वू जिंग–झू : (? १७०१–१२ डिसेंबर १७५४ ). चिनी साहित्यातील पहिल्या उपरोधप्रचुर कादंबरीचा कर्ता. जन्म चूवॉन-जो येथे एका व्यासंगी, सुखवस्तू कुटुंबात. तथापि स्वतःच्या आयुष्यात व्यासंग आणि अर्थार्जन ह्या दोन्ही बाबतींत तो अपयशी ठरला. त्याच्या काळात अधिकारपदे मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षाही देण्याबाबत तो उदासीन राहिला. वारशाने त्याला मिळालेल्या संपत्तीचा त्याने दुरूपयोग केला आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी विपन्नावस्थेत नानकिंग येथे आला. तेथेही मद्यपानात तो आपला वेळ घालवीत असे. १७४० च्या सुमारास तो Ju-Lin wai-shih (इं. भा. द स्कॉलर्स,१९५७) ह्या आपल्या कादंबरीचे लेखन करू लागला व सु. १७५० मध्ये त्याने ती पूर्ण केली. ही कादंबरी अंशतः आत्मचरित्रात्मक असून त्याने भ्रष्टाचारी व्यक्तींच्या आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या घेतलेल्या अनुभवांचे उपरोधपूर्ण चित्रण ह्या कादंबरीत केले आहे. अधिकारपदे मिळवण्यासाठी परीक्षापध्दती निर्माण करण्याच्या समाजव्यवस्थेवरही त्याने टीका केली. किआंगसू प्रांतात असलेल्या यांगजो येथे तो निधन पावला.          

कुलकर्णी, अ. र.