छत्रे, विष्णुपंत मोरोपंत : (१८४० – १९०६). भारतीय सर्कसचे जनक. जन्म तासगावजवळील अंकलकोप गावी. पटवर्धनांचे आश्रित. बालपणापासून पशुपक्ष्यांशी खेळण्याची आवड. पुढे रामदुर्गकरांकडे घोड्याच्या पागेवर नोकरी. नंतर ग्वाल्हेरला बाबासाहेब आपटे यांच्या आश्रयास राहून गायनाचे शिक्षण. १८७५ साली मुंबईला चेअर्नी विल्सन यांची सर्कस प्रथम पाहिली. त्यावरून प्रेरणा घेऊन १८७८ साली सांगलीस पटवर्धनांचे साहाय्याने छत्रे सर्कसची स्थापना. स्वतः उत्कृष्ट अश्वशिक्षक असल्याने त्यांनी घोड्यांची अनेक उत्कृष्ट कामे सर्कशीत बसविली. १८८४ मध्ये विल्सन सर्कसच खरेदी करून अनेक यूरोपीय कलाकार चाकरीस ठेवले. अपल्या सर्कसचा भारतभर आणि भारताबाहेरही दौरा काढून नाव व पैसा मिळविला. १९०१ साली इंदूरचे नरेश शिवाजीराव होळकर यांच्या नाठाळ घोड्याला, अवघ्या सोळा तासातच सर्कशीतील घोड्याप्रमाणे निपचित पडण्याचे काम शिकविले. आपले कनिष्ठ बंधू काशीनाथपंत यांच्या स्वाधीन सर्कस करून शेवटचे दिवस त्यांनी ऐशआरामात घालविले. मधुमेहाच्या विकाराने इंदूर येथे त्यांचे निधन झाले.
कार्लेकर, शि. शं.
“