थाई भाषा–साहित्य : चीनच्या दक्षिणेला, पूर्वी इंडोचायना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या काही भाषांना ‘थाई’ ही समूहदर्शक संज्ञा आहे. त्याचप्रमाणे या समूहातील सयामी ही भाषाही ‘थाई’ याच नावाने ओळखली जाते. हा घोटाळा टाळण्यासाठी या भाषासमूहाला कित्येकदा ‘ताई’ हे नाव लावण्यात येते.
थाई भाषांची विभागणी चार गटांत करण्यात येते: (१) मिन् किआ–लोलो गट : या गटातील भाषा चीनच्या सेचवान, क्केइचाऊ, युनान व तॉङ्किङ् या प्रदेशांत बोलल्या जातात. यात मिन् किआ, लामाजेन, सिहिआ, लोलो व मोसो या बोली येतात. त्यांपैकी लोलो ही विशेष प्रसिद्ध असून ती वीस लाखांपेक्षा अधिक लोकांकडून बोलली जाते. (२) कारेन गट : ब्रह्मदेशातील पेगूयोमा ते थाई सरहद्दीपर्यंत या बोली पसरल्या आहेत. त्यांच्यावर ब्रह्मीचा बराच प्रभाव पडलेला आहे. (३) थाई गट : थाई गटात पुढील भेद आहेत: (अ) उत्तरेकडील थाई : खामती, ताइरोङ् आणि आसाम व ईशान्य ब्रह्मदेशातल्या कित्येक बोली. पूर्व ब्रह्मदेशातील शान संस्थानांच्या भाषा. (आ) मध्य थाई : तॉङ्किङ् व युनानलगतच्या भागात बोलल्या जाणाऱ्या विविध बोली. दक्षिण चीनमधील नुङ्, न्हाङ्, चोङ्किआ व द्योइ या बोली. (इ) दक्षिण थाई : ज्यात गौर थाई आणि कृष्ण थाई बोलल्या जातात अशी मध्य व दक्षिण थाई, उ. थायलंड व ब्रह्मदेशातील ॲम्हर्स्टभोवतालचा प्रदेश यांत बोलली जाणारी लाओ, शान संस्थानात बोलल्या जाणाऱ्या, तसेच शान बोली व थाई यांच्यामधील संक्रमकरूप अशा लू व खॅून. (ई) चौदाव्या शतकात आसामात प्रचलित असलेली पण आता वापरात नसली तरी साहित्याच्या अभ्यासासाठी वाचली जाणारी आहोम. आसामातील आइतोन्या. (उ) हैनान बेटात बोलल्या जाणाऱ्या ख्लाइ बोली. त्यांनाच ली (ले), लाकिआ, लोइ किंवा दाइ (कादिआ) हीही नावे आहेत. (ऊ) लिओओ वा केलाओ ही युनान आणि क्केइचाओ यांच्या सीमेवर बोलली जाते. ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (४) आनामित गट : जरी मुळात थाई बोली आहेत, तरी त्यांत माङ्ख्मेर व चिनी अंश बरेच सापडतात.
लिपी : थाईभाषिक प्रदेश इतर आग्नेय आशियातील देशांप्रमाणे हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे त्याची लिपीही मुळात दक्षिण भारतीय आहे. तेराव्या शतकातील सुखोदय शिलालेखातील लिपीपासून ती उत्क्रांत होत गेली आहे. मात्र थाई ध्वनी, पाली व संस्कृतमधील ध्वनी, रोहचिन्हे इत्यादींमुळे ती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. काही चिन्हांचा उच्चार व उपयोग स्पष्ट आहे पण काही चिन्हे बाहेरच्या अभ्यासकाला कळणे कठीण असते. त्यामुळे या लिपीत ४४ व्यंजनचिन्हे व ३९ स्वरचिन्हे आहेत.
उच्चार : थाई भाषा रोहप्रधान आहेत आणि त्यांच्यातील सर्व शब्द एकावयवी आहेत. एकंदर रोह (आवाजातील चढउतार) चार व विशिष्ट रोहाचा अभाव एक अशा प्रकारे प्रत्येक स्वर पाच प्रकारे उच्चारता येतो. हे चार रोह म्हणजे – १ खालचा (निम्न), २ खालून वर जाणारा (आरोह), ३ वरून खाली येणारा (अवरोह) आणि ४ वरचा (उच्च) हे होत. यांचा अभाव (समरोह) हेही स्वराचे वैशिष्ट्य असू शकते. म्हणजे एकंदर स्वरसंख्या या रोहनिष्ठेमुळे पाचपट होते.
स्वर: अ, आ, इ, ए, ॲ, उ, ओ, आ, उॅ.१
अलीकडच्या काळात सघोष व्यंजनात परिवर्तन होऊन सघोष व्यंजनांची जागा महाप्राण अघोष व्यंजनांनी घेतली आहे. परिणामी या भाषेचे पूर्वीचे ‘दाइ’ हे नाव जाऊन त्याचे ‘थाइ’ असे रूपांतर झाले आहे.
शब्द : सर्व शब्द एकावयवी आहेत. पण पाली आणि कंबोडियनमधून घेतलेले शब्द सयामीत इतके आहेत, ती त्यामुळे काही दोन वा अधिक अवयवांचे शब्दही आढळतात. शब्दांना कोणताही विकार होत नाही.
व्याकरण : व्याकरणाचा मराठीसारख्या भाषेला अभिप्रेत असलेला अर्थ थाईत नाही. एकावयवत्व हा भाषेचा गाभा असल्यामुळे शब्दांना उपसर्ग किंवा प्रत्यय लागणे, ही क्रिया येथे संभवत नाही. त्यामुळे शब्दांचे नाम, क्रियापद इ. प्रकारचे वर्गीकरण करणे शक्य नाही म्हणून शब्दांचे वर्ग, कार्य इ. त्यांच्याबरोबर येणाऱ्या शब्दांच्या मदतीने समजून घेतले पाहिजेत. या सहायक शब्दांवरच व्याकरणाचे कार्य अवलंबून असते. म्हणजे शब्दांचे कार्य आणि त्यांचा वाक्यातील क्रम हे वाक्यरचनेचे मुख्य तत्त्व आहे.
शब्दसंग्रह : पाली भाषेच्या प्रभावामुळे अनेक संस्कृतोद्भव शब्द थाईत आढळतात. शास्त्रीय विषय, शिष्ट भाषा यांत त्यांचा भरणा अधिक आहे: बिदा ‘पिता’ मांदा ‘माता’ सामी ‘नवरा (स्वामी) ख्रू ‘गुरू’ बुद ‘पुत्र’ रोग ‘रोग’ महाविद्थया ‘विद्यापीठ’.
अलीकडच्या काळात चिनी भाषेचाही फार मोठा प्रभाव पडला आहे.
काही शब्द: संख्यावाचक – १ नॅुङ्, २ सॉङ्, ३ साम्, ४ सी, ५ हा, ६ होग्, ७ चेद्, ८ पॅद, ९ कव्न, १० सिब्. या शब्दांच्या आधी थी हा क्रमवाचक सहायक शब्द जोडला, की क्रमवाचक विशेषण तयार होते: थी नॅुङ् ‘पहिला’ इत्यादी.
फू चाय् ‘पुरुष’ फू यिङ् ‘स्त्री’ चाय् सोद् ‘अविवाहित पुरुष’ यिङ् सोद् ‘अविवाहित स्त्री’ माय् ‘लाकूड’ तोन् माय् ‘झाड’ तोन् कूलाब् ‘गुलाबाचे झुडुप’.
साहित्य : थाई आज ज्या क्षेत्रात बोलली जाते. तिथे आल्याला तिला फार तर हजार वर्षे झाली असतील. थाईचा सर्वांत प्राचीन लिखित अवशेष शके १२१४ चा (इ. स. १२९२–९३) आहे. यानंतर शेकडो थाई व पाली अवशेष उपलब्ध झालेले असल्यामुळे भाषेच्या अभ्यासकाला तिचा इतिहास समजून घेणे सोपे आहे.
अतिपूर्वेच्या इतर साहित्यांप्रमाणे थाई साहित्यातही भावकाव्य भरपूर आहे. हे काव्य वृत्तरचनेच्या कडक नियमांना अनुसरून लिहिलेले आहे. भावकाव्याव्यतिरिक्त थाईत ‘निरत’ नावाचा एक काव्यप्रकार असून त्यात कवी स्वतःची साहसी कृत्ये, प्रवास इत्यादींचे वर्णन करतो. आपल्याकडील महाकाव्याप्रमाणे ही काव्ये बरीच मोठी असतात. मात्र त्यांतील घटना कधी खऱ्या, तर कधी पूर्णपणे काल्पनिक असतात.
पद्यसाहित्यापेक्षा थाईचे गद्यसाहित्य अधिक आहे पण विषय किंवा शैली यांच्या दृष्टीने वाचकाच्या मनाची पकड घेण्यासारखे त्यात फारसे काही नाही. धर्मशास्त्र, राजसभेतील आचार इत्यादीसंबंधीची ग्रंथरचना भरपूर असली, तरी इतिहासाची साधने दुर्मिळ आहेत. ॲनल्स ऑफ द नॉर्थ, ॲनल्स ऑफ आयुथिआ आणि बुक ऑफ द फोर किंग्ज ऑफ द प्रेझंट डिनॅस्टी (१८८१) हे ऐतिहासिक साहित्य त्यांच्या आधारे लिहिले गेले आहे.
मुखपरंपरेने अनेक भूतकालीन घटना जपून ठेवण्यात आल्या आहेत व त्यांवर असंख्य नाटके रचली गेली आहेत. त्यांतील बरीचशी मुळात भारतीय असून बुद्धाचे चरित्र व त्याच्या जीवनातील प्रसंग यांवरही बरीच आहेत. एक महत्त्वाचे नाटक नोक् खुम् हे असून, त्यात हंसाच्या अंड्यातून झालेली मानवाच्या उत्पत्तीची कथा आहे. रामायणातील प्रसंगावर आधारलेली रामकिएन् ही साहित्यकृतीही लक्षणीय आहे. अन्य काही साहित्य नीतिविषयक असून, त्यात सुभाषिते व तत्त्वज्ञानपर विचार आहेत. सर्वांत महत्त्वाचे उपदेशपर लेखन म्हणजे फ्रा रूआङ् यांची सुभाषिते होत. ज्योतिषविषयक ग्रंथांनाही या भागात महत्त्व आहे. त्याचप्रमाणे वैद्यक व मंत्रविद्या याही विषयांवर काही लेखन आहे.
संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.
2. Haas, Mary R. Subhanka, Heng R. Spoken Thai, New York, 1945.
3. Lanyon–Origill, Peter A. An Introduction to the Thai (Siamese) Language for European Students, Victoria (Canada), 1955.
“