दाव्हीद, झाक ल्वी : (३० ऑगस्ट १७४८–२९ डिसेंबर १८२५). एक श्रेष्ठ नव–अभिजाततावादी फ्रेंच चित्रकार. एका मध्यमवर्गीय कुटुंबात पॅरिस येथे जन्म. दाव्हीदचे घराणे पूर्वीपासूनच पॅरिस येथे स्थायिक झालेले होते. रोकोको शैलीत विशेष नाव मिळविलेल्या त्याच्या नात्यातील बूशे (१७०३–७०) आणि पुढे व्हिएन (१७१६–१८०९) ह्यांच्याकडे त्याने चित्रकलेचे शिक्षण घेतले. १७७४ मध्ये अनेकदा केलेल्या प्रसत्नांनंतर त्याला ‘प्रिक्स द रोम’ हे पारितोषिक मिळविण्यात य़श लाभले. त्यानंतर रोम येथेच व्हिएनच्या सहवासात राहून त्याने प्राचीन अभिजात कलांचा अभ्यास केला. १७७४ मध्ये तो ‘रॉयल ॲकॅडेमी’ चा सदस्य बनला. १७८१ मध्ये तो पॅरिसला परतला. लूव्ह्र येथे त्याला स्वतंत्र स्टुडिओही देण्यात आला.
दाव्हीदचे पहिले महत्त्वाचे चित्र म्हणजे ओथ ऑफ द होराती (१७८५). फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवरील हे चित्र फार गाजले. हे चित्र प्रतीकात्मक असून रोमन लोक जसे राष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत, त्याप्रमाणे फ्रेंच लोकांनी क्रांतीला प्रतिसाद द्यावा, अशी सूचना देणारे आहे. रोममध्ये असतानाच दाव्हीदने आणखी दोन महत्त्वाची चित्रे रेखाटली. ती म्हणजे द डेथ ऑफ सॉक्रेटीस (१७८७) व द लिक्टर्स ब्रिंगिंग टू ब्रूट्स द बॉडीज ऑफ हिज सन्स (१७८९). दाव्हीदने कुंचल्याच्या एका फटकाऱ्याने जुन्या राजमान्य अशा रोकोको चित्रशैलीचा अंत घडवून आणला, असे गौरवाने म्हटले जाते, ते याच प्रकारच्या चित्रांमुळे.
दाव्हीद हा क्रांतिसंघटनेतील पॅरिसचा प्रतिनिधी होता. त्याचप्रमाणे सार्वजनिक सुरक्षा समितीचा तो सभासदही होता. चौदाव्या लुईच्या काळातील रॉयल ॲकॅडेमी बदलून त्याने तिची संपूर्ण पुनर्रचना केली. लूव्हर येथील सार्वजनिक कलावीथीलाही त्याने नवे रूप दिले. क्रांतिपर्वातील रॉयल ॲकॅडेमीचा तो प्रवक्ता होता. या काळातील त्याची दोन चित्रे उल्लेखनीय आहेत. ती म्हणजे द डेथ ऑफ मॅरात (१७९३) व द ओथ ऑफ द टेनिस कोर्ट (१७९०). यांपैकी दुसरे चित्र अपूर्ण आहे. रोब्झपीअरच्या पदच्युतीनंतर दाव्हीदला दोनदा तुरुंगवास घडला. तुरुंगवासातून सुटल्यावर त्याने काही सुंदर व्यक्तिचित्रे रेखाटली त्यांपैकी मादाम सेरिझिआत (ही त्याची मेहुणी होती) व मादाम झूली रेकाम्ये यांची चित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. पुढे नेपोलियनच्या काळात त्याने त्याच्या विजयावर आधारलेली पुष्कळ चित्रे काढली. लीऑनिडस अट थर्मॉपिली (१८१४) हे त्याचे उल्लेखनीय चित्र. दाव्हीद नेपोलियनचा समर्थक होता. फ्रेंचांनी नेपोलियनचा विश्वासघात केला, अशी सूचकता या चित्रातून जाणवते. दाव्हीदचे अखेरचे दिवस हद्दपारीत ब्रुसेल्स येथे गेले. पण फ्रेंच चित्रकारांवरील त्याचा प्रभाव अखेरपर्यंत टिकून होता. त्याच्या अनेक अनुयायांपैकी अँग्र उल्लेखनीय आहे.
दाव्हीदची नव-अभिजाततावादी शैली ही त्याच्या कलात्मक विकासातील एक टप्पा होता, असे म्हटले जाते. कारण फ्रेंच क्रांतीशी निगडित असलेली त्याची द डेथ ऑफ मॅरातसारखी नंतरची चित्रे आत्यंतिक साधेपणा व नियमबद्धता या नव-अभिजाततावादी विशेषांना ओलांडून जाणारी व उत्कट भावनात्मकता व्यक्त करणारी आहेत. फ्रेंच चित्रकलेच्या इतिहासात दाव्हीदचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
संदर्भ: 1. Cantinelli, Richard, Jacques–Louis David, Paris, 1930.
2. Dowd, David L. Pageant–Master of the Republic, Lincoln, Nebr, 1948.
3. Valentiner, Wilhelm P. Jacques Louis David and the French Revolution, New York, 1929.
जाधव, रा. ग.
“