गुरू तेगबहादुर

तेगबहादुर : (? १६२१–११ नोव्हेंबर १६७५). शिखांचे नववे गुरू. सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वांत धाकटे पुत्र व शेवटचे दहावे गुरू ⇨ गोविंदसिंग यांचे पिता. तेगबहादुरांचा जन्म पंजाबमध्ये अमृतसर येथे झाला. मातेचे नाव नानकी. वयाच्या आठव्या वर्षी कर्तारपूर येथील लालचंदजी खत्री यांची कन्या गुजरी हिच्याशी तेगबहादुरांचा विवाह झाला. त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहानपणीच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. गृहस्थ असूनही ते वडिलांच्या मृत्यूनंतर बकाला येथे जाऊन विरक्तवृत्तीने राहू लागले. शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्यूनंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसविले. तथापि त्यांचा भाऊ धीरमल व इतरांनी त्यांच्याशी गादीसाठी संघर्ष सुरू केला. नंतर तेगबहादुर अमृतसरला गेले, तेव्हा मसंदांनी (शीख धर्मप्रसारकांनी) हरमंदिराचा आधीच ताबा घेतला होता व तेथे भ्रष्टाचार माजविला होता. नंतर तेगबहादुर आपल्या वडिलांच्या गावी, किरतपूर येथे गेले. तेथेही त्यांना मसंदांनी व भाऊ बंदांनी खूप त्रास दिला. तेव्हा त्यांनी स्वतःसाठी शिवालिक पर्वतराजीत एक नगर वसविले आणि तेथे आपली गादी स्थापून ते धर्मप्रचारासाठी यात्रा करू लागले. हे नगर आनंदपूर म्हणून पुढे शिखांचे प्रसिद्ध व पवित्र क्षेत्र बनले. पाटणा येथे त्यांची दुसरी पत्नी गुजरी प्रसूत होऊन पुत्ररत्न झाल्याची वार्ता त्यांना आसामात कळली. हाच मुलगा पुढे शिखांचा दहावा व शेवटचा गुरू गोविंदसिंग म्हणून प्रसिद्धीस आला. तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदुंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली. औरंगजेबला अर्थातच हे खपले नाही. त्याने काश्मीरच्या सुभेदारास तेथील सर्व हिंदूंना मुसलमान करण्याचा आदेश दिला. अशा वेळी तेगबहादुरांनी हिंदूंचे नेतृत्व केले. औरंगजेबाने त्यांना आग्रा येथे कैद केले व दिल्लीस आणून चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद केला. तेगबहादुरांचे शिर जैना नावाच्या एका भंग्याने पळवून आनंदपूरला आणले. तेगबहादुरांचे वधस्थान आज ‘सीसगंज गुरुद्वारा’ म्हणून प्रसिद्ध असून पवित्र मानले जाते. तेगबहादुरांच्या ह्या बलिदानाने सर्व पंजाब पेटून उठला. स्वधर्म व स्वाभिमान यांच्या रक्षणार्थ हजारो शीखवीर पुढे आले. तेगबहादुर शूर, साहसी पण मनाने अत्यंत कोमल व क्षमाशील होते.

विविध विषयांवर रचलेले तेगबहादुरांची ११६ पद्ये उपलब्ध आहेत. ही पद्ये पुढे गुरू गोविंदसिगांनी ग्रंथसाहिबात अंतर्भूत केली. यांतील ५९ पद्ये ‘शब्द’ (स्ताेत्रे) आणि ५७ पद्ये ‘श्लोक’ आहेत. त्यांच्या रचनेत वैराग्य व क्षमाशील वृत्तीचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो.

अहिंसा व सत्याचा प्रेषित असलेल्या तेगबहादुरांनी धर्मासाठी बलिदान करून मानवी स्वातंत्र्याचा व स्वतःस पटेल तो धर्म आचरण्याचा आदर्श शीख धर्मात घालून दिला. त्यांच्या बलिदानाने शीख धर्मात जी अस्मिता निर्माण झाली तिला इतिहासात तोड नाही. तेगबहादुरांची तीनशेवी पुण्यतिथी १९७५ मध्ये भारतभर मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली.

संदर्भ : 1. Puran Singh, The Book of the Ten Masters, London, 1926.

   २. ठासूर, ईश्वरसिंघ, शीखपंथदर्शन, पुणे, १९६९.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)