त्यूर्गो, आन रोबेअर झाक : (१० मे १७२७–१८ मार्च १७८१). सुविख्यात फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि विचारवंत. पॅरिस येथे नॉर्मन कुटुंबात जन्म. त्यूर्गोचे वडील मीशेल एत्येन (१६९०–१७५१) हे पॅरिस नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते (१७२०–४०). विद्यार्थिदशेतच त्यूर्गोची कुशाग्र बुद्धिमत्ता दिसून आली. त्यूर्गो हा विज्ञानदृष्टी, उदारमतवाद आदी तत्कालीन पुरोगामी विचारधारांनी प्रभावित झाल्याने धर्मशिक्षण घेऊनही त्याने धर्माधिकारदीक्षा घेतली नाही.

आन रोबेअर झाक त्यूर्गो

त्यूर्गो १७५२ च्या आरंभी उपसॉलिसिटर जनरल झाला आणि वर्षअखेरीस सर्वोच्च न्यायालयाचा समुपदेष्टा दंडाधिकारी (कौन्सेलर मॅजिस्ट्रेट) बनला.१७५३ मध्ये त्याने जोसाया टकरच्या रिफ्लेक्शन्स ऑन द एक्स्‌पीडिअन्सी ऑफ ए नॅचरलायझेशन ऑफ फॉरिन प्रॉटेस्टंट्स (१७५२) या ग्रंथाचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले तर पुढच्याच वर्षी Lettres sur la tolerance हे प्रबंधवजा पुस्तक लिहिले. झां क्लोद मारी गूर्ने या प्रकृतिवादी अर्थशास्त्रज्ञाबरोबर त्यूर्गोने १७५३–५६ या काळात फ्रान्समधील विविध प्रांतांत भ्रमंती केली. पंधराव्या लुईने १७६१ मध्ये त्यूर्गोला लीमोझ या फ्रान्समधील अतिशय मागास व विपन्नावस्थेतील प्रांताचा प्रमुख प्रशासक नेमले. १७६६ मध्ये त्यूर्गोने रिफ्लेक्शन्स ऑन द फॉर्मेशन अँड डिस्ट्रिब्यूशन ऑफ वेल्थ हा आपला सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रसिद्ध केला. १७७६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स ह्या सुविख्यात ग्रंथामधील अनेक संकल्पना त्यूर्गोच्या वरील ग्रंथात आढळतात. ॲडम स्मिथ व त्यूर्गो यांची १७६५ मध्ये भेट झाली होती. १७७० मध्ये या ग्रंथाला त्याने लेटर्स ऑन द फ्रीडम ऑफ द ग्रेन ट्रेड हा प्रबंध जोडला. लीमोझ या बव्हंशी शेतीप्रधान प्रांताची मोठ्या प्रमाणावर (सर्वांगीण) सुधारणा करण्याचे प्रयत्न त्यूर्गोने केले. समान करआकारणी, वेठबिगारीचे उच्चाटन आणि तीऐवजी अल्प कराची आकारणी, जमीन नोंदणीपुस्तकाची योजना इ. पद्धती त्याने सुरू केल्या. १७७०–७१ मधील दुष्काळात खुली धान्यवाहतूक योजना त्याने राबविली. बेकारांकरिता कर्मशाळा उभारल्या आणि त्यासाठी जमीनदारांकडून सक्तीने पैसा वसूल केला.

त्यूर्गोची जुलै १७७४ मध्ये नौदलाचा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढच्या महिन्यात सोळाव्या लुईने त्याला वित्तव्यवस्थेचा महानियंत्रक (वस्तुतः मुख्यमंत्री) म्हणून नेमले. त्यूर्गोने प्रथमतः शासकीय कारभारामधील निरुपयोगी व जादा पदे रद्द केली आणि राजदरबारी खुशामत्यांचे तनखे रद्द केले. त्यूर्गोने फ्रान्समधील आंतरराज्य धान्यव्यापार खुला केला (१७७४). दुर्दैवाने त्याच वर्षी पीक अतिशय वाईट आले होते आणि अन्नासाठी (पावासाठी) देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या व त्या सैन्यबळावरच मोडाव्या लागल्या. ही गोष्ट म्हणजे त्यूर्गोने पुढे १७७६ मध्ये काढलेल्या सहा राजाज्ञांची (सिक्स एडिक्ट्‌स) दुर्दैवी नांदीच समजली पाहिजे. त्यांपैकी चार आज्ञा (हुकूम) (काही देणी व पदे रद्द करण्याविषयीचे) विशेष लक्षणीय नव्हत्या. उर्वरित दोन मात्र क्रांतिकारी ठरल्या. पहिलीच्या योगे (वेठबिगारी पद्धत रद्द करून जमीनदारांवर कर बसविणे) सबंध देशभर रस्तेबांधणीच्या कार्यक्रमाच्या गतीला तर खीळ बसलीच, त्याशिवाय आतापर्यंत करमुक्त अशा सरदार–दरकदारांवर कररूपाने आर्थिक ओझे पडू लागले. दुसऱ्या राजाज्ञेमुळे देशातील श्रेणीसंघ रद्द करण्यात आले, त्यामुळे पूर्वीच्या मक्तेदारी संघटना नष्ट होण्याची वेळ आली आणि त्यांच्या जागी मुक्त अर्थव्यवस्था तत्त्व अंमलात आणले गेले. यांबरोबरच सरकारी अर्थकारणामध्ये अतिशय कडक व काटकसरीचे उपाय योजण्यात आले. साहजिकच धर्मोपदेश, सरदार–दरकदार, विशेषाधिकार वर्ग इत्यादींना वरील सहा राजाज्ञांच्या निमित्ताने त्यूर्गोविरोधी जोरदार प्रचार करण्यास मोठेच कारण सापडले. त्या सर्वांनी त्यूर्गोविरोधी कारस्थान शिजवून त्याची उचलबांगडी करण्याचा घाट घातला. या विरोधी गटांनी त्यूर्गोने सोळाव्या लुईस लिहिलेली बनावट पत्रे तयार करून त्यांमधून राजाविरुद्ध त्यूर्गोने बरीच अपमानास्पद मते व्यक्तविल्याचे दाखविले. सोळावा लुई तसा अननुभवी होता. प्रथम तो त्यूर्गोच्याच बाजूचा होता. ‘केवळ त्यूर्गो व मी असे दोघेच खरोखर लोकांवर प्रेम करतो’ असेही उद्‌गार एकदा त्याने त्यूर्गोबद्दल काढले होते. त्या लुई राजासही त्यूर्गोविरोधी मतांचा ताण असह्य झाला आणि मे १७७६ मध्ये लुईने त्यूर्गोला राजीनामा देण्याची विनंती केली. तरुण राजा सोळावा लुई याच्या सदसद्‌विवेकबुद्धीस व धैर्यास निष्फळ आवाहन करूनही, तसेच इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला आपले प्राण स्वतःच्या कमकुवतपणामुळे गमवावे लागले, असा इशारा राजाला देऊनही त्यूर्गोला पदच्युती पतकरावी लागली (१२ मे १७७६). आपल्या सुधारणांचा त्याग करण्यात आल्याचे तसेच त्या विस्मृतीच्या गर्तेतही गेल्याचे त्यूर्गोला पहावे लागले.

त्यूर्गोने फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी आटोकाट परिश्रम घेतले परंतु हितसंबंधीयांकडून त्याच्या कार्याला सुरुंग लावण्यात आला. त्याच्या कार्यामुळे १७८९ च्या राजकीय आणि सामाजिक क्रांतीला कदाचित वेगळे वळण लागले असते, कदाचित ती थोपविता आली असती, असे बोलले जाते. ॲगल्बर्ट सोरेल या लेखकाच्या मते त्यूर्गोचे फ्रान्सच्या राजकीय क्षितिजावरील अल्पकालीन अस्तित्व म्हणजे सुधारणांची आवश्यकता आणि राजेशाहीला त्या अंमलात आणण्यात आलेले अपयश या दोहोंचे प्रात्यक्षिकच होय. त्यूर्गोने काढलेल्या राजाज्ञांमागे निश्चितच तात्त्विक अधिष्ठान होते. त्याच्या या विचारप्रवाहाला व्यापारवादी अर्थशास्रज्ञ गूर्ने आणि प्रकृतिवादी अर्थशास्रज्ञ केने ह्यांनी वळण लावले होते. त्यूर्गोच्या मते श्रम व जमीन हे दोन्ही उत्पादक घटक होत त्याच्या विवेचनातून ‘श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांता’ ची बीजे आढळतात. म्हणूनच त्यूर्गो हा लॉकपासून मार्क्सपर्यंतच्या विचारशृंखलेतील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो, त्याचप्रमाणे विशेषतः पेटी, हचिसन आणि ह्यूम ह्यांच्या विचारसंक्रमणापासून ते ॲडम स्मिथच्या विचारापर्यंतच्या विवेचनप्रवाहात त्याची दखल घ्यावी लागते. आपल्या विविध निबंधात्मक लिखाणातून त्यूर्गोने अनिर्बंध अर्थनीती ही सर्व अरिष्टांवरील रामबाण उपाय असल्याबाबत जोरदार समर्थन केले. अनेक प्रकारच्या व्यावहारिक अनुभवांची मोठी शिदोरी पाठीशी असूनही त्याच्या ठायी शुद्ध तत्त्वनिष्ठाही होती. तरीही त्याने आपल्या तात्त्विक मतांची राजकीय शक्यता व मर्यादा यांच्याशी नेमस्त पद्धतीने व शांतचित्ताने सांगड घातली नाही. ज्या गोष्टी गेली कित्येक शतके वाढत होत्या (उदा., भ्रष्टाचार, स्वार्थलोलुपता इ.) त्या गोष्टी थोड्याच दिवसांत नष्ट करता येतील, या विश्वासातच त्यूर्गोच्या अपयशाची बीजे आढळतात. तो पॅरिस येथे वयाच्या चोपन्नाव्या वर्षी मरण पावला.

संदर्भ : Dakin, Douglas, Turgot and the Ancient Regime in France, New York, 1939.

गद्रे, वि. रा.