चौलमुग्रा : (लॅ. हिद्नोकार्पस कुर्झी, टॅरॅक्टोजेनोस कुर्झी कुल – फ्लॅकोर्टिएसी). हा सु. १२—१६ मी. उंच व लोंबत्या फांद्यांचा सदापर्णी वृक्ष असून तो आसाम, त्रिपुरा, चितगाँग, सिल्हेट व ब्रह्मदेश येथे सदापर्णी जंगलात, कधीकधी संघाने वाढलेला आढळतो. याचे कोवळे भाग केसाळ असून साल तपकिरी किंवा काळी व तीवर पांढरे ठिपके आणि आतून ती पिवळट असते. पाने साधी, एकाआड एक, आयत किंवा लंबवर्तुळाकृती, १६—२० सेंमी. लांब, जाड व चिवट असतात. फुले लहान, द्विलिंगी, पिवळसर व पानांच्या बगलेत वल्लरीवर येतात क्वचित एकलिंगी व भिन्न झाडांवर येतात [⟶ फ्लॅकोर्टिएसी ]. मृदुफळे पिंगट, गोलसर, कोचदार असून त्यांचा व्यास ७·५० सेंमी. असतो साल जाड, कठीण व मखमली असते. बिया अनेक, तपकिरी, सु. २·५ सेंमी. लांब व सपुष्क असतात त्यांपासून काढलेले तेल (चौलमुग्रा तेल) चर्मरोग व कुष्ठ यांवर बाहेरून लावण्याचे प्रसिद्ध औषध आहे. बियांत ४८—५५ % तेल असते.
फुलोरे अनियमितपणे येतात साधारणतः दर दोन-तीन वर्षांनी प्रत्येक वृक्षाला सु. ३०० फळे येतात. बिया फार टिकत नाहीत. तेल पिवळट असून त्याला शिळ्या लोण्यासारखा विचित्र वास येतो आणि तिखट चव असते. २५० से. तापमानाखाली ते गोठते बेंझीन, क्लोरोफॉर्म आणि ईथर यांत ते विरघळते. बियांची पेंड तिच्यातील विशिष्ट ग्लायकोसाइडामुळे गुरांना चालत नाही, पण तिचे खत उपयुक्त असते. सिक्किममध्ये फळांतील मगज (गर) पाण्यात उकळून नंतर खातात. मगज मत्स्यविष आहे. रानटी डुकरे फळे खातात, परंतु अशा डुकरांचे मांस खाणे धोक्याचे असते. बियांतील मगज मासे खातात आणि मरतात, परंतु ते मासे खाद्य नसतात. वृक्षाची टॅनीनयुक्त साल तापावर देतात.
थीओफिलस, एस्. सी. (इं.) परांडेकर, शं. आ. (म.)
“