त्रिमूर्ति : तीन देवतांच्या संयुक्त प्रतीकात्मक आविष्कारास ही संज्ञा लावली जाते. हिंदू व बौद्ध धर्मांत ही त्रिमूर्तिकल्पना आढळते. ख्रिस्ती धर्मातील ⇨ट्रिनिटीची कल्पना मात्र या त्रिमूर्तिकल्पनेहून भिन्न आहे. ट्रिनिटीच्या कल्पनेत पिता, पुत्र व होली स्पिरिट (घोस्ट) मिळून एकच देव मानला आहे. बौद्ध धर्मातील महायान पंथात मंजुश्री, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांची त्रिमूर्ती मानलेली आहे.

त्रिमूर्तिकल्पनेचे बीज वेदांतही आढळते. ऋग्वेदांत सवितृ (सूर्य), इंद्र व अग्नी किंवा सूर्य, वायू व अग्नी या तीन देवतांचा मिळून एक त्रिक असल्याचे उल्लेख आढळतात. त्रिगुणांच्या अनुरोधाने त्रिमूर्तिकल्पनेचा विचार मैत्रायणी उपनिषदात (५·२) झालेला आहे. प्रजापतीचा रजोगुणी अंश तो ब्रह्मा, तमोगुणी अंश तो रुद्र व सत्त्वगुणी अंश तो विष्णू असल्याचे तेथे म्हटले आहे. महाभारतात (वनपर्व २७२·४६) ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही प्रजापतीची उत्पादक, संरक्षक व संहारक रूपे असल्याचा निर्देश आहे.

ही त्रिमूर्तिकल्पना विविध पुराणांनी आणि शैव, वैष्णवादी संप्रदायांनीही उचलून धरली व तिचा विकास केला. आपापल्या संप्रदायानुसार त्यांनी ह्या त्रिमूर्तीतील एक देवता प्रमुख मानली आहे. उदा., शैवांनी शिवास व वैष्णवांनी विष्णूस प्रमुख मानले आहे.

दत्त संप्रदायानुसार दत्तात्रेयमूर्तीही त्रिमुखी असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे संयुक्त रूप आहे. ह्या तीन देवतांच्या भार्यांचीही, म्हणजे सरस्वती, लक्ष्मी व उमा यांची त्रिमूर्ती मानली जाते. त्रिमूर्तीतील तीन देवता या रज, सत्त्व व तम हे त्रिगुण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय या संकल्पनांची प्रतीके मानली जातात.

या प्रकारची शिल्पे भारतात, विशेषतः द. भारतात विपुल प्रमाणात आढळतात. एकपादमूर्ती या नावानेही या मूर्ती प्रसिद्ध आहेत. या मूर्तींसंबंधी व त्यांच्या प्रमाणासंबंधी प्राचीन शिल्पशास्त्रावरील ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते.

महाराष्ट्रात काही ठिकाणी त्रिमूर्ती आढळतात. त्यांपैकी घारापुरी व वेरूळ येथील लेण्यांतील मूर्ती जवळजवळ समकालीन असून विशेष प्रसिद्ध आहेत. घारापुरी येथील मूर्ती भव्य व उठावदार असून या मूर्तिसंबंधी तज्ञांत बरीच उलटसुलट मते आढळतात [⟶ घारापुरी].

वेरूळ येथे कैलास लेण्यात लेणे क्र. १६ आणि लेणे क्र. २३ मध्ये त्रिमूर्ती आढळतात. कैलास लेण्यातील लंकेश्वर मंदिरात डाव्या भिंतीवरील शिल्पपट्टातील त्रिमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून ती काहीशी घारापुरी लेण्यातील मूर्तीप्रमाणे आहे. येथे शिवाची प्रतिमा मध्यभागी असून त्याच्या उजव्या व डाव्या बाजूंस अनुक्रमे ब्रह्मा व विष्णू यांची मुखे आहेत. ब्रह्मदेवास चार हात असून त्याच्या डाव्या व उजव्या बाजूंस अनुक्रमे सावित्री व सरस्वती यांच्या उभ्या मूर्ती आहेत. सावित्रीच्या डाव्या हातात चवरी असून ब्रह्मदेवासह सर्वांनी विविध अलंकार घातलेले आहेत. शिव व विष्णू यांनाही प्रत्येकी चार हात असून त्यांनी आपापली आयुधे धारण केली आहेत. याशिवाय शिवाच्या डावीकडे नंदी व विष्णूच्या उजवीकडे एक चामरधारिणी उभी आहे. या शिल्पातील त्रिमूर्तीचे मुकुट आणि स्त्रियांची केशभूषा रेखीव आहे. ब्रह्मा, विष्णू व शिव यांचे भाव येथे स्पष्ट दिसतात. वेरूळच्या तेविसाव्या लेण्यातील त्रिमूर्ती छोट्या शिवमंदिराच्या मागील भिंतीवर खोदली असून तीत ब्रह्मा, विष्णू व महेश यांची तीन भिन्न रूपे स्पष्ट दिसतात तथापि ही मूर्ती ओबडधोबड आहे.

राजस्थानात चितोडगढ येथे एक त्रिमूर्ती सापडली. या मूर्तीत ब्रह्मा, विष्णू व महेश यांची तीन रूपे स्पष्ट दिसतात. यात डावीकडे ब्रह्मदेव, मध्ये विष्णू व उजवीकडे शिव असून ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मुखांवर शांत भाव दिसतो, तर शिवाचे एकूण स्वरूप उग्र आहे. तिन्ही मुखांच्या कपाळांवर मध्यभागी तिसरा डोळा दाखविला असून देवतांचे जटामुकुट व किरीटमुकुट रेखीव आहेत. तिन्ही देवतांनी आपापली आयुधे धारण केली असून डोळे विस्फारलेले आहेत मात्र सर्वांची तोंडे उघडी आहेत.


मध्यभागी शिवमूर्ती असलेले त्रिमूर्तिशिल्प, तिरुव्होट्टियूर.

दक्षिण भारतातील बहुतेक शिवमंदिरांतून त्रिमूर्ती आढळते. ती बहुधा स्तंभांवर कुठेतरी खोदलेली असते. यांपैकी तिरुव्होट्टियूर, जंबुकेश्वरम्‌ व नागलपूरम्‌ येथील मूर्ती सुंदर आहेत. तिरुव्होट्टियूर येथील शिल्पात शिव मध्यभागी समभंगमुद्रेत उभा असून त्याच्या कमरेच्या दोन्ही बाजूंना ब्रह्मा व विष्णू यांच्या मूर्ती बाहेर आलेल्या दर्शविल्या आहेत. दोन्ही मूर्तींना चार हात असून पुढील दोन हात अंजलिमुद्रेत आहेत, तर मागील दोन हातांत त्यांनी आपली आयुधे धारण केली आहेत. ब्रह्मदेवाची तीन मुखे या शिल्पात स्पष्ट दिसतात.तिन्ही मुखांवर शांत भाव दिसतात.

जंबुकेश्वरम् शिवमंदिरातील मूर्ती तिरुव्होट्टियूरच्या मूर्तीप्रमाणे असून तीत ब्रह्मा, शिव व विष्णू यांची वाहने अनुक्रमे हंस, नंदी आणि गरुड दर्शविलेली आहेत.

नागलपूरम्‌ येथील शिल्पात विष्णूची मूर्ती समभंगमुद्रेत मध्यभागी दाखविली असून डावीकडे व उजवीकडे अनुक्रमे ब्रह्मदेव आणि शिव यांच्या मूर्ती कमरेवरील भागातून बाहेर पडलेल्या दाखविलेल्या आहेत. वरील मूर्तीप्रमाणेच अंजलिमुद्रेत त्यांचे पुढील हात असून मागील हातांत त्यांनी आपापली आयुधे धारण केली आहेत. या मूर्ती विष्णूच्या मध्यवर्ती मूर्तीपासून दोन्ही बाजूंस अधिक झुकल्या आहेत. या दोन्ही शिल्पांत तिरुव्होट्टियूर येथील शिल्प अधिक उठावदार असून आकर्षक आहे.

गांधार प्रदेशातही एक त्रिमूर्तिशिल्प सापडले आहे. तथापि या मूर्तीबद्दल तज्ञांत एकमत नाही. नटेश अय्यर यांनी हे शिल्प ब्रह्मा, विष्णू व महेश यांची तीन रूपे दाखविते, असे मत मांडले असून शिवाची मध्यभागी असणारी मूर्ती नंदीस टेकून उभी आहे, असे वर्णन केले आहे. तथापि या मूर्तीतील नंदी व आयुधे स्पष्ट दिसत नसल्यामुळे तत्संबंधी निश्चित मत देणे कठीण आहे.

सुर्वे, भा. ग. देशपांडे, सु. र.