दृढोतक : (स्केरेंकायमा). लिग्निनाचा (काष्ठ पदार्थाचा) द्वितीयक जाड थर चढलेल्या, अरूंद वेजाच्या (छिद्राच्या) व बहुधा परिपक्वतेनंतर मृत झालेल्या कोशिकांना (पेशींना) दृढकोशिका आणि त्यांच्या समूहाला दृढोतक म्हणतात. ह्या मृतकोशिकांत प्राकल (जिवंत द्रव पदार्थ) नसतो. वनस्पतींच्या कोणत्याही अवयवातील कोठल्याही भागात इतर ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांच्या) कोशिकांमधून यांचे मोठे जुडगे, लहान गट किंवा त्या एकेकट्या विखुरलेल्या आढळतात. अवयवांत सामर्थ्य निर्माण करणे, त्यांना आधार देणे, तसेच पातळ आवरणाच्या मृदू कोशिकांना इजा पोहोचू न देता ताणणे, वाकणे आणि वजन व दाब यांपासून होणाऱ्या विकृतींपासून संरक्षण करणे ही या ऊतकाची मुख्य कार्ये होत. संरचना, स्वरूप, स्थान व उपपत्तीतील विभिन्नता लक्षात घेता दृढोतकाचे (१) सूत्र (धाग्यासारखे) व (२) कठक (जाड आणि लिग्निनयुक्त भित्ती असलेले) असे दोन घटक प्रकार आढळतात (आकृती पहा).

दृढोतक (सूत्रे व कठक) : (अ आणि आ) सूत्र-कोशिका (इ) घनसूत्र-कोशिका (ई आणि उ) परिकाष्ठ सूत्र (ऊ) पटयुक्त सूत्र (ए) बाजूस व आडवा छेद त्याखाली दिला आहे) (ऎ) अनियत कठक : (१) श्लेष्मल सूत्र (आकृती अ ते ए यांमध्ये प्रत्येक घटकाचा उभा छेद वरच्या पोकळी, (२) खाच, (३) मध्यपटल, (४) द्वितीयक भित्ती (ओ) गुरूकठक (औ) अस्थिकठक (ओ आणि औ) : (१) अपित्वचीय कठक समूहाचे पृष्ठदृश्य, (२) अपित्वचीय कठक, (३) अभित्वचीय कठक (क) तारका कठख (ख) कठक समूह : (१) आडवा छेद, (२) उभा छेद.

सूत्र : विभज्येपासून (सतत वाढणाऱ्या कोशिकांच्या समूहापासून) प्रभेदित झालेल्या (भेद स्पष्ट झालेल्या), सर्वसाधारणपणे जुडग्यात आढळणाऱ्या, कोशिकावरणांवर लिग्निनाचा जाड समान थर असून मध्ये साध्या खाचा व दोन्ही टोकांस निमुळत्या, टोकदार किंवा थोड्या बोथट असणाऱ्या या कोशिकेस सूत्र म्हणतात. याची लांबी काही (२-३) मिमी. पासून जवळजवळ ०·५ मी. पर्यंत (उदा., रॅमी) आढळते. ऊतकामधील स्थानाप्रमाणे सूत्राचे दोन प्रकार आहेत. (१) प्रकाष्ठात (जलीय विद्राव वाहून नेणे व वनस्पतीला आधार देणे ही कार्ये करणाऱ्या ऊतकात) असलेले–प्रकाष्ठसूत्र यांचे स्वरूप सूत्र व वाहक कोशिका (अन्नपदार्थाची व पाण्याची ने–आण करणाऱ्या कोशिका) यांच्या दरम्यानचे असल्यास सूत्र–कोशिका व परिकाष्ठातील (मुख्यत्वे अन्नपदार्थांची ने–आण करणाऱ्या ऊतकातील) वाहक कोशिका व सूत्र यांच्या दरम्यानचे असल्यास घनसूत्र–कोशिका म्हणतात यांतील फरक काटेकोर नाहीत. (२) प्रकाष्ठाबाहेर म्हणजेच द्विदलिकिंतांतील ⇨ मध्यत्वचा किंवा परिकाष्ठामध्ये आढळणारे व एकदलिकितांच्या खोडातील आणि पानांतील वाहिनीवृंदांच्या (अन्नरसाची व पाण्याची ने–आण करणाऱ्या जुडग्यांच्या) सान्निध्यात आढळणारे–परिकाष्ठसूत्र यांनाही स्थानाप्रमाणे भिन्न संज्ञा दिल्या आहेत : मध्यत्वचेतील म्हणजे मध्यत्वचीय, परिकाष्ठातील परिकाष्ठीय व मध्यत्वचेच्या सर्वांत आतील थरातील म्हणजे परिवाहिक. बळकट व लांब सूत्रे असणारे वनस्पतींचे भाग व्यवहारात मनुष्यास फार उपयुक्त ठरले आहेत (उदा., अळशी, ताग, अंबाडी, घायपात).

सूत्रल (तंतुमय) कोशिकेत आडवे पडदे (पट) असल्यास पटयुक्त सूत्र व कोशिकावरण पाणी शोषून घेणारे असल्यास श्लेष्मल सूत्र म्हणतात.

कठक : प्रकटबीज आणि द्विदलिकित वनस्पतींच्या मध्यत्वचेत, ⇨ मेंडात किंवा प्रकाष्ठ व परिकाष्ठ यांच्या दरम्यान सूत्राबरोबर हे एकेकटे किंवा यांचे जुडगे आढळतात. ⇨ मृदूतकाच्या कोशिकांच्या घनीभवनामुळे हे बनतात. या कोशिका बहुभुजी, समव्यासीय ते साधारण लांब परंतु सूत्रापेक्षा आखूड असून क्वचित शाखायुक्त असतात. तसेच त्यांच्या कोशिकावरणांवर अधिक खाचा व लिग्निनाचा समान किंवा असमान जाडीचा थर असतो. त्यांच्या रूपावरून त्यांना पुढील भिन्न संज्ञा देतात.


(१) मृदूतकाच्या कोशिकांप्रमाणे आखूड व समव्यासीय असल्यास ‘अनियत कठक’ उदा., बिहीचे फळ.

 (२) लांब दांड्यासारख्या असल्यास ‘गुरूकठक’ लेग्युमिनोजी कुलातील काहींच्या बीजांच्या ⇨ अपित्वचा उदा., घेवडा, मूग.

 (३) हाडाप्रमाणे दोन्ही टोकांस फुगीर व जाड आणि मध्ये बारीक असल्यास ‘अस्थिकठक’ उदा., वाटाण्याचे बीजावरण.

 (४) ताऱ्याप्रमाणे असल्यास ‘तारका कठक’ उदा., रूक्ष वनस्पतींची पाने.

(५) लांब बारीक तंतृसारख्यांस ‘रोम कठक’ उदा., ऑलिव्हचे पान. बहुतेक कठीण कवची फळे आणि बीजे यांच्या कठीण आवरणांत कठकांचेच वैपुल्य आढळते (उदा., अक्रोड, बदाम, नारळ) सफरचंद व नासपती यांच्या फळांतील मगजात (गरात) कठकांचे समूह विखुरलेले असतात.

पहा : ऊतके, वनस्पतींतील विभज्या.

संदर्भ : 1. Eames, A. J MacDaniells, L. H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1947.

            2. Esan, K. Plant Anatomy, New York, 1960.

घन, सुशीला प.