, पिच्छकल्प व बरीच विभागलेली आणि फळे लहान व पालिभेदी [फुटून स्वतंत्र भाग होणारी, → फळ] असतात. प्रधान मूळ जाडजूड व मांसल असते. हिंगाप्रमाणेच जवाशीरचे उत्पादन मुळाच्या वरच्या टोकास (व खोडाच्या तळाशी) छाट देऊन व पाझरणारा चीक जमा करून होते. हा पदार्थ रंगाने पिवळट किंवा पिंगट असून त्याचे डिंकासारखे खडे (५–१० मिमी. व्यासाचे) बनतात. उन्हाने तो नरम होऊन त्याचे पुंजके बनतात. सु. ३७·७५° से. उष्णता देऊन तो पातळ करून गाळता येतो. त्यात राळ, डिंक व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. जवाशीरमधील रेझिनामध्ये (५०–७० टक्के) अंबेलिफेरॉन, गॅल्बरेझिनो टॅनॉल, गॅल्बरेसिनिक अम्ल इ. असतात. जवाशीर कडवट व तिखट असून त्याला उग्र सुगंध येतो. तो उत्तेजक, वायुनाशी, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारा) व आचके बंद करणारा असून गर्भाशयाला पुष्टिकारक असतो. दाहयुक्त (आग होणारी) सूज आल्यास त्याचा लेप लावतात. सुगंधी द्रव्यांत (तेले, अत्तरे, साबण इ.) त्याचा मर्यादित वापर करतात. फेरूला रुब्रिकौला या जातीपासूनही जवाशीर मिळतो. ‘संबळ’ या नावाने इराणातून आलेले मुळांचे तुकडे मिळतात. ते काळसर उदी व सुवासिक असतात ते ज्वरात व दम्यात देतात. फेरूला संबल या जातीपासून ते काढतात. फेरूला जीस्कियाना या जातीचा पाला काश्मीरात जनावरांना चारा म्हणून घालतात.
पोतनीस, शा. कृ.