‘L. H. O. O. Q.’(१९१९) – मार्सेल द्यूशाँ.

दादावाद : कला−साहित्य क्षेत्रातील एक आधुनिक संप्रदाय. पहिल्या महायुद्धाच्या काळात तो उदयास आला. महायुद्धातील प्रचंड मानवी संहार व उद्‌ध्वस्त समाजजीवन यांतून प्रस्थापित विचारसरणी, सामाजिक वर्तनाचे नियम, प्रचलित नीति–सौंदर्यमूल्ये या सर्वांमागील वैयर्थ्य व पोकळपणा युद्धग्रस्त तरुण पिढीला जाणवला. त्याची तीव्र निषेधात्मक प्रतिक्रिया म्हणून निरर्थकतेची, असंबद्धतेची व शून्यवादी जाणीव आणि त्यातून समाजमान्य ते ते सारे काही नाकारणारी नकारात्मक, अराजकतावादी व मूल्य–संस्थादी प्रस्थापित गोष्टींवर प्रहार करणारी विध्वंसक मनोभूमिका निर्माण झाली. तिचा कला–साहित्यातील आविष्कार दादावादाच्या रूपाने झाला.

झुरिकमध्ये एकत्र जमलेल्या एका कलावंत गटाने १९१५ मध्ये या संप्रदायाची स्थापना केली. या गटामध्ये रूमानियन कवी त्रिस्तान त्सारा (१८९६–१९६३), जर्मन लेखक हूगो बाल (१८८६–१९२७) व रिखार्ट ह्यूल्झेनबेक आणि फ्रेंच कवि–शिल्पकार हान्स आर्प (१८८७–१९६६) यांचा समावेश होता. ‘दादा’ (खेळण्यातील लाकडी घोडा) हा फ्रेंच शब्द जर्मन–फ्रेंच शब्दकोशातून यदृच्छया–म्हणजे शब्दकोश उघडताक्षणीच समोरच्या पृष्ठावर जो शब्द सापडला तो–स्वीकारण्यात आला होता. संप्रदायाच्या प्रदर्शनांसाठी आणि संमेलनांसाठी ‘कॅबरे व्हॉल्टेअर’ या क्लबाची स्थापना करण्यात आली. त्साराच्या संपादकत्वाखाली १९१७ मध्ये दादा या नियतकालिकाचे प्रकाशन सुरू झाले. दादा ३ या अंकामध्ये पंथाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यात अस्तित्वात असलेल्या सर्व नैतिक व कलात्मक मूल्यांचा विध्वंस करण्याची भूमिका मांडली होती. झुरिकप्रमाणेच न्यूयॉर्क येथे मार्सेल द्यूशाँ (१८८७– ), फ्रांसीस पीकाब्या (१८७९–१९५३) आणि मॅन रे (१८९०– ) या कलावंतांनी दादावादी चळवळ सुरू केली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस झुरिकमधील दादावादी गट विस्कळित झाला. तेथील ह्यूल्झेनबेक, ग्रोस, हाउसमान इ. कलावंतांनी ही चळवळ बर्लिनमध्ये नेली तिथे तिला काहीसे राजकीय वळणही लागले. कुर्ट श्व्हिटर्स (१८८७–१९४८) या प्रमुख दादावादी कलावंताने हॅनोव्हर येथे दादावादाशी समांतर अशी ‘मेर्झ’ प्रणाली मांडली. दादावादाची आणखी एक शाखा हान्स आर्प व मॅक्स अर्न्स्ट (१८८१–) यांनी कोलोन येथे स्थापन केली. १९२१ मध्ये या चळवळीचे केंद्र पॅरिसकडे सरकले व तिथेच तिचा १९२२ च्या दरम्यान अस्त झाला.

धक्कादायक, विवेकविरोधी व बंडखोर असे वर्तनविशेष व कलाप्रदर्शने हे या संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य. प्रबोधनकाळापासून कलात्मक सौंदर्याचा मानदंड मानले गेलेले, लिओनार्दो दा व्हींचीचे मोनालिसा हे चित्र मोनालिसाला दाढीमिशा लावून मार्सेल द्यूशाँने विरूपित केले आणि L. H. O. O. Q. (१९१९) या नावाने प्रदर्शित केले. या टिंगल–टवाळीतून आधुनिक कलावंतही सुटले नाहीत. एका चित्रचौकटीमध्ये खेळण्यातील माकड दर्शवून ते पोर्ट्रेट ऑफ सेझान या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. द्यूशाँने सायकलच्या चाकासारख्या तयार वस्तूंचा उपयोग करून काही सिद्धवस्तुशिल्पे (रेडिमेड्‌स) निर्माण केली. आर्पने रंगीत कागदांचे कपटे यदृच्छया कापून–जोडून चिक्कणितचित्रे बनवली. गोंगाटाचे कर्कश संगीत संदर्भशून्य, केवळ ध्वन्यानुसारी व अमूर्त काव्यरचना एकाच वेळी ३८ व्याख्यात्यांनी केलेला सामुदायिक व्याख्यानाचा प्रयोग अशांसारखी या संप्रदायाची निर्मिती होती. १९२० मध्ये कोलोन येथे भरलेले दादावादी प्रदर्शन त्यातील विक्षिप्त तऱ्हेवाईकपणाने गाजले. एका कॅफेच्या स्नानगृहाच्या मार्गावर हे प्रदर्शन भरवले होते आणि प्रदर्शनातील ‘प्रति–कलाकृती’ चा (अँटिआर्ट) विध्वंस करण्यासाठी प्रेक्षकांना हत्यारे पुरवण्यात आली होती. अखेरीस पोलिसांनी हे प्रदर्शन बंद पाडले.

दादावाद्यांच्या या विध्वंसनात्मक व अराजकतावादी प्रवृत्तीचेही काही एक विधायक अंग होते. त्यांच्या विवेकविरोधातून व बंडखोरीतून विमुक्त सर्जनशीलतेला चालना मिळाली व त्यांनी निर्मितिक्षम मनाच्या अज्ञात प्रदेशाचा–अबोध मनाच्या खोल तळाचा–वेध घेण्यास कलावंतांना प्रवृत्त केले. या विधायक प्रेरणांतूनच १९२४ मध्ये ⇨ अतिवास्तववादाचा उगम झाला. कुर्ट शिव्हटर्स आणि मॅक्स अर्न्स्ट यांची चिक्कणितचित्रे दादावादापासून अतिवास्तववादापर्यंतच्या संक्रमणावस्थेची सूचक आहेत.

संदर्भ : 1. Motherwell, Robert, Ed. The Dada Painters and Poets: An Anthology, New York, 1951.

           2. Richter, Hans, Dada : Art and Anti–Art, London, 1965.

इनामदार, श्री. दे.