दक्षिण गुजरात विद्यापीठ : गुजरात राज्यातील एक विद्यापीठ. सुरत येथे २३ मे १९६७ रोजी ते स्थापन झाले. त्याचे स्वरूप अध्यापनात्मक व संलग्नक असून त्याच्या कक्षेत सुरत, बलसाड, भडोच व डांग या महसुली जिल्ह्यांतील तसेच नवसारी येथील महाविद्यालये अंतर्भूत होतात. १९७४ मध्ये एकूण ३३ महाविद्यालये त्यास संलग्न होती. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू व कुलसचीव हे सवेतन सर्वोच्च अधिकारी विद्यापीठाची प्रशासनव्यवस्था पाहतात. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ३१,२०० ग्रंथ आहेत (१९७३). विद्यापीठात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व व्यवसाय यांचे मार्गदर्शन करण्याकरिता एक खास विभाग आहे. तंत्रविद्या व अभियांत्रिकी ह्या विषयांपुरती विद्यापीठाने षण्मास परीक्षापद्धत सुरू केली असून इतर विषयांतही ही पद्धत सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. मानव्यविद्या, विधी, वाणिज्य, वैद्यक, तंत्रविद्या आणि अभियांत्रिकी, ग्रामीण अभ्यासक्रम वगैरे विषयांच्या विद्याशाखा असून पाठनिर्देशांवर भर देण्यात येतो. याशिवाय विद्यापीठीय विज्ञान विद्यालयात व्यवसाय व्यवस्थापन व औद्योगिक व्यवस्थापन या विषयांचे शिक्षण दिले जाते. १९७३–७४ मध्ये विद्यापीठाचे उत्पन्न ७२·७१ लाख रुपये होते. त्यांपैकी ७०% उत्पन्न अनुदानाद्वारे मिळाले होते. विद्यापीठातील सर्व सलग्न महाविद्यालयांतून २३,९७६ विद्यार्थी शिकत होते (१९७४).
देशपांडे, सु. र.