दवणा: (सं. दमनक लॅ. आर्टेमिसिया पॅलेन्स कुल–कंपॉझिटी). सु. १५–३० सेंमी. उंच व सरळ वाढणाऱ्या ह्या शाखायुक्त व लवदार सुगंधी ओषधीची[⟶ ओषधि] लागवड उत्तर भारतात (जम्मू व काश्मीरमध्ये), द. भारतात (विशेषतः कर्नाटकामध्ये) आणि महाराष्ट्रात आळंदी व जेजुरीकडे देवपूजेस उपयुक्त म्हणून केली जाते. मूलस्थानाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. आर्टेमिसिया पर्सिका या लॅटिन नावाच्या (पण मराठीत ‘दवणा’म्हटल्या जाणाऱ्या) वनस्पतीचा प्रसार निसर्गतः पश्चिम तिबेटांत २,७९०–३,१०० मी. उंचीपर्यंत आहे. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी होत जाते. सर्वांत खालची फार विभागलेली व अंतिम विभाग (खंड) रेषाकृती, सर्वांत वरची अखंड, पण मधली अल्प खंडित (काहीशी विभागलेली) असतात. फुलांचे स्तबक [⟶ पुष्पबंध] फुलोरे गोलसर, पिवळट हिरवे, लहान व मंजरीत मार्च-एप्रिलमध्ये येतात. स्तबकात किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व बिंब-पुष्पके उभयलिंगी आणि सर्व जननक्षम असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨कंपॉझिटी कुलात (सूर्यफूल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. बी फार लहान, काळे व लांबट. दवणा तिखट, कडू, सुगंधी, पौष्टिक, ज्वरनाशक व कृमिनाशक असतो. सुगंधी पदार्थांत त्याचा उपयोग करतात. दवणा-तेल पिंगट, दाट, सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात वापरतात. सु. २२–५८% तेल निघते. अमेरिकेत सुगंधी द्रव्यांच्या व्यापारात त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
बागेत लावण्याचे प्रकार बहुतेक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून साधारण परिस्थितीत हलक्या आणि कमी ओलाव्याच्या जमिनीत सुद्धा जोमाने वाढतात. नवीन लागवड खत व मशागत देऊन तयार केलेल्या जमिनीत चांगल्या झाडांचे मुळवे फोडून एके ठिकाणी एक–दोन असे पाणी देऊन लावतात. बियांपासूनही लागवड करतात. हे पीक फार काळजीने वाढवावे लागते.
जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.
“