चौधरी, बहिणाबाई : (?१८८० – ३ डिसेंबर १९५१). मराठी कवयित्री. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे ह्या गावी झाला. त्या निरक्षर होत्या
तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी वेळोवेळी त्या तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर ह्या कविता आचार्य अत्रे ह्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यांनी त्या प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृ. १९६९) प्रसिद्ध झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग ’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रात बोलबाला झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.
बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. माहेर, संसार शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे काही परिचित व्यक्ती, असे त्यांच्या कवितांचे विषय.
‘नही वाऱ्यानं हाललं । त्याले पान म्हनूं नही’ यासारखी सुभाषिते, ‘मानसा मानसा । कधीं व्हशील मानूस’ सारखे तात्त्विक बोल आणि
बरा संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर ।
आंधी हाताले चटके
तव्हां मियते भाकर ।।
ह्यासारखे दृष्टान्त त्यांच्या कवितांतून येतात. त्यांनी त्या कवितेला तिचे विलोभनीय रूप दिले आहे. जळगाव येथे त्या निधन पावल्या.
जोग, रा. श्री.
“