दाल्गादु, माँसिग्नोर सेबाश्तियांव रोदोल्फु : (८ मे १८५५–४ एप्रिल १९२२). भाषाशास्त्रज्ञ व कोशकार. जन्म आसगाव, बारदेश, गोवा. रायतूरच्या सेमिनरीमध्ये त्यांनी धर्मविद्येचा अभ्यास केला. धर्मोपदेशक झाल्यावर ते रोमला गेले. तेथे धार्मिक व रोमन कायदा ह्या विषयांत त्यांनी डॉक्टरेट मिळविली. पोपने त्यांना ‘माँसिग्नोर’ ही पदवी बहाल केली. १८५५ मध्ये ते ‘राजाचे मिशनरी’ म्हणून भारतात परतले. चर्चच्या न्यायालयाचे न्यायाधीश, सेमिनरी व शाळांचे इन्स्पेक्टर व नंतर रायतूरच्या सेमिनरीत ‘पवित्र ग्रंथा’चे व धार्मिक न्यायाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. श्रीलंका, बंगाल, होनावर व सावंतवाडी येथे व्हिकार जनरल म्हणून त्यांनी काम केले. सिंहली, मल्याळम्, बंगाली, कन्नड, मराठी, संस्कृत या भाषांचा त्यांनी अभ्यास केला. ‘कोकणी–पोर्तुगीज शब्दकोश’(दिसियोनारियु कोकानी–पुर्तुगेज) त्यांनी १८९३ मध्ये प्रसिद्ध केला. लिस्बनला जाऊन त्यांनी १९०४ मध्ये ‘पोर्तुगीज–कोंकणी शब्दकोश’ (दिसियोनारियु, पुर्तुगेज–कोंकानी) प्रसिद्ध केला. ह्या कोशांमुळे कोंकणीच्या अभ्यासाला जोरदार चालना मिळाली. १९०७ मध्ये त्यांना पोर्तुगालच्या विज्ञान अकादमीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आणि साहित्यातील डॉक्टरेट देण्यात आली. १९१७–२२ पर्यंत त्यांनी लिस्बन विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले. हितोप देश (१८९७) आणि नलदमयंती कथा (१९१६) यांची पोर्तुगीज भाषांतरेही त्यांनी प्रसिद्ध केली. पोर्तुगीज शब्दांचा आशियाई भाषांवरील प्रभाव (इंफ्लुयॅन्सिय दु व्हाकाबुलारियु पुर्तुगेज एँ लींग्वश आझियातिकश) व कोंकणी म्हणींचा संग्रह (फ्लोरिलॅजियु दुश प्रॉव्हॅरबियुश काँकानीश, १९२९) हे त्यांचे ग्रंथ अत्यंत मौलिक गणले जातात. त्यांची शेवटची अकरा वर्षे फार हालअपेष्टांत गेली. त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यांपर्यंत कापून काढावे लागले. असल्या स्थितीत देखील त्यांनी अध्ययन, लेखन व अध्यापन सोडले नाही. ते लिस्बनमध्ये निधन पावले. त्यांचे कोंकणी भाषेचे व्याकरण (अप्रकाशित) उपलब्ध आहे. चर्चमध्ये कोंकणीतून प्रवचने देण्याचा पायंडा त्यांनीच पाडला.
संदर्भ:Pereira, y3wuoe, Konkani a Language, Dharwar, 1971.
सरदेसाय, मनोहरराय
“