देझार्ग, झेरार : [२ मार्च (२१ फेब्रुवारी ?)१५९१ –? ऑक्टोबर १६६१]. फ्रेंच भूमितिकार. प्रक्षेपीय भूमितीतील [→ भूमिति] प्रमुख संकल्पना त्यांनी प्रथम मांडल्या. त्यांचा जन्म लीआँ येथे झाला व शिक्षणही तेथेच झाले. ते कार्दीनाल द रीशल्य यांचे तसेच फ्रेंच सरकारचे अभियांत्रिकीय तांत्रिक सल्लागार होते. त्यांनी फ्रांस्वा व्हिले यांच्या समवेत १६२६ मध्ये पॅरिसच्या नगरपालिकेला सीन नदीचे पाणी शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने वर उचलून त्याचे गावात वाटप करण्याच्या योजनेचा अहवाल सादर केला होता. ल रॉशल येथील सैन्याच्या वेढ्यात १६२८ मध्ये त्यांची प्रसिद्ध तत्त्ववेत्ते रने देकार्त यांच्याशी ओळख झाली.
पॅरिस येथील वास्तव्यात त्यांचा त्या वेळच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी परिचय झाला व त्यांच्या बरोबर त्यांनी पुष्कळ परिसंवादांत व चर्चांमध्ये भाग घेतला. १६३६ मध्ये त्यांनी दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यांमध्ये त्यांनी आपल्या यथादर्शनाच्या सार्वत्रिक पद्धतीचा ऊहापोह केलेला आढळतो. त्यांचा उद्देश त्या वेळी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या आरेखन पद्धतींचे सुसूत्रीकरण व सुयोजन करण्याचा होता. तसेच त्यांच्या प्रक्षेपण पद्धतीचा गणित शास्त्रामध्ये अंतर्भाव करणे, हाही एक प्रयत्न होता. त्यांच्या ग्रंथांची समकालीन शास्त्रज्ञांनी विशेष दखल घेतली नाही परंतु देकार्त आणि पेअर द फेर्मा या गणितज्ञांना मात्र देझार्ग यांच्या बुद्धीची चमक त्या ग्रंथांमध्ये दिसून आली. १६३९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या Bronillon project या ग्रंथामध्ये त्यांनी शांकवांचा प्रक्षेपीय पद्धतीने ऊहापोह केलेला आहे. दोन त्रिकोणांच्या यथादर्शनासंबंधीचे त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेले प्रमेय याच वर्षी त्यांनी मांडले. देकार्त यांच्या बैजिक भूमितीच्या प्रसारामुळे देझार्ग यांचे विवेचन काहीसे मागे पडले. त्याला १८२० मध्ये झां व्हीक्तॉर पाँस्ले यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथामुळे उजाळा मिळाला. १६४० मध्ये देझार्ग यांनी छायाशंकू प्रक्षेपण व दगड कापण्याच्या पद्धती यांवर एक प्रबंध प्रसिद्ध केला. पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना त्यांची पद्धत नापसंतहोती व त्यांनी त्यावर टीका केली. त्यांनी स्वतः १६४५ मध्ये वास्तुविशारद म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी बांधलेल्या इमारती व अवघड जिने त्यांच्या सिद्धांताच्या अचूकतेबद्दल साक्ष देतात. अभियांत्रिकीमधील त्यांच्या कौशल्याचा नमुना म्हणजे त्यांनी पॅरिसजवळ बोल्याच्या गढीमध्ये बहिश्चक्रज [→ वक्र] चाकांच्या साहाय्याने पाणी चढविण्याची केलेली योजना. देझार्ग यांनी आपल्या भूमितीमध्ये प्रक्षेपीय भूमितीच्या प्रमुख संकल्पना मांडल्या आहेत. त्यांमध्ये अनंतस्थ बिंदू व रेषा, ध्रुवीय बिंदू व ध्रुवीय रेषा, प्रक्षेपीय रूपांतरणे वगैरेंचा समावेश आहे. आरेखन तंत्रामध्ये त्यांची कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. त्यांचा भर सैद्धांतिक काटेकोरपणा व सार्वत्रिकता यांवर होता. त्यांच्या हयातीत त्यांच्या कार्याचे महत्त्व लोकांना फारसे जाणवले नाही. एकोणिसाव्या शतकातील भूमितिकारांनी मात्र त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन केले. देझार्ग यांचे ग्रंथ पी. एम्. मर्सेन यांनी संपादित करून प्रसिद्ध केले. तसेच अब्राहाम बॉस या त्यांच्या पट्टशिष्यांनीही त्यांचे लेखन प्रसिद्ध केले. Bronillon project या ग्रंथाचा ब्लेझ पास्काल या मागाहून प्रसिद्धीस आलेल्या व देझार्ग यांचे शिष्य असलेल्या गणितज्ञांवर विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो. देझार्ग यांनी संगीतरचनेवरही एक ग्रंथ १६३६ मध्ये लिहिला होता. ते फ्रान्समध्ये मृत्यू पावले.
ओक, स. ज.