त्रिकोण : (ट्रायांग्युलम). उत्तर खगोलार्धातील एक लहानसा तारकासमूह. हा होरा २ व क्रांती ३०° उत्तरेच्या [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] आसपास आहे. याच्याभोवती ययाती, देवयानी, मीन व मेष हे तारकासमूह येतात. यात सर्व तारे लहानच आहेत पण २–३ प्रतीच्या [⟶ प्रत] आल्फा, बीटा व गॅमा या तीन प्रमुख ताऱ्यांची एक काटकोनाकृती यात दिसते. यात युग्मतारेही आहेत. याच्या पश्चिम कडेला एम ३३ ही एक सर्पिल दीर्घिका आहे. [⟶ दीर्घिका]. पृथ्वीपासून ती ७·२ लक्ष प्रकाशवर्षे दूर असून लहानशा उत्तम द्विनेत्री दूरदर्शकामधून दिसू शकते. हा तारकासमूह ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी याम्योत्तर वृत्तावर येतो.

ठाकूर, अ. ना.