दृक्भ्रम कला : (ऑप आर्ट). एक अत्याधुनिक कला संप्रदाय. ‘ऑपʼ हे ‘ऑप्टिकलʼ या संज्ञेचे संक्षिप्त रूप. ‘रेटिनल आर्टʼ, ‘पर्सेप्चुअल ॲब्स्ट्रॅक्शनʼ अशा नावांनीही हा संप्रदाय ओळखला जातो. तो १९६० या दशकाच्या उत्तरार्धात भरभराटीस आला. त्याची व्याप्ती जागतिक होती. १९६५ मध्ये न्यूयॉर्क येथील ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्टʼ या संग्रहालयात ‘द रिस्पॉन्सिव्ह आयʼ या नावाने या संप्रदायाचे एक प्रदर्शन भरले होते, त्यात एकूण १५ देशांतील १०६ कलावंतांच्या १२३ कलाकृती मांडल्या होत्या.
दृक्भ्रम कला हा ⇨ अप्रतिरूप कलेचाच एक अत्याधुनिक आविष्कार होय. दृष्टिविभ्रम साधणारी भौमितिक, अवस्तुनिष्ठ रचना कौशल्यपूर्ण रंग–विरूपणे गती व अवकाश यांचे आभास निर्माण करणारे आकृतिबंध ही या संप्रदायाची ठळक वैशिष्ट्ये होत. या संप्रदायाच्या कलावंतांनी चित्रनिर्मितीमध्ये अनेक तंत्रांचा व क्लृप्त्यांचा वापर करून नजरेला भुरळ घालणारे दृश्य परिणाम साधले. रंगांच्या अनुप्रतिमा (आफ्टर इमेजीस), दृक्पटलाच्या थकव्यानंतर भासमान होतील अशा स्वरूपाची दृक्विरूपणे, अवकाशीय यथादर्शनाच्या क्लृप्त्या, सतत पालटणाऱ्या हेलकावेदार आणि सुळसुळीत पोतांचे आकृतिबंध, समांतर रेषात्मक रचनाबंधांनी साधलेले कंपायमान, गतिसूचक परिणाम आणि रंगांच्या परस्परसन्निध छटांचा वापर करून रंगविलेली, सहजदृश्यमान नसलेली ‘इन्व्हिझिबलʼ चित्रे (अशा चित्रांच्या रंगच्छटा इतक्या परस्परसन्निध असतात, की प्रथम दृष्टिक्षेपामध्ये चित्रफलक एकरंगीच भासतो) अशा प्रकारची सर्व तंत्रसामग्री या प्रणालीच्या कलावंतांनी वापरली. या संप्रदायातील उत्थित शिल्पे, रचनावादी शिल्पे (कन्स्ट्रक्शन्स) व पन्हळयुक्त पृष्ठावर रंगवलेली चित्रे ही निर्मिती अशा कौशल्याने केलेली असते, की वेगवेगळ्या दिशांनी ती कलाकृती पाहत असता तिची रूपे क्षणोक्षणी पालटत असल्याचा भास होतो.
दृक्भ्रम कला ही ⇨ रचनावादातून उगम पावली. अप्रतिरूप अभिव्यक्तिवादातील [→ अभिव्यक्तिवाद] आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा व ⇨जनकलेतील सामाजिक भाष्य यांना विरोधी प्रतिक्रिया म्हणून ही प्रणाली अवतरली तरी तिचे स्वरूप केवळ निषेधात्मक नव्हते. या प्रणालीच्या कलावंतांनी स्वीकारलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातच तिचे मर्म सामावलेले आहे. दृक्भ्रम कलेतील तंत्रकौशल्य हे यंत्रवत परिपूर्ण व संपूर्ण अव्यक्तिगत पातळीवर असते. निर्मितीतील व्यक्तिनिष्ठा वा वैयक्तिक प्रतिष्ठा टाळण्यासाठी या प्रणालीच्या कलावंतांनी कधी सांघिक आविष्कार घडविला, तर कधी कलाकृती संघाच्या नावे प्रसिद्ध केल्या. व्हिक्टर व्हाझारेली (१९०८– ), ब्रिजेट रिली (१९३१– ), रिचर्ड अनुस्केवित्स (१९३०– ), लॅरी पून्स (१९३७– ), तादास्की (१९३५– ),ॲगम (१९२८– ) हे या प्रणालीचे काही प्रमुख कलावंत होत.
इनामदार, श्री. दे.
“