थील, योहानेस : (१३ मे १८६५–१७ एप्रिल १९१८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. नायट्रोजनयुक्त संयुगांचे संशोधन आणि अतृप्त (इतर पदार्थांशी चटकन संयोग पावण्याची प्रवृत्ती असलेल्या) कार्बनी संयुगांसंबंधीचा सिद्धांत यांबद्दल प्रसिद्ध. पोलंडमधील रात्सीबूश येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण ब्रेस्लौ विद्यापीठात (१८८३–८४) व नंतर याकोब व्होलहार्ड यांच्या मार्गदर्शनाखाली हॅले येथे झाले. १८९० मध्ये हॅले येथे त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली व तेथेच ते विश्लेषणात्मक आणि कार्बनी रसायनशास्त्राचे अध्यापन करू लागले. १८९३ मध्ये ते म्यूनिक येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून ॲडोल्फ फोन बायर यांच्या हाताखाली काम करू लागले. १९०२ मध्ये स्ट्रासबर्ग येथे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९१० मध्ये ते तेथील विद्यापीठाचे रेक्टर झाले. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी तारायंत्राने दिल्या जाणाऱ्या वृत्तांच्या अभ्यवेक्षकाचे (सेन्सॉरचे) काम काही काळ केले. म्यूनिक ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे १९१० साली ते सभासद झाले. व्होलहार्ड यांच्या मृत्यूनंतर ते Justus Liebig’s Annalen der Chemie या नियतकालिकाचे संपादक झाले.
अतृप्त कार्बनी संयुगातील कार्बनाचे अणू द्विबंधाने एकमेकांस जोडले गेले आहेत असे मानले जाते परंतु एकाऐवजी दोन बंधांनी झालेला रासायनिक संयोग एकबंधाने झालेल्या संयोगापेक्षा जास्त बळकट व त्यामुळे द्विबंध असलेले संयुग जास्त स्थिर असले पाहिजे, असा अर्थ त्यातून निघतो. प्रत्यक्षात तसे नसल्यामुळे द्विबंध ही संज्ञा यथार्थ नाही. द्विबंध असलेल्या संयुगाच्या विक्रियाशीलतेचे स्पष्टीकरण करण्यासाठी थील यांनी असे सुचविले की, जेव्हा द्विबंधांनी संयोग होतो तेव्हा सर्व संयुजा (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याची क्षमता) वापरली जात नाही. तिचा काही भाग (आंशिक संयुजा) शिल्लक राहतो व त्यामुळे अशी संयुगे विक्रियाशील होतात. एकबंध व द्विबंध यांच्या आलटून पालटून असणाऱ्या रचनेला त्यांनी ‘एकांतरित द्विबंध’ अशी संज्ञा दिली. अशा रचनेतील मधल्या दोन कार्बन अणूंवरील आंशिक संयुजा एकमेकींची परिपूर्ती करतात आणि त्यामुळे टोकाचे कार्बन अणूच फक्त विक्रियाशील राहतात. बेंझीन वलयात एकांतरित द्विबंधाची बंदिस्त योजना आहे व त्यामुळे बेंझीनाचे रासायनिक निष्क्रियत्व स्पष्ट होते. थील यांच्या या सिद्धांताला ‘आंशिक संयुजा सिद्धांत’ म्हणतात. या सिद्धांतामुळे यासंबंधीच्या संशोधनास जी चालना मिळाली, तिच्यामुळेच कार्बनी विक्रियांच्या यंत्रणांचे स्पष्टीकरण करण्यासाठी इलेक्ट्रॉनीय सिद्धांत मांडण्यात आले.
ग्वानिडीन व हायड्रॅझीन आणि त्यांचे अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे) ह्यांसारख्या नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगांवरील त्यांच्या संशोधनामुळे बऱ्याच नवीन संयुगांचा व नवीन संश्लेषण (कृत्रिम रीत्या पदार्थ तयार करण्याच्या) प्रक्रियांचा शोध लागला. नायट्रोजन अणुयुक्त पाच व सात अणूंचे वलय असणारी कार्बनी संयुगे त्यांनी तयार केली. नायट्रामाइड (NH2NO2) हे संयुग त्यांनी तयार केले. याचे आणि हायपोनायट्रस अम्लाचे (H2N2O2) रेणुसूत्र (रेणूतील अणूंची संख्या आणि प्रकार दाखविणारे सूत्र) एकच असल्यामुळे एकाच रेणुसूत्राची भिन्न संयुगे असल्याचे अकार्बनी रसायनशास्त्रातील हे पहिलेच उदाहरण होय. कार्बन मोनॉक्साइड वायू शोषून घेणाऱ्या वायु–मुखवट्याचा शोध त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात लावला.
ते व त्यांचे सहकारी यांनी केलेले संशोधन १३० लेखांच्या रूपाने विविध शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. ते स्ट्रासबर्ग येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..