दिक्‌पात व दिक्‌पातमापक : एखाद्या ठिकाणी मुक्तपणे फिरू शकणाऱ्या चुंबकीय सूचीचा उत्तर ध्रुव ज्या दिशेने स्थिर होतो त्या दिशेला त्या ठिकाणची चुंबकीय उत्तर दिशा असे म्हणतात. त्याच ठिकाणच्या याम्योत्तर वृत्ताच्या दिशेला तेथील भौगोलिक उत्तर किंवा खरी उत्तर दिशा असे म्हणतात. खरी उत्तर दिशा व चुंबकीय उत्तर दिशा यांच्यामधील कोनाला दिक्‌पात असे म्हणतात आणि तो मोजण्याच्या साधनाला दिक्‌पातमापक असे म्हणतात.

आ. १. समदिक्‌पात रेषा (इ. स. १९६५ साठी) : अखंड रेषा पूर्वेकडे दर्शवितात व तुटक रेषा पश्चिमेकडे दिक्‌पात दर्शवितात

सामान्यतः या दोन उत्तर दिशा समानुपाती नसतात म्हणजेच दिक्‌पाताचे मूल्य शून्य नसते. इतकेच नव्हे तर विशिष्ट ठिकाणी या मूल्यात दररोज आवर्ती (पुनःपुन्हा होणारे) बदल होत असतात. वर्षानुवर्षे निरीक्षण केल्यास विशिष्ट ठिकाणचा दिक्‌पात हळूहळू बदलत जातो, असे आढळून येते. याशिवाय चुंबकीय वादळांच्या (पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात विस्तृत प्रमाणात निर्माण होणाऱ्या, सामान्यतः सूर्यावरील क्रियाशील डागांशी वा तेजःशिखांशी संबंधित असलेल्या, विक्षोभाच्या) वेळी दिक्‌पातात अकस्मात मोठे फेरफार होतात, असेही दिसून येते.

एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या दिक्‌पाताची मूल्ये सामान्यतः वेगळी असतात. होकायंत्राच्या साहाय्याने नौकानयन करताना व मार्गनिर्देशनातील चुका टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणची त्या त्या वेळची दिक्‌पात मूल्ये माहीत असणे आवश्यक असते. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी दिक्‌पाताचे मापन करून समदिक्‌पात रेषा (समान दिक्‌पात असणारी स्थळे जोडणाऱ्या रेषा काढलेले नकाशे प्रतिवर्षी प्रसिद्ध केले जातात (आ. १). या नकाशात दिलेल्या मूल्यात काही तात्कालिक तफावत पडलेली असल्यास ती काढण्यासाठी जहाजावरील मार्गनिर्देशक दिक्‌पाताचे पुनर्मापन करतात. दिक्‌पातमापन करण्याच्या अनेक साधनांपैकी दोहोंचे वर्णन व वापरण्याची पद्धत येथे दिली आहे.

क्यू (Kew) क्षेत्रमापक : याच्या साहाय्याने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा क्षैतिज (क्षितिजसमांतर) घटक H व दिक्‌पात या दोन्ही राशी अत्यंत अचूकपणे मोजता येतात (आ. २). यामध्ये एक चुंबकित केलेली पोलादी नळी–नलिकाचुंबक–एका पेटीत पीळरहित रेशमी धाग्याने क्षितिजसमांतर अशी टांगलेली असते. या चुंबकाच्या एका टोकाला पारदर्शक मोजपट्टी व दुसऱ्या टोकाला एक बहिर्गोल भिंग बसविलेले असते. भिंगाचे केंद्रातर नळीच्या लांबीइतके असते. त्यामुळे पट्टीपासून निघणारे किरण भिंगातून बाहेर येताना समांतर होतात. नळीला समाक्ष व भिंगासमोर एक दूरदर्शक (दुर्बिण) बसविलेला असतो. त्यातून पारदर्शक पट्टीवरील रेषा स्पष्ट दिसू शकतात. प्रथम टांगतारेवरील पीळ पूर्णपणे काढून टाकतात. मग दूरदर्शकासह उपकरणाची खालची बैठक (उभ्या अक्षाभोवती) हळूहळू अशी फिरवितात की, मोजपट्टीवरील मध्यावरची रेषा दूरदर्शकातील उभ्या लंघक रेषेशी (दृष्टी रेषा निश्चित करण्यासाठी दूरदर्शकाच्या केंद्रीय प्रतलात बसविलेल्या आणि एकमेंकीना काटकोनात छेदणाऱ्या दोन सूक्ष्म तारांपैकी उभ्या तारेशी) समपाती झालेली दिसेल. या परिस्थितीत नलिकाचुंबकाच्या भूमितीय अक्षाची दिशा खालच्या वर्तुळाकार मोजपट्टीवरून मिळते. यानंतर नलिकाचुंबक त्याच्या अक्षाभोवती १८० अंशांमधून फिरवून पुन्हा वरीलप्रमाणे त्याच्या भूमितीय अक्षाची दिशा काढतात. या दोन वाचनांचे माध्य (सरासरी) वाचन (व) नलिका चुंबकाच्या चुंबकीय अक्षाची दिशा म्हणजेच त्या ठिकाणची चुंबकीय दक्षिणोत्तर दिशा येते.


आ. २.क्यू क्षेत्रमापक: (१) परिपीडन गुंडी, (२) टांगतार, (३) पेटी, (४) नलिकाचुंबक, (५) आरसा, (६) दूरदर्शक, (७) क्षितिजसमांतर वर्तुळाकार मोजपट्टी, (८) बहिर्गोल भिंग.

त्या ठिकाणची भौगोलिक दक्षिणोत्तर दिशा माहीत असल्यास त्यावरून दिक्‌पात काढता येईल. भौगोलिक दक्षिणोत्तर दिशा माहीत नसल्यास प्रथम दूरदर्शक बरोबर क्षितिजसमांतर स्थितीत ठेवतात. त्याचप्रमाणे ५ या आरशाचा अक्षही बरोबर क्षितिजसमांतर करून घेतात. मग आरसा व त्याचबरोबर उपकरणाची बैठक अशी फिरवितात की शेवटी आरशात परावर्तन होऊन सूर्याची (किंवा एखाद्या ताऱ्याची) प्रतिमा दूरदर्शकात मध्यभागी दिसेल. ज्या क्षणी ही प्रतिमा लंघक रेषा ओलांडताना दिसेल ती वेळ एका सूक्ष्मग्राही कालमापकाच्या साहाय्याने नोंदतात. मग ७ या मोजपट्टीचे वाचन घेतात. हे वाचन नोंदलेला काळ आणि त्या ठिकाणचे अक्षांश व रेखांश यांवरून व नाविक पंचांगाचा उपयोग करून सूर्याचा खरा  ⇨ दिगंश काढता येतो. आता दूरदर्शक या दिगंशाइतक्या अंशातून फिरविल्यास त्याचा अक्ष बरोबर भौगोलिक दक्षिणोत्तर दिशेत येतो. या स्थितीतील मोजपट्टीचे वाचन () घेतात, मग (श-व) हा कोन म्हणजे दिक्‌पात होय.

आ. ३. दिकपातालेख:(अ) नेहमीच्या परिस्थितीत (११ नोव्हेंबर १९६० रोजी) (आ) चुंबकीय वादळाच्या वेळी (१३ नोव्हेंबर १९६० रोजी).

स्वयंचलित नोंद करणारा दिक्‌पातमापक : दिक्‌पातात होणाऱ्या कालानुसारी बदलांची अखंडपणे नोंद ठेवण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो. एका प्रकारच्या उपकरणात रेशमाच्या पीळरहित दोऱ्याने एक शक्तिमान चुंबक एका पेटीत आडवा टांगलेला असतो. ज्या आकड्यात लंबक ठेवलेला असतो त्याला एक छोटा आरसा बसविलेला असतो. या आरशावर तीव्र प्रकाशाची शलाका पाडतात. परावर्तित झालेली शलाका एका छायाचित्रणाच्या फितीवर पडते. ही फीत एका दंडगोलावर गुंडाळलेली असून घड्याळासारख्या यंत्रणेच्या साहाय्याने ती नियंत्रित वेगाने पुढेपुढे सरकत असते. जसजसा दिक्‌पात बदलेल तसतसा चुंबक व त्याबरोबर आरसाही विचलित होईल. त्यामुळे परावर्तित शलाकाही डावी–उजवीकडे विचलित होईल व फितीवर त्यानुसार नोंद होईल. आ. ३ मध्ये अशा फितीवरील नोंदी दाखविल्या आहेत. या चित्रांना दिक्‌पातालेख (मॅग्नेटोग्रॅम) असे म्हणतात.

पहा : भूचुंबकत्व.

संदर्भ : 1. Hadley, H. E. Magnetism and Electricity for Students, London, 1950.

           2. Hine, A. Magnetic Compasses and Magnetometers, London, 1968.

फाटक, मो. पुं. पुरोहित, वा. ल.