दस्तऐवज: पुराव्यायोग्य कागदपत्र. भारतीय दंड संहिता कलम २९ व पुराव्याच्या कायदा कलम ३ मध्ये दस्तऐवजाची व्याख्या दिली आहे. या व्याख्येप्रमाणे अक्षर, आकृती वा चिन्ह इत्यादींच्या योगाने कशावरही अभिव्यक्त किंवा विषद केलेला विषय हा दस्तऐवजात मोडतो मात्र पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकला पाहिजे वा पुरावा म्हणून उपयोग करण्याची त्यामागे इच्छा असली पाहिजे. कोणतेही लेखन, मुद्रित, शिलामुद्रित अथवा छायाचित्रित शब्द, शिक्के, तक्ते, कोरलेले लेख, किंवा खोदलेले दगड त्याचप्रमाणे छायाचित्र, चित्र, नकाशे व आराखडे यांचा समावेश दस्तऐवजामध्ये करण्यात येतो. विनिमयपत्राच्या मागे स्वाक्षरी केल्यानंतर ते दस्तऐवजात मोडते. धनादेश, नकाशा किंवा आराखडा हेही दस्तऐवजच आहेत. परकीय चलनही दस्तऐवज समजण्यात येते. इंग्लिश कायद्यात केलेली दस्तऐवजाची व्याख्या संकुचित आहे.
एखाद्या लिखितावर संबंधित सर्वांच्या स्वाक्षऱ्या नसल्या व एकाचीच स्वाक्षरी असली, तरी त्याची दस्तऐवजामध्ये गणना होईल. विवाहाची मुद्रित पत्रिकाही दस्तऐवजात मोडते. जर एखादा आशय पुरावा म्हणून उपयोगात आणण्याची इच्छा असली व जर विधीच्या दृष्टीने तिचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकत नसला, तरी त्यास दस्तऐवज म्हणता येईल. एखाद्या जंगम मालमत्तेबद्दलच्या स्वरूपाविषयी वा गुणाविषयी केलेली लिखित किंवा मुद्रित घोषणा, एखाद्या चित्रावरील कलाकाराच्या नावाची खोटी स्वाक्षरी, बनावट मालाच्या वेष्टनावरील व्यापारी चिन्हाची नक्कल ह्या गोष्टी दस्तऐवजात मोडत नाहीत, असे काही इंग्लिश दाव्यात दिलेले निर्णय उल्लेखनीय आहेत. लेखी पुरावा म्हणून कायद्यात दस्तऐवजाचे महत्त्व फार मोठे आहे.
खोडवे, अच्युत
“