चोरघडे, वामन कृष्ण: (१६ जुलै १९१४ — ). प्रसिद्ध मराठी कथाकार. जन्म नागपूर जिल्ह्यातील नारखेड या गावी. शिक्षण नागपूर येथेच. मराठी व अर्थशास्त्र हे दोन विषय घेऊन एम्.ए. आणि बी.टी. ह्या पदव्या मिळविल्यावर त्यांनी १९४९ पर्यंत वर्धा येथील महाविद्यालयात अध्यापन केले. त्यानंतर काही काळ नागपूर येथील ‘जी. एस्. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स’ येथे उपप्राचार्य म्हणून काम केले. त्यानंतर ‘महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळा’चे संचालक. नागपूर  विद्यापीठात १९४६ ते ७० पर्यंत विद्यासभा, कार्यकारिणी आदी वीस समित्यांवर त्यांनी काम केले आहे. गांधीवादाचा त्यांच्या विचारावर प्रभाव असून १९४२ च्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला.

 

१९३२ मध्ये ‘अम्मा’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर पारिजात, प्रतिभा, सत्यकथा, ज्योत्स्ना, कला  इ. विविध वृत्तींच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांनी प्रामुख्याने कथालेखन केले. सुषमा (१९३६) हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर हवन (१९३८),यौवन (१९४१),प्रस्थान (१९४५),पाथेय (१९४६),संस्कार (१९५०),प्रदीप (१९५४),ओंजळ (१९५७),मजल (१९६३),बेला (१९६४),ख्याल (१९७३) इ. त्यांचे अन्य कथासंग्रह प्रसिद्ध झाले.

 

चोरघडे स्वतःस जीवनाचे उपासक समजतात, तथापि ‘कलेसाठी कला’ या भूमिकेचा त्यांनी पुरस्कार केला आहे. आत्मप्रकटीकरणासाठी कथा हेच माध्यम त्यांना आवडते. चोरघडे हे फडके-खांडेकर युगातील कथा आणि नवकथा यांतील एक मोलाचा आणि महत्त्वाचा दुवा होत. काव्यात्म वृत्तीने लिहिलेली त्यांची कथा फडके-खांडेकर युगातील कथेला सांकेतिकतेच्या बंधनातून मुक्त करू शकली. जे भोगले तेच त्यांच्या कथेतून अवतरले. त्यांची कथा म्हणजे भावस्थितीचे क्षणचित्र होय. ‘विहीर’,‘घार’,‘काचेची किमया’,‘अतिथी देवो भव’,‘संस्कार’ इ. कथांतून स्वतःचे असे वेगळे विश्व त्यांनी उभे केले सामर्थ्य आहे. नव्या शैलीच्या त्यांच्या कथांत वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य  आहे.

‘लोकसाहित्य’ हा त्यांच्या व्यासंगाचा विषय. साहित्याचे मूलधन (१९३८) हे या व्यासंगाचे फळ. चंपाराणी,प्रभावती,अबोली,भाग्यवती  . त्यांनी निवेदिलेल्या लोककथा पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या आहेत (अनुक्रमे १९४४, १९४५, १९५०). त्यांचे अन्य लेखन असे :अहिंसेची साधना (१९४५) व अहिंसा विवेचन (१९४९) हे दोन अनुवादित ग्रंथ,आमच्या देशाचे दर्शन (१९४३),भक्तिकुसुमे (१९४४) आणि लाटांचे तांडव (१९४५) या नावांनी काका कालेलकरांच्या स्थलवर्णनपर ग्रंथांचे अनुवाद (माधव सावंत ह्यांच्यासह) आणि माझे घर (१९४६) हे घरआखणी या विषयावरील अनुवादित पुस्तक. काळ बदलला आहे (१९४८) हा त्यांच्या संकीर्ण लेखांचा संग्रह असून काका कालेलकर, साने गुरुजी, नरकेसरी अभ्यंकर यांची चरित्रेही त्यांनी लिहिली आहेत. माधव सावंत ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक मराठी-हिंदुस्तानी कोश  संपादित केला आहे (१९४३). त्यांच्या आजवरच्या स्वतंत्र, अनुवादित-संपादित ग्रंथांची संख्या ७४ इतकी आहे.

त्यांच्या प्रदीप  आणि पाथेय  ह्या कथासंग्रहांना मध्य प्रदेश शासन साहित्यपरिषदेचे पारितोषिक मिळाले (१९५४-५५). चोरघडे यांची कथा  ह्या संग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले (१९६१-६२). संपूर्ण चोरघडे  ह्या संग्रहास १९६६ च्या प्रवासी वंग साहित्य संमेलनात ‘युगांतर’ पारितोषिक मिळाले. ह्याच ग्रंथास नागपूर विद्यापीठानेही सुवर्णपदक देऊन गौरविले (१९६७).

फडके, भालचंद्र