तेलुगु लिपि : आंध्र प्रदेशात प्रमुख असलेली तेलुगू भाषा लिहीण्यासाठी तेलुगू लिपीचा उपयोग करतात. कन्नड आणि तेलुगू या दोन्ही लिपींचे प्राचीन काळापासून जुळ्या बहिणीसारखे नाते असल्यामुळे विद्वानांनी ‘तेलगू–कन्नड’ असे जोडनावच अकराव्या शतकापर्यंतच्या लिपीला दिले. त्यामुळे ⇨ कन्नड लिपीचा जो प्राचीन इतिहास तोच तेलुगूचाही इतिहास आहे. प्रचलित कन्नड आणि तेलुगू लिपींमध्ये बरीच अक्षरे सारखी आहेत परंतु ‘उ’,‘ऊ’,‘ऋ’, ‘क’ ‘त’,‘स’,‘ह’ या अक्षरांमध्ये मात्र फरक आहे. कन्नडप्रमाणेच तेलुगू लिपीमध्ये ‘ए’, ‘ओ’ या स्वरांची ऱ्हस्व आणि दीर्घ अशी दोन दोन रूपे आहेत. यांशिवाय ‘ऋ’चे दीर्घरूप ‘ऋ’ आणि ‘ल’ चे दीर्घरूप ‘लृ’ हे स्वर तीत आहेत. जोडाक्षरांच्या बाबतीत प्रत्येक व्यंजनाला तीत स्वतंत्र चिन्ह असते. देवनागरी लिपीप्रमाणे ‘सत्कार’ हा शब्द लिहिताना ‘त्’ हलन्त लिहून ‘त्’ ला ‘क’ हे अक्षर जोडून त्या जोड अक्षराला ‘आ’ चा उभा दंड लावतात परंतु तेलुगू लिपीमध्ये ‘त’ हे अक्षर संपूर्ण लिहितात त्यालाच ‘आ’कारचिन्ह जोडतात आणि नंतर ‘क’ या अक्षराचे हलन्त चिन्ह जोडतात. ‘तेलुगू’ या शब्दांची व्युत्पत्ती ‘त्रिलिंग’ या देशविशेषनामापासून आहे. तेलुगूचे प्राचीन वळण पाचव्या शतकापासून आढळते. पल्लव, कदंब, पश्चिमेकडील व पूर्वेकडील चालुक्य तसेच गंग आणि काकतीय या वंशातील राजांच्या शिलालेखांतून व ताम्रपटांतून प्राचीन तेलुगू वळणाची लिपी आढळून येते.
संदर्भ : 1. Buhler, Georg, Indian Paleography, Calcutta, 1962.
२. ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९.
गोखले, शोभना ल.
“