छप्पर : छप्पर म्हणजे वास्तूच्या शिरोभागी असणारे आवरण होय. छपरामुळे ऊन, पाऊस आणि वारा यांपासून संरक्षण मिळते. छप्परामुळेच वास्तूला अवकाशनिर्मितीचे स्वरूप प्राप्त होते. केवळ चार भिंतीच बांधून अवकाशकल्पना साकार होऊ शकत नाही परंतु चार खांबांवर उभारलेल्या नुसत्या छप्परानेही ती साकार होऊ शकते. छप्परामुळेच मुख्यतः वास्तूचे बाह्यांग साकार होऊ शकते. वास्तूची भव्यता, सौंदर्य आणि मजबुती हे गुण प्रामुख्याने छप्पररचनेवरच अवलंबून असतात.
भौगोलिक परिस्थिती, स्थानिक हवामान, नैसर्गिक साधनसामग्री व सामाजिक कल्पना इत्यादींचा छप्पररचनेवर विशेष प्रभाव पडलेला आढळतो. भरपूर पर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशातील घरांची छप्परे उतरती असतात, तर कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशातील घरांची छप्परे धाब्याची असतात तथापि नैसर्गिक परिस्थितीच्या गरजा लक्षात घेऊनही आधुनिक वास्तुकलेत छप्पराचा आकार, रचना, साहित्य इ. घटक वास्तुगुणांना पोषक ठरतील याची दक्षता घेतली जाते.
छप्परासाठी प्राचीन काळापासून झाडांच्या साली, पाने, फांद्या, गवत, बांबू वगैरेंचा उपयोग केला जात असे. लाकूड हे पहिल्यापासून छप्पररचनेचे प्रमुख साहित्य म्हणून जगभर उपयोगात आणले गेले. लाकडाच्या सांगाड्यावर मातीची कौले, धातूचे पत्रे यांसारखे आवरण घालण्याची पद्धत अनेक ऐतिहासिक वास्तूंत आढळते. तसेच दगडी घुमट अथवा धाब्याची छप्परेसुद्धा आढळतात. ईजिप्तमधील दगडी पिरॅमिड, सुमेरमधील विटांचे झिगुरात, संगमरवरी ग्रीक देवालये, भव्य रोमन प्रासाद, मध्ययुगीन यूरोपातील दगडी चर्च इ. विभिन्न वास्तूंची छप्परे त्या त्या देशांतील संस्कृतीची प्रतीके आहेत. यंत्रयुगातील प्रगतीमुळे लोखंड, सिमेंट, ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक आदी साहित्याचा वापर आधुनिक वास्तूंच्या छप्परांत केला जातो. या नवीन साहित्यामुळे तसेच यंत्रसामग्रीमुळे छप्परांच्या बांधकामात व विविधतेत खूप प्रगती झाली आहे. सिमेंटच्या वापरामुळे तसेच लोखंडी कैच्या व तुळ्यांमुळे प्रशस्त व भव्य वास्तूंवर मधे खांब न घेता छप्परे घालणे सहज शक्य झाले आहे. तसेच अनेकमजली वास्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. प्लॅस्टिक छतरचनेमुळे तर केवळ आतील हवेच्या दाबावर नियंत्रण ठेवून अतिभव्य वलयाकार अवकाशनिर्मिती अगदी कमी खर्चात करता येणे शक्य झाले आहे.
छप्परावर वास्तूचे खरे सौंदर्य कसे अवलंबून असते, याची साक्ष प्राचीन मंदिरांची शिखरे, मशिदींचे घुमट आणि चर्चची सुळकेवजा छप्परे देतात. याचीच आणखी उदाहरणे आधुनिक वास्तुनिर्मितीमध्येही आढळतात. सिडनी येथील ऑपेरा हाउसच्या वास्तूचे अलौकिक सौंदर्य केवळ तिच्या शिडासारख्या काँक्रीटच्या छप्परामुळेच निर्माण झाले आहे. छप्परांच्या विविध आकारांवरून काही प्रतिभाशाली वास्तुतज्ञांनी त्या त्या वास्तूचे कार्य मोठ्या प्रतीकात्मक रीतीने दर्शविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. न्यूयार्कच्या जॉन केनेडी विमानतळाच्या छप्पराची रचना एअरो सारिनेन या वास्तुतज्ञाने आकाशात झेपावणाऱ्या विमानाच्या आकाराची केलेली आहे. बकमिन्स्टर फुलर या विख्यात अमेरिकन वास्तुतज्ञाने सु. ७० मी. व्यासाचे अल्पांतरी घुमटाकृती छप्पर माँट्रिऑल येथील प्रदर्शनात उभारले होते. ह्या घुमटाचे आच्छादन प्लॅस्टिकच्या पारदर्शक आवरणाचे होते. नेर्वी या इटालियन वास्तुतज्ञाने रोममध्ये व केन्झो टांगी या जपानी वास्तुतज्ञाने टोकीओमध्ये उभारलेल्या वास्तूंची छप्परे तसेच अलीकडे म्यूनिक येथील ऑलिंपिक सामन्यांसाठी निर्माण केलेल्या वास्तूंची छप्परे अतिशय नावीन्यपूर्ण आहेत. छप्परनिर्मितीमुळे वास्तूच्या बाह्य बाजूचे तसेच अंतर्भागाचेही सौंदर्य वाढते. आधुनिक काळात छप्पररचना हे वास्तुसौंदर्याचे एक प्रमुख अंग मानण्यात येते.
देवभक्त, मा. ग.
“