देशपांडे, पुरुषोत्तम यशवंत : (११ डिसेंबर १८९९– ) मराठी कादंबरीकार, तत्त्वचिंतक व राजकीय कार्यकर्ते. जन्म अमरावती येथे. १९२५ साली ते मंबई विद्यापीठाचे एम्. ए. झाले आणि पुढे एल्एल्. बी.ची पदवी त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९२६ साली घेतली. १९२५ मध्ये त्यांचे कोल्हटकर घराण्यातील विमलाबाईंशी लग्न झाले. १९३१ साली वऱ्हाडच्या ‘यूथ लीग’ चे ते अध्यक्ष होते. प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते चिटणीस होते (१९३४). गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत त्यांनी १९२१ साली भाग घेतला एक वर्ष कॉलेज सोडले. १९३२ च्या आंदोलनात त्यांना कारावास घडला. १९४२ च्या ‘छोडो भारत’ चळवळीत भाग घेतल्याबद्दलही त्यांना कारावास भोगावा लागला होता. मध्य प्रदेशाच्या इंटक शाखेचे ते अध्यक्ष होते (१९४८–५२).
भवितव्य नावाचे साप्तहिक त्यांनी १९४१ साली चालू केले. नागपूर येथे ते वकिलीचा व्यवसाय करीत. वैदिक वाङ्मय व विशेषतः बौद्ध साहित्य यांचे ते व्यासंगी अभ्यासक आहेत. विद्यालयीन कालात रामकृष्ण परमहंस, विवेकानंद व विशेषतः स्वामी रामतीर्थ यांच्या वाङ्मयाचा फार मोठा ठसा त्यांच्या विचारांवर उमटला. ते १९३३ ते १९४२ सालापर्यंत मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते. तथापि त्यांची निष्ठा गांधीवादावरच अधिकाधिक बसत गेली. गांधीजीच का ?(१९४४) ह्या ग्रंथात गांधीजींना लाभलेल्या माहात्म्याची मीमांसा त्यांनी केली आहे. आधुनिक विचारप्रणालीचा त्यांचा व्यासंग सखोल होता तथापि अंतर्मुख वृत्ती, चिंतनशीलता आणि ब्रह्मज्ञानाची आवड यांमुळे जीवनविषयक सखोल विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती होती.
त्यांच्या साहित्यात बंधनाच्या पलीकडे (१९२८), सुकलेले फूल (१९३१), सदाफुली (१९३३), विशाल जीवन (१९३९), काळी राणी (१९४१), नवे जग (१९४१), आहुती (१९५९) व मेरी घोष की धर्मघोष ?(१९७२) या कादंबऱ्या नवी मूल्ये (१९४६) हा निबंधसंग्रह निर्माल्यमाला (१९३३) ह्या कविता आणि साहित्यअकादेमीचे १९६२ सालचे पारितोषिक मिळालेले अनामिकाची चिंतनिका हे तात्त्विक पुस्तक यांचा अंतर्भाव होतो. त्यांच्या कादंबऱ्यांत व्यक्ती आणि तिच्या अंतर्मनातील संघर्ष यांच्यावर भर आहे. फडके-खांडेकरांच्या कादंबरी-युगात वेगळी उठून दिसणारी अशी त्यांची कादंबरी आहे. तिच्यात अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमनांचे तात्विक, वैचारिक, भावनिक स्वरूपाचे मूलभूत प्रश्न आधुनिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या तरलपणाने व हळुवारपणाने चित्रित करण्याचा प्रयत्न आहे. एक प्रकारची बंडखोर पण चिंतनशील स्वच्छंदतावादी वृत्ती त्यांच्या सर्व कादंबऱ्यांमागे जाणवते. काही तांत्रिक प्रयोगही देशपांड्यांनी केले आहेत. सुकलेले फूल व सदाफुली या त्यांच्या कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात.
त्यांचा वाङ्मयविचार नवी मूल्ये या निबंधसंग्रहातून व बडोदा, उज्जैन, हैदराबाद, मुंबई इ. ठिकाणच्या वाङ्मायमंडळांतून व साहित्य संमेलनांतून केलेल्या भाषणांत आढळतो. अनामिकाची चिंतनिका यातील जीवनविषयक चिंतन स्वतंत्र आहे. आधूनिक विज्ञानयुगात भौतिक वस्तुसंशोधनाला जे अवास्तव महत्त्व प्राप्त होत आहे, त्याला आत्मसंशोधनाची जोड दिली नाही, तर या जगात मानवी अस्तित्वच नष्ट होईल या तीव्र जाणीवेची प्रेरणा अनामिकाच्या चिंतनिकेमागे आहे पण तर्कसंगत उपपादनाची शास्त्रीय बैठक या ग्रंथाला नाही, तर काव्यात्मता व प्रत्ययकारी बोलण्याची निश्चितता या लेखनात आढळते. उच्च दर्जाचे काव्यात्म तत्त्वचिंतन असे त्याचे वर्णन करता येईल.
ह्यांखेरीज भारतीय संस्कृतीला आव्हान व सोव्हिएट रशिया आणि हिंदुस्थान (१९४४) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. ह्यांपैकी दुसऱ्या ग्रंथात ‘सोव्हिएट रशियाची विपरीत करणी, मार्क्सवादाचे देहावसान’ आदी विषय विवेचिले आहेत. अनुभवामृत रसरहस्य (३ खंड, १९६२–६५) हे त्यांनी ज्ञानदेवांच्या अनुभवामृतावर केलेले एक नवे निरूपण. ज्ञानदेवांचे एक चरित्रही त्यांनी इंग्रजीत लिहिले आहे. पतंजलीच्या योगसूत्रांवर एक अभिनव भाष्य करण्याच्या उद्देशाने लिहिलेले द ऑथेंटिक योग हे त्यांचे पुस्तक इंग्लंडमध्ये प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्याचा जर्मन अनुवाद १९७६ साली जर्मनीत प्रसिद्ध झाला.
पॅरिस येथे १९५२ साली ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर कल्चरल फ्रीडम’च्या बैठकीला ते भारतीय संस्कृतिमंडळाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ताश्कंद येथील आफ्रो-आशियाई लेखक-परिषदेला एक भारतीय प्रतिनिधी ह्या नात्याने ते उपस्थित होते. रशिया, स्वित्झर्लंड, इटली, इंग्लंड इ. देशांचा प्रवासही त्यांना घडला आहे. विदर्भ साहित्य संघ व इतरही वाङ्मयीन संस्थांचे अध्यक्षपद त्यांना लाभले होते.
जाधव, रा. ग.