धम्मपाल : (सहावे शतक ?). बौद्ध अट्ठकथाकार. त्याचा जन्म बहुधा कांचीपुर येथे किंवा त्याच परिसरात झाला असावा. द. भारतातील नेगापट्टन येथील बदरतित्थ (पदरतित्थ असाही ह्या नावाचा एक पर्याय) ह्या विहारात त्याचे वास्तव्य होते. बौध्दांच्या त्रिपिटकातील सुत्तपिटकांतर्गत खुद्दकनिकायनामक पंधरा ग्रंथांच्या समूहातील उदान, इतिवृत्तक, विमानवत्थु, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा आणि चरियापिटक एवढ्या ग्रंथांवर धम्मपालाने अट्ठकथा लिहिल्या आहेत. महाकच्चायनाच्या नेत्तिपकरणावरही त्याने अट्ठकथा लिहिली आहे. बुद्धघोषाच्या विसुद्धिमग्ग नामक ग्रंथावर परमत्थमंजूसा हि टीका त्याने लिहिली. दीघनिकाय, संयुत्तनिकाय, जातक आणि बुद्धवंस ह्या ग्रंथांच्या अट्ठकथांवरही टीका आहेत. त्यांचाही लेखक धम्मपालच आहे. तथापि वरील अट्ठकथा लिहिणारा आणि ह्या टीका लिहिणारा धम्मपाल एकच आहे, की एकाच नावाचा त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, ह्याबद्दल शंका प्रदर्शित केली जाते.
बुद्धघोषाप्रमाणे धम्मपालही श्रीलंकेत गेला होता असे दिसते. त्याच्या ग्रंथांतून त्याच्या व्यासंगाची आणि बहुश्रुतपणाची कल्पना येऊ शकते तसेच त्यांतून तत्कालीन समाजिक, धार्मिक, नैतिक व तात्त्विक कल्पनांवर प्रकाश पडतो. धम्मपालाच्या ग्रंथांतून विषुतिमग्ग, अठ्ठसालिनी, नेत्ती, पेटक ह्यासारख्या ग्रंथांचे उल्लेख वा त्यांतील उद्धरणे येतात: कणाद आणि कपिल ह्यांची मतेही तो देतो एके ठिकाणी भगवद्गीतेतील ‘वासांसि जीर्णानि यथा..ह्या’ श्लोकाचा प्रतिसाद वाटण्यासारखी एक गाथाही आलेली आहे.
बापट, पु. वि.