द्रायु-तार्किक : (द्रायुक, फ्लुइडिक्स). ही संज्ञा द्रायुप्रवाह तार्किक या शब्दांचा संक्षेप करून बनविली आहे. द्रायू म्हणजे द्रव अथवा वायू. तार्किक किंवा तार्किक साधन म्हणजे ज्या साधनाला विशिष्ट संकेतांचे आदान केले असता (दिले असता) त्यापासून ठराविक संकेतांचेच प्रदान होते (ठराविक संकेत मिळतात) असे साधन. स्वयंचलित यंत्रणांत अशा साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. द्रायुप्रवाहाच्या गुणधर्मांवर आधारलेली तार्किके व त्यांचे तंत्र याला द्रायु-तार्किक किंवा द्रायुक असे म्हणतात.
स्वयंनियंत्रणासाठी आणि संवेदन, गणन व चालन यांसाठी यांत्रिक, विद्युत व इलेक्ट्रॉनीय साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच कार्यासाठी द्रायु-तार्किक हे अत्यंत अभिनव साधन आता तंत्रज्ञांना उपलब्ध झाले आहे. या साधनांच्या मूलभूत तत्त्वांच्या अभ्यास फार पूर्वीच झालेला असला, तरी त्यांच्या व्यावहारिक उपयोगाची सुरुवात १९६० सालाच्या सुमारास झाली. अशा तऱ्हेने हे तंत्र सध्या अगदी बाल्यावस्थेत असले, तरी त्याच्या विकासाचा वेग इतका आहे की, द्रायुक हा विसाव्या शतकातील एक महत्त्वाचा शोध ठरू पहात आहे.
फायदे : द्रायुक साधनाचा वापर करण्याने काही फायदे आपोआप मिळतात. या साधनांची रचना साधी असून साधा नळकरीसुद्धा त्यांची जोडणी करू शकतो. त्यामुळे ती स्वस्त पडतात. त्यांत हलणारे भाग बहुधा नसल्याने ती कार्यप्रवण ठेवण्यासाठी होणारा खर्च अगदी नाममात्र असतो. विद्युत् साधनांप्रमाणे त्यांच्यात ठिणगी पडण्याचा संभव नसल्याने ज्वालाग्राही वायूंच्या परिसरातही ती निर्धास्तपणे वापरता येतात. मोठे धक्के किंवा तापमान किंवा दाब यांमधील मोठे चढउतार तसेच कंपने किंवा प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) यांच्यामुळे त्यांच्या क्रियाशीलतेवर विपरीत परिणाम होत नाही.
त्यांना कोणत्याही शुद्ध व एकजिनसी द्रायुच्या अखंड प्रवाहाच्या स्वरूपात शक्तीचा पुरवठा केला म्हणजे पुरते. महोत्पादन (मोठ्या प्रमाणावर उत्पादन) करून त्यांच्या किंमती खाली आणलेल्या आहेत. सूक्ष्मीकरण करून (आकारमान लहान करून) ती अगदी थोड्या जागेत बसविणे शक्य होते, यांत्रिक साधनांपेक्षा त्यांचे कार्य जलद होते. संकेत दिल्यानंतर काही सहस्रांश सेकंदातच त्यांचा प्रतिसाद मिळतो. मात्र इलेक्ट्रॉनीय साधनांच्या तुलनेने हा प्रतिसाद काल बराच जास्त आहे त्याचप्रमाणे त्यांना शक्तीही जास्त द्यावी लागते. तसेच या साधनांच्या द्वारे दूर अंतरावर संकेत पाठविणे काही वेळा अव्यवहार्य ठरते.
अनुप्रयुक्तीच्या दिशा : द्रायुक साधनांचा नियंत्रक स्विच, प्रवर्धक यांसारख्या कार्य़ाबरोबरच संवेदक व अभिज्ञातक (ओळखण्याचे साधन) म्हणूनही वापर झालेला आहे. ही साधने हवाई व अवकाश प्रवास तंत्रात आणि वैद्यकीय शास्त्रातही अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. तसेच वेग नियंत्रण, कशावरही (उदा., द्रायुप्रवाह, कारखान्यातील एखादी प्रक्रिया इ.) लक्ष ठेवणे, क्रम लावणे आणि चालना देणे यांबाबतींतही जवळजवळ इतर सर्व प्रकारांच्या साधनांची जागा द्रायुक साधने घेऊ शकतात.
इतिहास : रूमेनियन अभियंते हेन्री कोआंडा यांना द्रायुकाच्या विकासात महत्त्वाचे स्थान आहे. १९३२ मध्ये त्यांनी द्रायुंच्या एका प्रवृत्तीचा, त्यांच्या वहनमार्गांच्या बाजूंना (भित्तींना) चिकटण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा (भित्त्यासक्तीचा) शोध लावला. हीच प्रवृत्ती पुढे ‘कोआंडा परिणाम’ म्हणून प्रसिद्धीस आली. या प्रवृत्तीमुळे द्रायूच्या मुख्य झोतावर एक लहानसा विचलक झोत सोडला असता मुख्य झोताला मार्गाच्या एका भित्तीकडून सोडवून दुसऱ्या भित्तीप्रवाहात जावयास लावता येते. या शोधाचा व्यावहारिक उपयोग मात्र सु. १९५९ पर्यंत केला गेला नाही. या सुमारास अमेरिकी लष्कराच्या हॅरी डायमंड प्रयोगशाळेतील आर्. ई. बोल्झ, बी. एम्. हॉर्टन व आर्. डब्ल्यू. वॉरेन यांनी व मॅसॅच्यूसेट्स इनस्टिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील ग्रीनवुड यांनी स्वतंत्रपणे तसा प्रयत्न केला. बहुतेक सर्व द्रायुक साधने द्रायूंच्या वरील प्रवृत्तीवर आधारून बनविलेली असून त्यांची रचना, घटकांतील अंतर व त्यांचे आकार याबाबतींत त्यांच्यात भिन्नता असते.
मूलतत्वे : द्रायुगतिकीतील [द्रायूंच्या गतीविषयीच्या शास्त्रातील → द्रायुयामिकी] सूत्रे व समीकरणे ह्यांवर द्रायुकाची उभारणी झालेली आहे पण त्यातल्या त्यात द्रायुप्रवाह आणि सीमास्तरांचा आविष्कार यांसंबंधीच्या नेव्हिअर–स्टोक्स समीकरणांचा (सी. एल्. एम्. एच्. नेव्हिअर व जी. जी. स्टोक्स यांच्या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या) त्यांत जास्त उपयोग होतो.
द्रायुकाचे एक उदाहरण : समजा (१) या तोटीतून (२) हा वायुझोत (शक्तिझोत) एका भांड्यात सोडला (आ.१-अ). झोत वाहताना बाजूची हवा आपल्या बरोबर ओढून घेतो व त्यामुळे तेथील वायुदाब कमी होतो. त्याची भरपाई करण्यासाठी (आकृतीत वक्र बाणानी दाखविल्याप्रमाणे) इतर ठिकाणची हवा तेथे येते.
आता असे समजा की, भांड्याची बाजू झोताला अगदी जवळ आणली (आ.१-आ) त्यामुळे दाबातील घट भरून काढण्यासाठी उजव्या बाजूला येणाऱ्या हवेचा मार्ग संकुचित होतो व तेथील दाबाची भरपाई पुरेपूर होत नाही. त्यामुळे झोताच्या उजवीकडील दाब तुलनेने कमी होतो व झोत उजवीकडे झुकतो. त्यामुळे उजवीकडील दाब आणखी कमी होतो व झोत अधिकच झुकतो. याप्रमाणे शेवटी तो भांड्याच्या उजव्या बाजूला चिकटून वाहू लागतो. (भित्त्यासक्ती).
भांड्याची उजवी बाजू जवळ आणण्याऐवजी मुख्य झोतावर डावीकडू्न एका दुर्बल झोताचा आघात करूनही वरीलसारखाच परिणाम घडवून आणता येतो (आ.१ − इ). आता झोत उजव्या भित्तीपासून दूर करावयाचा असल्यास त्या भित्तीजवळील दाब तेथे हवेचे अंतःक्षेपण करून (आत घुसवून) वाढवायला तरी पाहिजे किंवा डावीकडील हवा काढून घेऊन तेथील दाब या बाजूकडील दाबापेक्षा कमी तरी करायला पाहिजे. असे केल्याने झोत मध्याच्या पलीकडे गेला की, दुसऱ्या बाजूला चिकटेल आणि नियंत्रक झोताच्या अनुपस्थितीतसुद्धा तेथेच राहील. अशा तऱ्हेने कमी ऊर्जेच्या बारीकशा झोताने मोठ्या, खूप उर्जा असलेल्या झोताचे नियमन होऊ शकते म्हणून येथे विवर्धन साध्य होते असे म्हणतात.
आता असे समजा की, आ.२ मध्ये शक्तिझोताच्या तोटीपासून (१)काही अंतरावर (आकृतीवरून अंतराची कल्पना येईल) एक पाचरीसारखा विभाजक (९) ठेवला आहे. जर विभाजक अगदी जवळ (तोटीच्या रुंदीच्या दुपटीपेक्षा जास्त नव्हे) असला, तर त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये दाबांतर तयार होण्यास हे अंतर पुरेसे होणार नाही व झोत विभागून पुढे जाईल. दोन्ही बाजूंना असलेल्या (५) व (६) या नियंत्रक द्वारांपैकी कुठल्याही एकातून बारीक झोताने शक्तिझोताला दिलेला धक्का शक्तिझोतास इच्छित प्रदान दिशेला वळवील व नियंत्रक झोत बंद केला, तर शक्तिझोत पुन्हा पूर्वीप्रमाणे विभागून जाईल.
जर विभाजक पाचर तोटीच्या रुंदीच्या तीन ते पाचपट अंतरावर ठेवली, तर झोतावर कोआंडा परिणाम होईल व शिवाय असममिती असेल, तर झोत तडकाफडकी एका बाजूला सरकेल. जर विभाजक तोटीच्या रुंदीच्या सहापट अंतरावर असेल, तर कोआंडा परिणामाचा पूर्ण अंमल चालून झोत पुन्हा विस्थापित करीपर्यंत त्याच भित्तीला चिकटून राहील.
बहुतेक सर्व द्रायुक साधनांचे कार्य वर विवरण केलेल्या नमुन्याच्या धर्तीवर चालते. त्यांचे भित्त्यासक्ती साधने, संक्षोभी विवर्धक, झोत हापटी घटक व आवर्ती विवर्धक असे चार प्रकार आहेत.
भित्त्यासक्ती साधने : या साधनांत कोआंडा परिणामाचा उपयोग केलेला असतो. (१) या तोटीतून (आ.२) जर द्रायूचा झोत सोडला, तर प्रदान (३) वा (४) यातील कोणत्यातरी एका द्वरातून होईल पण योग्य नियंत्रक आदेशाने त्याला हवे तिकडे जायला लावता येईल. मग आदेशक झोत बंद केला, तरी झोताचा मार्ग बदलणार नाही. प्रदान मार्गात आडथळा आला, तरी शक्तिझोत चालू रहावा म्हणून (७) व (८) ही दोन उच्छ्वास (हवा बाहेर पडण्यासाठी) द्वारे ठेवलेली आहेत. आ.३ मध्ये शक्तिझोताला (७) हा नियंत्रक झोत आपल्याकडे चोषणाने आकर्षित असल्याचे दाखविले आहे. (१) पासून निघालेला शक्तिझोत (८) व (९) या दोन सीमास्तरांपैकी एकाच्या सान्निध्याने त्या सीमास्तराशी संलग्न प्रदान मार्गात प्रवेश करतो.
नियंत्रक द्वाराजवळील हवा काढून घेतल्याने निर्माण झालेल्या कमी दाबामुळे झोत त्या बाजूकडे सरकतो व मग कोआंडा परिणामामुळे तो झोत तेथेच राहतो. दुसऱ्या नियंत्रण द्वारातून आदेश आल्यास झोत अर्थातच दुसऱ्या प्रदान मार्गाने जातो.
संक्षोभी विवर्धक : हा आर्. एन्. ऑगर यांनी शोधून काढला पण काही लोक चिचिस्टर बेल (१८९२) यांना त्याचे जनक समजतात. हा एक अन्योन्य परिणामी साधनांचा विशेष प्रकार असून त्यात स्तरीय प्रवाहाच्या एका तत्त्वाचा उपयोग केलेला असतो. स्तरीय प्रवाह एखाद्या फटीवर आडवा प्रक्षेपित केला असता त्यावर हवेचा बारीकसा आडवा झोत सोडूनसुद्धा तो संक्षुब्ध करता येणे सहज शक्य असते. हे एकस्थिर (एक स्थिर स्थिती असलेले) साधन आहे. नियंत्रक झोत बंद असताना तोटी (१) आणि ग्राहक (१०) यांमधील मुख्य प्रवाह स्तरीय असतो आणि नियंत्रक झोताच्या अभावी ग्राहकात शक्तीचा कमाल भरणा होतो. जेव्हा नियंत्रक झोत कार्यान्वित केला जातो तेव्हा तो संक्षोभ निर्माण करतो व मग (१०) या ग्राहकावर पडणारा (झोताचा) दाब कमी होतो.
समानुपाती विवर्धक : हे एक ‘अनुरूप’ (ज्याचे प्रदान हे आदानाच्या सम प्रमाणात असते असे) साधन असून ते नियंत्रक आदेशाच्या समप्रमाणात प्रदान करते (आ.५). अन्योन्य परिणाम होणारा भाग मोठा केल्यास भित्त्यासक्ती होत नाही. नियंत्रक आदेशाच्या अभावी शक्तिझोत दोनही प्रदान मार्गातून जात असतो. जर दोन्ही नियंत्रक चालू केले, तर नियंत्रक आदेशांच्या संवेगाच्या (द्रव्यमान आणि वेग यांच्या गुणाकाराने निर्देशित होणाऱ्या राशींच्या) जवळजवळ सम प्रमाणात शक्तिझोताचे दोन्ही प्रदानांत विभाजन होते.
झोतहापटी घटक : यात संवेगाच्या अदलाबदलीच्या तत्त्वावर कार्य घडून येते. जर दोन अगदी सारखे आणि समाक्ष झोत एकमेकांकडे सोडले (आ. ६ मधील झोत ३ व ४), तर ते (५) या ठिकाणी एकमेकांवर आपटतील. त्यांचे संवेग सारखे असल्याने तोट्यांच्या मध्यावरील हापटबिंदूपाशी (५) आकृतीत दाखविल्याप्रमाणे झोतांचे त्यांच्या अक्षांशी काटकोनात असलेल्या पातळीत प्रसरण होईल.(४) वरील दाब कमी करून बिंदू (५) हा (२) या तोटीच्या तोंडाशी आणला, तर दोन्ही झोतांत अन्योन्य कार्य घडून (६) ह्या ग्राहकाच्या तोंडाशी उजवीकडे पसरणारा असा एक शंकू तयार होईल. आदेशक झोत (७) लावून ग्राहकांमधील दाबाच्या पुनःप्राप्तीत वाढ किंवा घट करता येईल.
आवर्ती विवर्धक : (आ.७). हे संवेगाच्या अक्षय्यतेवर आधारलेले आहेत. नियंत्रक आदेशाच्या अभावी शक्तिझोत वाटेतील मोकळ्या जागेतून सरळ रेषेत (४) या प्रदान द्वाराकडे जातो पण आदेश मिळताच संवेगाच्या संक्रमणामुळे त्याचा आवर्त (भोवरा) तयार होतो. पुरवठा झोत आवर्ती मार्ग (दिशा) घेतो व या मार्गावर बाहेरून मध्यबिंदूकडे दाब कमीकमी होत जातो.
द्रायुके व गणन कृत्ये : द्रायुकांच्या साहाय्याने पुढील मूलभूत गणन कृत्ये साधता येतात.
‘नाही ’द्वार : आदान आदेशाच्या विरुद्ध प्रकारचा प्रदान आदेश देणाऱ्या साधनाला ‘नाही द्वार’ असे म्हणतात. आ.४ हे साधन ‘नाही द्वार’ म्हणून कार्य करते. कारण नियंत्रक आदेश जास्त दाब देणारा असल्यास प्रदान द्वारावरील दाब कमी होतो.
अथवा /नाथवा द्वार : आ. ८ मधील साधन अथवा द्वार अथवा नाथवा (नाही + अथवा) द्वार म्हणून वापरता येते. (३) अथवा (४) या कोणत्याही द्वाराने आदेश दिला, तर (९) येथे प्रदान मिळेल. कारण (५) क़डून येणारा नियामक झोत अत्यल्प जोराचा असतो परंतु (१०) या प्रदान द्वाराच्या संदर्भात पाहता साधन ‘नाथवा’प्रकारचे आहे. कारण (३) किंवा (४) कोणताही आदेश दिला तरी (१०) ला प्रदान मिळत नाही.
आणि/नाणि द्वार : आ. ९ मध्ये तीन घटकांचे एक साधन दाखविले आहे. (३) व (४) हे दोन्ही नियंत्रक आदेश दिले, तरच (५) या द्वारातून प्रदान मिळते (‘आणि’ कार्य) परंतु (६) या प्रदान द्वाराच्या दृष्टीने हे ‘नाणि’ कार्य आहे कारण दोन्ही नियंत्रक आदेश दिले, तर (६) ला प्रदान मिळत नाही.
‘उघड-मीट साधन’ व स्मरण : आ.२. मध्ये दाखविलेले साधन उघड-मीट साधन म्हणून वापरता येते. कारण नियंत्रक आदेश (५)मधून दिल्यास प्रदान (४) मध्ये व (६) मधून दिल्यास प्रदान (३) मध्ये मिळेल. एखाद्या नियंत्रक आदेश एकदा देऊन मग बंद केला (उदा., ६), तरी भित्त्यासक्तीमुळे प्रदान त्याच बाजूला (३ कडे) चालू राहते. म्हणजे जणू काही साधनाला पूर्वी दिलेल्या आदेशाचे स्मरण राहिल्यासारखे कार्य होते. शक्तिझोत (३) कडे किंवा (४ ) कडे हवा तसा चालू किंवा बंद करता येतो. म्हणून याला उघड-मीट साधन असे म्हणतात. याला दोन स्थिर स्थिती आहेत म्हणून ते द्विस्थिर आहे असे म्हणतात.
आंदोलक : यामधून मिळणारे प्रदान विवक्षित कंप्रतांनी (दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांच्या संख्यांनी) काही ठराविक मर्यादांत आंदोलन पावत असते. (त्यात चढउतार होत असतो). सामान्यतः आंदोलने चालू राहण्यासाठी धन पुनःप्रदाय करावा लागतो (प्रदानापैकी काही ऊर्जा परत आदानाला द्यावी लागते). द्विस्थिर साधनाचे प्रदान मार्ग नियंत्रन द्वारांना जोडल्यास असा आंदोलक तयार होतो (आ.१०).
‘द्विमान पद्धतीचा गणक’ (० व १ या अंकांवर आधारलेल्या गणन पध्दतीवर गणितकृत्ये करणारे साधन) व ‘विलंबक’ यांची कार्ये आंदोलक करू शकतो.
द्रायुकीय संवेदक : कोणत्याही आविष्काराची किंवा राशीची दखल घेणे किंवा मापन करणे हे संवेदकांचे कार्य होय. विविध प्रकारचे संवेदक म्हणून द्रायुके वापरता येतात. तापमानासाठी द्रायुकाचा संवेदक म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. हा संवेदक म्हणजे एक वायवीय आंदोलक असतो व त्याची कंप्रता ही तापमानाचे फलन (गणितीय दृष्ट्या संबंधित) असते.
आवर्ती विवर्धक सुयोग्य फेरफार करून ‘भ्रमण गतीचा संवेदक’ म्हणून वापरता येतो. विवर्धकाची रचना अशी करतात की, त्यातील द्रायुप्रवाह पूर्णपणे सममित व अरीय होईल. मग हे साधन गोलगोल फिरविले असता त्यात जो भोवरा मिर्माण होतो, त्याच्या आवर्ततेची महत्ता भ्रमणाच्या वेगावर अवलंबून राहते.
समीपता संवेदक म्हणून ही द्रायुके वापरता येतात. त्यांतील एका प्रकारात (आ. ११) पृष्ठपीडनाचा (पश्चदाबाचा) उपयोग करून घेतला जातो. (२) या अवरोधकामुळे शक्तिझोत अंशतः अडवला जातो व (४) या उच्छ्वास द्वारा समोर कोणतीही वस्तू नसेल, तर हा अवरुद्ध झोत उच्छ्वास द्वारावाटे बाहेर निघून जातो व (३) येथे काहीही प्रदान मिळत नाही परंतु (४) समोर काही अडथळा आला की, त्यामुळे वायुप्रवाहावर पृष्ठपीडन (उलटा दाब) निर्माण होते आणि (३) येथे काही प्रदान मिळू लागते. या साधनाच्या साहाय्याने (४) समोर सु. ०·१ मिमी. अंतरावर येणाऱ्या अडथळ्याचे संवेदन होऊ शकते. अडथळा प्रत्यक्ष झोतात येणाऱ्या प्रकारच्या साधनाने सु. ६ मिमी. पर्यंत दूरच्या वस्तूचे संवेदन होऊ शकते.
द्रायुक साधनात झडपा किंवा दट्ट यांसारखे हलके भाग घालून त्याचे कार्यक्षेत्र आणखी विस्तृत करता येते. त्याचप्रमाणे द्रायुक साधनांचा इतर प्रकारच्या (उदा., इलेक्ट्रॉनीय) साधनांशी संयोग करून संमिश्र प्रकारची साधनेही तयार करण्यात आलेली आहेत. अनेक द्रायुक साधने एकत्रित करून त्यांपासून कित्येक गुंतागुंतीची कृत्येही साध्य करता येतात. द्रायुक साधनांपासून संगणकही (गणितकृत्ये करणारे साधनही) तयार करता येतो.
व्यावहारिक अनुप्रयुक्तीची उदाहरणे : द्रायुक संगणकांचा उपयोग अणुभट्ट्या, अवकाशयाने व क्षेपणास्त्रे अशा विविध ठिकाणी करण्यात आलेला आहे. रॉकेट व क्षेपणास्त्रे यांच्या मार्गांत योग्य बदल घडवून आणण्यासाठी रॉकेटांच्या निष्कासाने निर्माण होणाऱ्या झोतांचा उपयोग करून घेता येतो. झोत (जेट) एंजिने, जहाजावरील बाष्पित्रे (बॉयलर) व रेल्वे एंजिने यांच्या प्रथामिक नियंत्रणातही द्रायुक साधनांचा उपयोग करण्यात आलेला आहे. निर्वात झाडू (व्हॅक्यूम क्लिनर) व धुलाई यंत्रे यांतही या साधनांचा उपयोग करणे शक्य आहे.
एका कृत्रिम श्वसन यंत्रात भित्यासक्ती साधनाद्वारा श्वास व उच्छ्वास यांमधील कालांतर योग्यपणे नियंत्रित करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुष्कळ दिवस अंथरुणाला खिळलेल्या रोग्याचा त्रास कमी करण्यासाठी द्रायुक विवर्धकांच्या मदतीने रोग्याच्या अंगाखाली कमीअधिक दाबाचे पट्टे असलेली हवेची गादी तयार करता येते. जास्तीत जास्त पाऱ्याच्या ५०० मिमी. उंच स्तंभाच्या दाबाइतका रक्तदाब निर्माण करू शकणारा कृत्रिम ‘हृदय-पंप’ द्रायुक साधनांच्या साहाय्याने बनविण्यात आलेला आहे. त्यातून मिनिटाला १० लि. पर्यंत रक्तप्रवाह मिळू शकतो व नाडीचे ठोके मिनिटाला ३० ते १८० पर्यंत पडतील असेही संयोजन करता येते. अशी आणखीही कित्येक प्रकारची साधने उपलब्ध झालेली आहेत.
द्रायुकीय साधनांच्या प्रदानाचा दाब अतिशय कमी (०·०५ ते ०·३५ कि.ग्रॅ./सेंमी.२) असल्याने द्रवीय किंवा वायवीय प्रेरकांच्या मदतीने तो वाढवावा लागतो. अशा रीतीने २०० किग्रॅ./सेंमी.२ पर्यंत दाब निष्पन्न करता येतात. याहून जास्त वाढ मिळविण्यासाठी या द्रायुकीय साधनांचा सोपान (मालिका) वापरता येतो.
निर्मिती : आरंभी द्रायुक साधने प्लॅस्टीक किंवा काच यांमध्ये कोरून काढत किंवा ओतकाम करून बनवीत व मग ती रबराच्या किंवा प्लॅस्टिकच्या नळ्यांनी जोडीत असत. अगदी अलीकडे ‘प्रकाशकीय बनावटीची’ पद्धती खूपच महत्त्वाची समजली जाते. ही पध्दत म्हणजे कागदावरील अभिकल्पाच्या (आराखड्याच्या) रेखाकृतीचे छायाचित्र घेणे, व्यस्त (निगेटिव्ह) चित्रांची घनता कमी करणे, प्रकाशसंवेदी मृत्तिकेच्या पत्र्यावर त्या चित्राचे प्रक्षेपण आणि नंतर नको असलेला भाग अम्ल-उत्कीर्णनाने (अम्लाच्या साहाय्याने विरघळवून) काढून टाकणे ही होय. असे पत्रे एकावर एक रचून व पत्र्यांवरील तार्किके एकमेकांशी जोडून नंतर हे पत्रे वितळजोडाने (वेल्डिंगने) एकजीव करतात. या जोडलेल्या पत्र्यांच्या संचाला वीट (मॉड्यूल) म्हणतात (आ.१२). संक्षोभी विवर्धकांसारखी काही साधने धातूच्या नळ्या डाख किंवा वितळजोड यांनी सांधून बनवितात. बनावटीसाठी यशस्वीपणे वापरलेल्या इतर पध्दती म्हणजे इलेक्ट्रॉनीय समाकलित (अनेक भाग एकत्रितपणे अतिशय थोड्या जागेत बसविलेली) मंडले बनविण्याच्या पद्धतीप्रमाणे धातूंचे प्रकाशउत्कीर्णन आणि अंतःक्षेपणी व संक्रमणी प्लॅस्टिक ओतकाम [→ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके]. इलेक्ट्रॉनीय साधनांबरोबर द्रायुक साधनांना यशस्वी स्पर्धा करावयाची असेल, तर आकारमान जुळवणीचा खर्च, आखणी व दुरुस्ती या सर्वांत काटकसर होईल, अशा नव्या निर्मितीच्या पद्धती शोधून काढाव्या लागतील.
जागतिक कल : १९६१ च्या सुमारास अवकाश अभियांत्रिकीत व जेथे जेथे तापमान, दाब आणि प्रारण यांनी अत्युच्च सीमा गाठलेल्या असतात अशा ठिकाणच्या उपकरणात द्रायुकीय विवर्धन आणि नियंत्रण अतिशय महत्त्वाचे समजले जात होते पण लवकरच द्रायुकांची पृथ्वीवरील साधनांतील उपयुक्तताही वैज्ञानिकांच्या लक्षात आली व वेग नियंत्रण, द्रव बाटलीत भरणे, कृत्रिम हृदय पंप, यांत्रिक हत्यारे व रेल्वे एंजिने यांचे नियंत्रण इत्यादींत द्रायुके वापरली जाऊ लागली आणि अशा तऱ्हेने स्वयंनियंत्रणाची एक नवीन शाखा अस्तित्वात आली. याच्यामागोमाग चालू नियंत्रण पध्दतींत द्रायुक साधनांचा अंतर्भाव होणे व त्यानंतर जेथे विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय पध्दती चालूच शकत नाहीत तेथे द्रायुकांचा वापर होऊ लागणे क्रमप्राप्तच आहे. अशा तऱ्हेने प्रचलित पध्दतींशी साम्य नसलेल्या नव्या पद्धती उदयास येण्याचा संभव आहे. प्रक्रिया नियंत्रण आणि स्वयंनियंत्रण या शाखांतच त्याचा बहुतांशी वापर होईल.
संदर्भ : 1. Andersen, B. W. The Analysis and Design of Pneumatic Systems, New York, 1967.
2. Brown, F. T. Ed. Advances in Fluidics, Novelty (Ohio), 1967.
3. Humphrey, E. F. Tarumato, D. H. Fluidics, Boston, 1965.
4. Kirshner, J. M. Fluid Amplifiers, New York, 1966.
5. Moylan , M . J . Fluid Logic in Simple Terms, New York, 1968.
ओक, कौस्तुभ पुरोहित, वा. ल.
“