थेसालोनायकी : सलॉनिक. ग्रीसच्या मॅसिडोनिया प्रांताची राजधानी व इजीअन समुद्राचे प्रवेशद्वार. नवतुर्कस्तानचा निर्माता केमाल आतातुर्क याचे जन्मस्थान आणि ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ३,४५,७९९ (१९७१). अथेन्सच्या वायव्येस ३०० किमी. वर हे सलॉनिक आखातावर वसले असून सलॉनिक म्हणूनही ओळखले जाते. याचे मूळ नाव थेमी, म्हणजे गरम झऱ्यांचे स्थान असे होते. इ. स. पू. ३१५ मध्ये कॅसेंडर ह्या मॅसिडोनियन राजाने ते बांधून त्यास थेसालोन्यीक्यी हे नाव दिले. त्याच्यावर १४१३ पर्यंत रोमन, बायझंटिन, नॉर्मन, सॅरेसीन इत्यादींचा अंमल होता. १४३०–१९१२ पर्यंत ते तुर्की अंमलाखाली होते. बाल्कन युद्धाच्या वेळी ग्रीकांनी ते घेतले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी मित्रराष्ट्रांनी त्याचा इतर मोहिमांसाठी उपयोग केला. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४१–४४ ते जर्मनीच्या ताब्यात होते. त्या वेळी त्याचे फार नुकसान झाले व तेथील प्राचीन ज्यू लोकांची वसाहतही नामशेष झाली. पुढे ग्रीसने पुन्हा त्यावर वर्चस्व प्रस्थापिले. हे उत्कृष्ट बंदर व लोहमार्गाचे केंद्र असून येथे विमानतळही आहे. हे एक अद्ययावत औद्योगिक केंद्र व आधुनिक शहर आहे. शहरात सिमेंट, साबण, सुती व रेशमी वस्त्रनिर्मिती, कातडी वस्तू, सिगारेट, जहाजे आदींचे कारखाने असून येथून तंबाखू, लोकर, कातड्याच्या वस्तू, मँगॅनीज व कच्चे धातू यांची निर्यात होते. शहरात एक विद्यापीठ असून शहरातील प्राचीन अवशेषांत बायझंटिन काळातील पांढरी भिंत, पांढरा मनोरा, तसेच व्हेनिशियन बालेकिल्ला, सेंट सोफिया, सेंट डेमिटरायस, सेंट जॉर्ज आदी चर्चे यांचा समावेश होतो. ह्यांशिवाय आधुनिक वास्तूंनी सर्व शहर सुशोभित झालेले आहे.

देशपांडे, सु. र.