दिंग् लिंग् : (सु. १९०२– ). सुप्रसिद्ध चिनी लेखिका. तिचे मूळ नाव ज्यांग् वै–वन्. हूनान प्रांतातील ली–लींग येथे एका सुखवस्तू कुटुंबात जन्म. वडिलांच्या अकाली निधनानंतर (१९११) तिच्या आईने शिक्षिकेची नोकरी करून तिचे पालनपोषण केले. या अनुभवाचे चित्रण तिने मूच्यिन (१९३३, इं. शी. मदर) या कादंबरीत केले आहे. शाळेत असतानाच तिने स्त्रीहक्कांच्या चळवळीत भाग घेतला. पुढे ‘मे फोर्थ’ (१९६९) या चळवळीत तिने पुढाकार घेतला परंतु आपल्या कुटुंबियांशी न पटल्यामुळे ती शांघायला निघून गेली. तिथे तिने शिक्षिकेचे काम पतकरले. पुढे सांस्कृतिक चळवळीच्या आकर्षणामुळे तिने लेखिकेचा व्यवसाय निवडला. तिची व्यक्तिगत स्वातंत्र्याबद्दलची मते कम्युनिस्टांच्या मताशी न जुळल्याने तिने डाव्या गटातून आपले अंग काढून घेतले आणि पीकिंगमध्ये वास्तव्य करून आपले वेगळे लिखाण सुरू ठेवले. या काळात तिची सांपत्तिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने तिने उपजीविकेसाठी निरनिराळ्या तऱ्हेची कामे पतकरली. चित्रपटांतून भूमिकाही केल्या. या अनुभवावर तिने ‘मंग खू’ (१९२७) ही कथा लिहिली. त्यानंतर लिहिलेल्या अनेक लघुकथांतून तिने सर्वसाधारणपणे चीनमधील आधुनिक स्त्रीच्या समस्यांचे चित्रण केलेले आढळते. नंतरच्या काळातही दिंग् लिंग्ने बरेच कथासंग्रह प्रसिद्ध केले त्यांत चीनचे राजकारण आणि त्याचा क्रांतिकारी व्यक्तींच्या आयुष्यावर झालेला परिणाम हे मुख्य विषय आढळून येतात. हू ये फीन या कम्युनिस्ट प्रणालीच्या कवीबरोबर ती १९२५ पासून विवाहाविना राहिली. त्याच्या प्रभावामुळे ती त्या पक्षात सामील झाली. तथापि तिचे मतभेद मात्र कायम राहिले. युद्धकाळात दिंग् लिंग्ने बऱ्याच लघुकथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. त्यांत शेतकऱ्यांच्या वर्गसंघर्षाचे चित्रण प्रामुख्याने आढळून येते. त्यांपैकी Tai–Yang Chaotsai Sang–Kan Ho Shang(१९४८ इं. शी. द सन शाइन्स ओव्हर द सांग् गान् रिव्हर) या कादंबरीला १९५१ साली स्टालीन पारितोषिक मिळाले.
दिंग् लिंग्ची १९४९ नंतर अनेक वरिष्ठ पदांवर नेमणूक झाली. त्यामुळे तिचे वाङ्मयीन लिखाण जवळजवळ बंद पडले आणि राजकीय लिखाण वाढले. कम्युनिस्ट पक्षाची सदस्या असतानासुद्धा तिचे पक्षाशी असलेले मतभेद या लिखाणात आढळून येतात. त्यामुळे काही पक्षसदस्यांनी तिच्यावर कडक टीका केली. प्रत्युत्तरादाखल तिने ‘वाङ्मयीन क्षेत्रात सरकारने अजिबात ढवळाढवळ करू नये’, असे प्रतिपादन केले. त्याचा परिणाम म्हणजे १९५८ साली तिची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि तिच्या लिखाणावर बंदी आली. नंतरच्या काळातील तिच्या कर्तृत्वाविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही.
देशिंगकर, गि. द.