तुर्की साहित्य: सारबीरिया व मंगोलिया येथे सापडलेले व पौर्वात्य कोक तुर्की राजांच्या सन्मानार्थ लिहिलेले सातव्या–आठव्या शतकांतील शिलालेख हे तुर्की भाषेतील अगदी पुरातन अवशेष होत. त्यानंतरच्या काळातील लेखन उईगुर लिपीत केलेले दिसून येते.
मुहंमद काशगरीच्या दिवान–ओ–लुगात–इत–तुर्कमध्ये (१०७१) प्राचीन इस्लामपूर्व परंपरेतीलच पण प्रारंभीच्या इस्लामी कवितेचे नमुने आढळतात.
इस्लाम कालखंड : इस्लामचा स्वीकार केल्यानंतर तुर्कांनी अरबी आणि इराणी वाङ्मयीन परंपरांचा अंगीकार करण्यास सुरुवात केली. अकराव्या शतकानंतर वाङ्मयीन स्वरूपाचे लेखन होऊ लागले. युसुफ हाज हाजीब यांची कुतादगू बिलिग (१०६९) हे नीतिबोधपर काव्य पूर्व तुर्कस्तानातील वाङ्मयीन भाषेतील पहिले लेखन होय. याच काळातील अदीब अहमदचे अतबतुल हकायिक हे पद्यमय, बोधप्रद असे दुसरे पुस्तक होय. त्यानंतर तुर्की भाषेच्या ‘चगताई’, ‘अझेरी’ व ‘ओसमानली’ या तीन मुख्य शाखांत वाङ्मय निर्माण झाले.
चगताई वाङ्मय : तेराव्या शतकाच्या अखेरपासून मध्य आशियातील तुर्कांमध्ये विकसीत झालेली ही एक भाषा होय. खाकानिया तुर्की या भाषेवर ती आधारलेली आहे. हेरात आणि समरकंद ही तिची मुख्य केंद्रे होती. काही काळपर्यंत दिल्ली हे देखील एक केंद्र होते. अली शिर नेवाई (१४४१–१५०१) हा या भाषेचा प्रसिद्ध प्रतिनिधि होय. इराणी संस्कृती आणि भाषा यांच्या प्रभावकाळातदेखील तुर्की ही कोणत्याही दृष्टीने फार्सीपेक्षा गौण नाही, हे त्याने आपल्या मुहाकामतुल लुगतैन या ग्रंथात आग्रहाने सांगितले. खुसरौ, जामी आणि इतर फार्सी कवी यांच्या प्रभावाखाली जरी त्याने लेखन केले असले, तरी गझल व मस्नवी यांत स्वतःची मौलिकता दर्शविली. केवळ चगताई कवींमध्येच नव्हे, तर नेदीम आणि शेख गालिब यांच्यासारख्या ऑटोमन कवींमध्येही तो प्रिय व अनुकरणीय ठरला. चगताई भाषा भारतात काही काळापर्यंत भरभराटीस आली होती. सम्राट बाबरने (१४८३–१५३०) तुर्कीमध्ये कविता व बाबरनामा (इं. भा. मेम्वार्स ऑफ बाबर, २ खंड, १९२१-२२) या आठवणी लिहिल्या. त्यांचा डॉ. ह. रा. दिवेकरकृत बाबरची स्मृतिचित्रे (१९६६) हा मराठी सारंश प्रसिद्ध आहे.
बाबरचे उदाहरण दृष्टीपुढे ठेवून इतर मोगल राजे आणि अमीर यांनीही तुर्की भाषेत लेखन केले. बाबरचा पुत्र कामरान मिर्झा (सु. १५०८–१५५७) याचे दीवान प्रसिद्ध असून त्याची एक प्रत उत्तर प्रदेशातील रामपूरच्या ‘रझा राज्य ग्रंथालया’त व दुसरी बंकीपूर (पाटणा) येथील ‘खुदावक्ष ग्रंथालया’त जतन केली आहे. मध्य आशियातील अझीझी (मृ. १५४९) या कवीने कामरानचे अनुकरण करून काव्यनिर्मिती केली. बैरमखान (मृ.१५६१) याच्या तुर्की गझलांचा संग्रह दिल्लीच्या नगर वाचनालयात उपलब्ध आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यकाळातील काश्मीरचा राज्यकर्ता मिर्झा हैदर दुधलत (सु. १५००–१५५२) हादेखील तुर्की भाषेचा एक कवी होता. लघुव्याकरणे व शब्दकोशही भारतात निर्माण झाले. असा एक शब्दकोश अझफरी (मृ. १८१८) यांनी लखनौ येथे १७८९ ते १७९७ या काळात लिहिला असून तो मुंबई येथील कामा इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे. एकोणिसाव्या शतकात इन्शा (सु. १७५६–१८१७) याने आपली दैनंदिनी व काही थोड्या कविता तुर्की भाषेत लिहिल्या.
विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत मध्य आशियात चगताई भाषेत साहित्यग्रंथ निर्माण होत होते. १९१७ नंतरच्या रशियामधील नव्या राजवटीखाली चगताईचे स्थान उझबेक भाषेने घेतले.
आझरी वाङ्मय : आझरबैजानमधील तुर्की लोकांत आझरी भाषा विकसित होऊन सु. सहाशे वर्षांपर्यंत भरभराटीत होती. हसन ओघलू (तेरावे–चौदावे शतक) आणि काझी बुऱ्हानुद्दीन (चौदावे शतक) हे या भाषेचे सुरुवातीचे प्रतिनिधी होत. बुऱ्हानुद्दीनच्या दीवानमध्ये ‘तुयूग’ या खास तुर्की काव्यप्रकाराचा समावेश आहे. नेसिमी (मृ. १४०३) या ‘हुरूफी’ पंथाच्या कवीने आल्हाददायक गझले लिहिली असून चौदाव्या शतकातील तो सर्वश्रेष्ठ आझरी कवी मानला जातो. पंधराव्या शतकातील हबीबी हा अतिशय महत्त्वाचा कवी होय. शाह इस्माइल (१४८७–१५२४) या इराणच्या राजानेही आझरीमध्ये कवितालेखन केले. ⇨ फुजुली (१४९४–१५५६) या श्रेष्ठ तुर्की कवीने आझरीत लेखन केले. सोळाव्या शतकात दिल्ली दरबारातील सियानीसारख्या कवींनीही या भाषेत काव्यनिर्मिती केली असून, सतराव्या शतकातील प्रसिद्ध इंडो–इराणी कवी साइब (मृ. १६७२) याची या भाषेतील १७ गझले उपलब्ध आहेत.
चगताई व ऑटोमन तुर्की यांच्या तुलनेने आझरीमध्ये अधिक समृद्ध लोकसाहित्य आहे. सोळाव्या शतकातील मुहंमद बेग व मुहंमद नामी यांसारख्या लोककवींनी आझरी भाषेत लोकसाहित्य निर्माण केले. तत्पूर्वी चौदाव्या शतकात किताबे देदे कोरकुत हा अमर लोककथासंग्रह प्रसिद्ध झाला होता.
उस्मानली (ऑटोमन) वाङ्मय : सेल्जुक तुर्कांचे व विशेषेकरून ऑटोमन तुर्कांचे प्रदीर्घ व स्थिर राज्य असलेल्या आशिया मायनर मधील सध्याच्या तुर्कस्तानातील तुर्की भाषेची सर्वाधिक भरभराट झाली. याच देशात ‘ओगूझ’ बोली ऑटोमन तुर्कीच्या स्वरूपात इराणी प्रभावाखाली विकसित झाली. तिच्यात ‘दीवान एदेबियाती’ (दरबारी वाङ्मय) या नावाने ओळखले जाणारे अभिजात साहित्य निर्माण झाले. या काळात राजप्रासादच नव्हे तर ‘टेक्केलर’ नावाची धर्मपीठेही साहित्यनिर्मितीची केंद्रे बनली होती. त्याचबरोबर लोकसाहित्यही निर्माण होत राहिले.
तेराव्या शतकातील प्रसिद्ध सूफी कवी रूमी (१२०७–७३) व त्याचा मुलगा सुलतान वल्द (१२२६–१३१२) यांनीही तुर्कीमध्ये काव्यलेखन केले. शय्याद हामझाचे गूढकाव्यही याच काळातील होय. देह्हानी व ⇨ युनुस एमरे (१२३८–१३२०) हे चौदाव्या शतकातील दोन श्रेष्ठ कवी होत. देह्हानी अभिजात निधर्मी साहित्याचा प्रतिनिधी असून युनुस एमरे लोकभाषेत लेखन करणारा पण गूढवादी कवी होता. चौदाव्या शतकात इराणी संस्कृतीचे वर्चस्व असले, तरी जनसामान्यांची तुर्की भाषा ही फोनिया, कस्तमोनू, बुर्सा व इतर ठिकाणी समृद्ध होऊ लागली. काही तद्देशीय राजांना अरबी व फार्सीचे ज्ञान नसे. स्वाभाविकच त्यांनी तुर्की भाषेला उत्तेजन दिले. त्यामुळे बरेच अरबी व फार्सी साहित्य तुर्कीमध्ये अनुवादित झाले. गुलशेहरीने मनतिकुत तैर या फार्सी काव्याचा तुर्कीत अनुवाद केला (१३१७). एक अज्ञात तुर्की लेखकाने संस्कृतातील पंचतंत्राचे फार्सी भाषेतून तुर्कीत भाषांतर केले.
आशिकपाशाने (मृ. १३३३) रूमीच्या मस्नवीचे अनुकरण म्हणून गरीबनामा (१३२९) लिहिले. अहमदी (१३३४–१४१३) हा चौदाव्या शतकातील महान कवी होय. त्याच्या दीवानमध्ये ‘कसीदा’, ‘गझल’ यांसारखे महत्त्वाचे इराणी काव्यप्रकाराचे नमुने आढळतात. त्याने अलेक्झांडरवर इस्कंदरनामा (१३९०) नावाची एक मस्नवीही लिहिली. सुलेमान चेलेबी (मृ. १४२२), शेखी (मृ. १४२९), अहमदपाशा (मृ. १४९७) आणि नेजाती (मृ. १५०८) हे पंधराव्या शतकातील प्रमुख कवी होत. सुलेमान चेलेबीने लिहिलेले मेव्लिद् (मुहंमद पैगंबरांचा जन्म, १४०९) हे लोकप्रिय काव्य आहे. आजदेखील या काव्याने तुर्की मुसलमानांकडून आप्तेष्टांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भक्तिभावनेने वाचन केले जाते. इराणी काव्य त्याच्या सर्व काव्यपरंपरांसहित तुर्कीमध्ये आणणारा शेखी हाही एक अभिजात कवी होय. त्याच्या मस्नवींपैकी खरनामा हे तुर्की भाषेतील पहिले विडंबन काव्य होय. अहमदपाशा स्वतः उत्तम कवी असूनही त्याने शेखी, नवाई व इतर कवींच्या काव्याबरहुकूम काव्यरचना करून ख्याती मिळविली. याच काळात गद्यसाहित्यही विकसित झाले. ओरूच बेग व आशिक पाशा झादा यांनी ऐतिहासिक साहित्यनिर्मिती करून मोलाची कामगिरी केली. किर्क वझीर हिकायेलरी हे सोप्या तुर्की भाषेत लिहिलेले लोकप्रिय कथासाहित्य आहे. देली लुत्फी याचे विनोदी लिखाणही त्याच प्रकारचे आहे. सिनानपाशा (पंधरावे शतक) व तुरसुन बेग यांचे ललित गद्यही उल्लेखनीय आहे.
इराणी साहित्य व संस्कृती यांच्या प्रभावाने दिपून गेलेला सारी केमाल (पंधरावे शतक) हा आपल्या स्वतःच्याच तुर्की भाषेला हीन लेखू लागला. परंतु सोळाव्या शतकातील फुजुली, खयाली (मृ. १५५६), ⇨ बाकी (१५२६–१६००), रूही (मृ १६०५) यांसारख्या कवींनी तुर्की भाषेत पृथगात्म स्वरूपाचे अभिजात आणि सर्जनशील साहित्य निर्माण करून भावी पिढ्यांना आदर्श वाटेल, अशी श्रेष्ठता तुर्की भाषेला मिळवून दिली.
एकंदरीत ऑटोमन तुर्कीच्या इतिहासात सोळावे शतक दैदीप्यमान होते. याचा प्रत्यय नादमाधुर्य व अस्खलित प्रवाहित्व यांनी संपन्न असलेल्या बाकीसारख्या कवींच्या काव्यात दिसून येतो. एवढेच नव्हे, तर ‘सुलेमान द मॅग्निफिसेंट’ (मृ. १५६६) याच्यावर त्याने लिहिलेल्या शोकात्मक काव्यात उत्कट भावनांचा प्रभावी आविष्कार आढळतो. संपूर्ण ऑटोमन कालखंडात असाधारण असलेली संवेदनशीलता हे फुजुली याच्या कवितांचे, विशेषतः त्याच्या गझलांचे, एक वैशिष्ट्य होय. लौकिक आणि अलौकिक प्रेमविषयावरील त्याच्या कवितांतील मौलिकता महत्त्वाची आहे. हाफीझ (सु. १३२६–सु. १३९०) जसा फार्सीत तसा तुर्कीतही लोकप्रिय ठरला. लैला व मजनू या त्याच्या मस्नवीतील गुणवत्ता निजामी व खुसरौ यांच्या त्याच विषयावरील काव्याच्या तोडीची आहे, असे म्हणता येईल.
या कालखंडात अनेक भटके गायक–कवीही होऊन गेले. त्याचप्रमाणे गद्यसाहित्यातील अनेक वाङ्मयीन चळवळींनी हा कालखंड भरलेला असून हे सर्व गद्यवाङ्मय अतिशय फार्सीप्रचुर आणि कृत्रिम झाल्याचे दिसते. अगदी इतिहासकारदेखील आपले इतिहासाचे ज्ञान दाखविण्यासाठीच नव्हे, तर कलात्मक लेखनशैलीवर असलेल्या आपल्या प्रभुत्वाचे प्रदर्शन करण्यासाठीदेखील लेखन करू लागले. होजा सादेद्दीन इफेंदीचा (१५३६–९९) ताजुत व तवारीख (१५७८) हा इतिहासग्रंथ या प्रवृत्तीचा निदर्शक होय. इब्ने केमाल (मृ. १५३५) व जलाल झादा हेही याच प्रकारचे इतिहासकार होत. मुस्ताफा अली (मृ १६०६) याने लिहिलेला कुनहुल अखबार हा या काळातील सर्वांत महत्त्वाचा इतिहासग्रंथ असून त्या काळानुसार सोप्या समजल्या जाणाऱ्या भाषेत त्याचे लेखन झाले आहे. इस्लामी संस्कृतीच्या विकासाशी संबंधित असलेल्या तुर्कांच्या कामगिरीवर त्यात प्राधान्याने भर दिला असल्यामुळे हा इतिहास महत्त्वपूर्ण मानावा लागेल. त्याचे लेखन चार खंडात झाले असून लेखकाने त्याच्या लेखनासाठी अनेक पूर्वकालीन ग्रंथांचा आधार घेतला आहे. ऑटोमन इतिहासाव्यतिरिक्त त्यात मोगल व इस्लामी इतिहासही समाविष्ट आहे. आपल्या मनाकिबे हुनखराज या ग्रंथात त्याने सुलेखन कलावंत व पुस्तक बांधणीकार यांची चरित्रे दिली आहेत.
याच कालखंडात पिरी रईस व सीदी अली रईस यांनी लिहिलेली प्रवासवर्णने व भौगोलिक वर्णने आढळतात. साहित्याचा इतिहास सर्वप्रथम सेही बेग (मृ. १५८८) याने लिहिला. त्यानंतर अशा प्रकारचे लेखन करणारे अहदी, लतीफी व आशिक चेलेबी हे होत. तुर्कस्तानचा इराणशी सांस्कृतिक संबंध सतराव्या शतकात अबाधित होता. अमीर खुसरौ, फैजी व उरफी यांसारखे इंडो–इराणी कवीदेखील लोकप्रिय होते. सतराव्या शतकातील विख्यात कवी नेफी (१५८२–१६३५) याने इराणचा कवी अनवरीखेरीज फैजी व उरफी यांचेही अनुकरण केले. ‘कसीदा’ हा काव्यप्रकार त्याने ‘सबके हिंदी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैलीत लिहून या काव्यप्रकाराला तुर्की भाषेत सर्वोच्च स्थान मिळवून दिले. त्याच्यामध्ये प्रतिभा आणि शिवराळपणा यांचा विलक्षण संगम झाला होता. त्याच्या कसीदांमध्ये प्रतिभेचा व विडंबनकाव्यात ग्राम्यतेचा प्रत्यय येतो. त्याचे समकालीन यह्या (१५५२–१६४३) आणि अताई (मृ. १६३४) यांनी अनुक्रमे गझल व मस्नवी यांत मोलाची भर घातली. या काळातील लोकप्रिय गायक–कवींमध्ये कराजा ओघलान (सु. १६०६–७९) व आशिक उमर (मृ. १७०७) यांचा समावेश होतो.
गद्याच्या क्षेत्रात वैसी (१५६१–१६२८) व नर्गिसी (मृ. १६३४) प्रसिद्ध आहेत. कातिब चेलेबी (१६०८–५७), नइमा (१६५५–१७१६), कोचीबी व पेचेवी (१५७४–१६५०) हे सतराव्या शतकातील प्रसिद्ध इतिहासकार होत. अवलिया चेलेबी (१६११–८२) याच्या सियाहतनामात सामाजिक जीवनाचा इतिहास आढळतो.
अठराव्या शतकातील इस्तंबूलमधील सुखासीन जीवनाचे प्रसन्न चित्रण नेदीमच्या (१६८१–१७३०) गझलांमध्ये आढळते. याच काळात ‘लाला’ (ट्युलिप) फुलांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली असल्यामुळे तुर्कीमध्ये ‘लाले देवरी’ या नावाने हा काळ ओळखला जातो. नेदीमच्या काव्यात तत्कालीन प्रवृत्तींचे पूर्ण प्रतिबिंब पडलेले दिसते. त्याने एक कविता ‘तुर्कू’ या निखालस तुर्की काव्यप्रकारात लिहिली असून ‘शरकी’ नावाच्या दुसऱ्या एका खास तुर्की काव्यप्रकारातही त्याने काव्यरचना केली. शेवटचा थोर अभिजात कवी सेख गालिब (१७५७–९९) याने आपल्या स्वतंत्र शैलीत गझल लिहिले. हुस्न–ओ–इश्क ही त्याची मस्नवी स्वच्छंदतावादी गूढ काव्याचा सर्वोत्कृष्ट नमुना होय.
या काळातील तुर्की गद्य क्रमशः साधे वा निरलंकृत होत गेले. अनेक कवींचे चरित्रग्रंथ या काळात साध्या, सरळ शैलीत लिहिण्यात आले. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य साहित्यसिद्धांतांच्या प्रभावाखाली पारंपरिक ऑटोमन साहित्याचा क्रमशः लोप होऊन आधुनिक तुर्की साहित्य उदयास आले.
आधुनिक साहित्य : काव्य :आधुनिक तुर्की साहित्याच्या प्रवृत्ती यूरोपीय–विशेषतः फ्रेंच–प्रभावाशाली निर्माण झाल्या. परंपरागत साहित्यविषयांपासून तुर्की साहित्याला मुक्त करून शिनासी (१८२६–७१), झियापाशा (१८२५–८०) आणि नामिक केमाल (१८४०–८८) या साहित्यिकांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तुर्की साहित्यात आधुनिकता आणली, विसाव्या शतकातील आधुनिक साहित्यिकांच्या दुसऱ्या पिढीत एकरेम (१८४७–१९१४) व अब्दुल हक हमीद (१८५२–१९३७) यांचा अंतर्भाव होतो. अब्दुल हक हमीद हा रूढ छंदोबद्ध काव्यरचना टाळण्यासाठी उत्सुक होता, असे दिसते. भारतात काही काळ वास्तव्य केल्यामुळे जुहर–ए–हिंदी आणि हिंदुस्थानदकी ओदम ही काव्ये त्याने अनुक्रमे भारतीय स्त्रीसौंदर्य व निसर्गसौंदर्य या विषयांवर लिहिली आहेत. आपल्या मृत पत्नीवर लिहिलेली मकबर (१८८५) ही त्याची सर्वोत्कृष्ट काव्यरचना होय. एकरेम या कवीचादेखील मृत्यु हाच प्रमुख काव्यविषय होता. त्याच्या नेतृत्वाखाली ‘सरवते–फुनुन’ या नावाची एक साहित्यिक चळवळ सरवते–फुनुननामक एका वाङ्मयीन चळवळीतील ⇨ तेव्फीक फिकरत (१८६७–१९१५), जनाब शहाबुद्दीन (१८७०–१९३४) व जलाल साहिर (१८८३–१९३५) हे काही प्रमुख प्रातिनिधिक साहित्यिक होत. जनाब शहाबुद्दीनने ‘पार्नॅसिअन’ (कलावादी) या फ्रेंच कविगटाचे अनुकरण केले. जलाल साहिरच्या कविता विषादपूर्ण असूनही त्यांना त्यांचे स्वतःचे असे सौंदर्य आहे. तेव्फीक हा या गटातील सर्वश्रेष्ठ कवी होता. त्याने निधर्मीवादाचा पुरस्कार केला असला, तरी त्याचा समकालीन मुहंमद आकिफ (१८७३–१९३६) हा मात्र इस्लामचा पुरस्कार करणारा कवी होता. तो तुर्की राष्ट्रगीताचाही जनक होय. याच कालखंडात झिया गोकल्प (१८७५–१९२४) याने तुर्की राष्ट्रवादाची गाणी गायिली. सालिह झकी (१८९५–) हा काव्यांतर्गत ग्रीक पौराणिक निर्देशांकरिता विशेष प्रसिद्ध आहे. अहमद हाशिम (१८८५–१९२३) हा प्रतिकात्मकतेवर विलक्षण प्रभुत्व असलेला कवी होय. मुहंमद एमीन (१८६९–१९४४) आणि रिझा तेव्कीफ (१८६८–१९४९) यांनी लोकसाहित्याच्या अभिव्यक्तितंत्रात प्राविण्य मिळविले. याह्या केमाल (१८८४–१९५८) याने अक्षरगणवृत्तांऐवजी जुनी गझले आणि रूबाया यांच्या घाटात काव्य लिहिले. इतरी आणि शेरेफाबाद यांसारख्या काव्यांतून त्याने त्याच्या गेय शैलीमध्ये ऑटोनम साम्राज्याच्या वैभवाची गाणी गायिली.
तुर्की प्रजासत्ताकाच्या प्रस्थापनेनंतरच्या (१९२३) पुढील काळात जुन्या वृत्तरचनेच्या वापराला विलक्षण चालना मिळाली. ओरहान सैफी ओरहॉन (१८९०– ), फारूक नाफीज चाम्लीबेल (१८९८– ), एनीस बेहिच कोरयुरेक (१८९८–१९४९), हालित फेहरी ओझनसोय (१८९१– ) यांच्यासारख्या कवींचे अक्षरगणवृत्तांवर प्रभुत्व होते. या कवींपैकी नाफिज हा त्याच्या बिरओमुर बॉयले गेचती (१९३२) या संग्रहातील प्रगल्भ कवितांमुळे विशेष मान्यता पावला. त्याने नाट्यकाव्य व विनोदी कविताही लिहिल्या.
विसाव्या शतकाच्या प्रथमार्धातील मुहीब द्रानाज (१९०९– ), अहमद हमदी तानपिनार (१९०१–६१) व जाहीद सिदकी तारंजी (१९१०–५६) यांनी दर्जेदार आल्हाददायक कविता लिहिल्या. ⇨ नाझिम हिकमत रन (१९०२–६३) याने मुक्तकाव्याचा प्रारंभ करून साम्यवादाचा पुरस्कार केला. नेजीब फाजिल (१९०५– ) आणि बेहजेट नेजातिगिल (१९१६– ) त्यांच्या काव्यात त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा आविष्कार झाला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर कवींची एक नवीन पिढी निर्माण झाली. तीत बेदरी रहमी अय्युब ओगलू (१९१३– ), ओरहान वेली कानिक (१९१४–५०), ओकताय रिफत (१९१४– ) व जाहित कुलेबी (१९१७– ) यांचा समावेश होतो. बेदरी रहमी याने आपल्या काव्यात तुर्की बोलीचा वापर केला. ओरहान वेली याने मेलीह जेवदेत (१९१५– ) आणि ओकताय रिफत यांच्याबरोबर प्रसिद्ध केलेल्या गरीब (१९४१) या आपल्या काव्यसंग्रहाने वाङ्मयीन वर्तुळात खळबळ माजविली होती. या सर्वांनी सामाजिक समस्या हाताळल्या. याच कालखंडात सलाह बिरसेल (१९१९– ) याने नवीन शब्दकळेत विशेष गुणवत्ता प्रकट केली व फाजिल हुसनु दागलरजा (१९१४– ) याने वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगवृत्ती दाखविली. या शतकातील तो एकश्रेष्ठ कवी गणला जातो. त्याच्या काव्यात एक प्रकारची दुर्मिळ वाटणारी आल्हादकता व वैश्विक मानवी आवाहन आहे.
१९५५ पासून साधारणपणे नववाङ्मयीन प्रवृत्तींची सुरुवात झाली. इलहान बर्क (१९१६– ), अतिला इलहान (१९२५– ), तुरगुत उयर (१९२६– ), एदीब जानसेवर (१९२८– ) आणि जेमाल सुरैय्या (१९३१– ) यांनी जे काव्यलेखनाचे नमुने सादर केले, त्यावरून ‘कवितेला काही सांगावयाचे नसते, ती केवळ असते’, या तत्त्वावर त्यांची निष्ठा असल्याचे जाणवते.
गद्य : १८६०–६२ पासून शिनासीचे लेख नियतकालिकांतून येऊ लागले व त्यानंतर तुर्की गद्यसाहित्याला नवीन जोम प्राप्त झाला. शिनासी आणि त्याचे सहकारी झियापाशा व नामिक केमाल यांनी तुर्कीमध्ये कादंबरी व नाटक यांसारखे नवीन यूरोपीय साहित्यप्रकार आणले. तुर्कीमध्ये प्रथमपासूनच ‘कारागोझ’ नावाचा छायानाट्याचा एक प्रकार होता. त्याचप्रमाणे ‘ओर्ता ओयुनु’ नावाचा खुल्या रंगमंदिरात होणारा नाट्यप्रकारही रूढ होता. शिनासीने शायर एव्हलेन मेसी या नावाचे पहिले आधुनिक नाटक लोकभाषेत लिहिले.
नामिक केमालचे वतन हे पहिले क्रांतिकारक नाटक १८७३ मध्ये जेव्हा रंगभूमीवर आले, तेव्हा त्याने जनमानसात चैतन्य निर्माण केले. त्याचे दुसरे एक ऐतिहासिक नाटक जलालुद्दीन ख्वारझ्म शाह हे उर्दूमध्ये अनुवादित झाले आहे. अहमद वेफिक पाशाने (मृ १८९१) मोल्येर या फ्रेंच नाटककाराच्या नाटकांच्या धर्तीवर १८६९ मध्ये नाटके लिहिली. अलीबेगचे अय्यार हमजा (१८७१) हे नाटकही मोल्येरच्या त्याच प्रकारातील आहे. युसुफ कामिल पाशा याने तेलेमाक् (१८५९) ही तुर्कीतील पहिली कादंबरी त्याच नावाच्या फ्रेंच कादंबरीवरून अनुवादित केली. नामिकची इन्तिबाह ही साहित्यगुणांनी संपन्न असलेली पहिली कादंबरी होय.
एकरेम व अब्दुल हक हमीद यानंतरच्या पिढीच्या लेखकांनी विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात कादंबरी या साहित्यप्रकाराला समृद्ध केले. १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेली एकरेमची अरबा सेवदासी ही सामाजिक उपहासप्रधान कादंबरी उल्लेखनीय आहे. हमीदने एशबर (१८८०), नेसतेरेम (१८७६) व दुखतरे हिंदु (१८७५) यांसारखी नाटके लिहिली. त्यांपैकी एशबर व नेसतेरेम ही पद्यनाटके असून दुखतरे हिंदुमध्ये ब्रिटिशांनी भारतात केलेल्या छळवादाचे व अत्याचारांचे चित्रण आहे. त्याचे फिनतेन (१९१७) हे नाटक शेक्सपिअरच्या प्रभावाखाली लिहिले गेले. यूरोपीय शैलीत लोकप्रिय कादंबऱ्या लिहिणारा आद्य कादंबरीकार म्हणजे अहमद मिदहत एफेंदी (१८४४–१९१३) हा होय. अहमद मिदहतची शैली परिष्कृत करून तिला यूरोपातील कादंबरीच्या तोडीचा दर्जा देण्याचे काम ⇨ हालिद झिया (१८६५–१९४५) याने केले, हे त्याच्या माइ व सियाह (१८९७) व अशके मामनु (१९००) या दोन कादंबऱ्यांवरून दृष्टोत्पत्तीस येते. त्याने लघुकथाही लिहिल्या. फ्रेंच लेखक फ्लॉबेर व पॉल बूर्झे यांचा प्रभाव सूचित करणारे कलात्मक गद्यलेखन करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. नवीन राष्ट्रवादी लेखकांनी त्याच्या सरवते फुनुनवादी गटाविरुद्ध टीकात्मक लेखन केल्यामुळे त्याला आपल्या कादंबऱ्यांची भाषा साधी व सोपी करून त्या पुन्हा प्रकाशित कराव्या लागल्या. उमर सेयफेद्दीन (१८८४–१९२०) हा लेखक सुगम भाषेचा पुरस्कर्ता होता. देशाच्या गतेतिहासातून स्फूर्ती घेऊन राष्ट्रीयभावनेने परिप्लुत अशा लघुकथाही त्याने लिहिल्या आहेत.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील याकुब कदरी (१८८८– ), रफीक हालिद कराय (१८८८– ) आणि हालिदे एदिब (१८८३–१९६४) यांनी आपल्या कादंबऱ्यात ॲनातोलियामधील जीवनाचे चित्रण केले आहे. याकुब कदरीची गद्य शैली कलात्मक असून किरालिक कोनुक (१९२२), नूरबाबा (१९२२) व याबान (१९३२) ह्या त्याच्या कादंबऱ्या प्रसिद्ध होत. आपल्या याबान या प्रभावी कादंबरीत त्याने शिक्षित व अशिक्षित समाजात असलेल्या सांस्कृतिक अंतराचे दर्शन घडविले आहे. हालिदे एदिब या कादंबरीकर्त्रीने आपल्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांतून राष्ट्रवादी चळवळीचे चित्रण करून शिक्षित स्त्रियांचे प्रश्न हाताळले. दोनेर-आयना (१९५३) ही तिची कादंबरी चरित्रात्मक आहे. क्लाऊन अँड हिज डॉटर (१९३५) या नावाची एक इंग्रजी कादंबरीही तिने लिहिले. रेशाद नूरीने (१८९२–१९५६) उच्च दर्जाच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी द ऑटोबायग्राफी ऑफ अ टर्किश गर्ल (इं. भा. १९४९) व अक्षम गुनेशी द आफ्टरनून सन (इं. भा. १९५१) या त्याच्या दोन कादंबऱ्या इंग्रजीत उपलब्ध आहेत. कादंबरीप्रकाराचा विस्तार करणाऱ्यांमध्ये सबाहद्दीन अली (१९०७–४९) आणि सइत फाईक (१९०७–५४) हे प्रमुख होत. सइत फाईकची शैली काव्यात्मक असून त्याने तुर्की नवकथेची सुरुवात केली. त्याच्या कथासंग्रहामध्ये लुसुमसुझ आदम (१९४८), कुम्पानिया (१९५१), हवुजबाशी (१९५२) व अलेम दागिंदावर बिर यिलान हे उल्लेखनीय आहेत. हुसेन रेहमी (१८६४–१९४४) या लोकप्रिय कादंबरीकाराने आपले कादंबरीलेखन १९०८–२० या काळात केले. ए. एस्. हिसारने (१८८८–१९६३) आपल्या उल्लेखनीय कादंबऱ्या १९४०–५० या काळात लिहिल्या.
नव्या पिढीतील कादंबरीकारांमध्ये इलहान टारूस (१९०७– ), केमाल ताहिर (१९१०–), ओरहान केमाल (१९१४– ), समीम कोजगोझ (१९१६– ), जेंगीझ दागजी (१९२०– ), यशर केमाल (१९२२– ), तालिब अपायदीन (१९२६– ), फकीर बायकुर्त (१९२९– ), मेहमूद मकाल (१९३०– ) इ. उल्लेखनीय होत. समीमने कादंबऱ्यांप्रमाणेच लघुकथाही लिहिल्या. तालिब अपायदीन व फकीर बायकुर्त यांच्याप्रमाणेच समीमने ग्रामीण व छोट्या नगरातील जीवनाचे चित्रण केले आहे. ओरहान केमालची बेरकेतली तोप्र्कलर उझरेंदे (१९५४) व मेहमूद मकालची बिझिकोय (१९४८) या कादंबऱ्यांत ग्रामीण जीवन हाच प्रमुख विषय आहे. यशर केमालने इंजे मेहमूद (१९५६) या कादंबरीत जमीनदारांच्या अत्याचारांचे वास्तववादी चित्रण केले आहे. माणसांच्या परस्परसंबंधाबद्दलच्या सूक्ष्म अंतर्दृष्टीमुळे केमाल ताहिर हा आधुनिक कादंबरीकारांत श्रेष्ठ मानला जातो.
सबाहेद्दीन एय्युब ओगलू (१९०८– ) आणि सलाह बिरसेल (१९१९– ) हे श्रेष्ठ दर्जाचे आधुनिक निबंधकार आहेत. रूशेन एशरेफ (१८९२-) वार्ताहार म्हणून व नुरुल्ला अताच (१८९८–१९५७) साहित्यसमीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्जुमंद एकरेम (१९३८– ) विनोदी लेखकांमध्ये अग्रभागी असून त्याची ‘मेशहेदी’ ही विनोदी व्यक्तिरेखा विशेष प्रसिद्ध आहे. अझीझ नेसीम (१९१५– ) हा आधुनिक काळातील आणखी एक उत्कृष्ट विनोदी लेखक होय.
आधुनिक नाटककारांत नेजाती जुमाली, रेफीक एन्दुरन आणि हलदुम तानेर (१९१६– ) यांचा समावेश होतो. नेझीहे मेरीच (१९२५– ) ही आधुनिक काळातील प्रथितयश लेखिका होय.
संदर्भ : 1. Akyuz, K. Bati Tesirinde Turk Shiri Antologisi, Ankara, 1958.
2. Banarli, N. S. Resimli Turk Edebiyati Tarihi, Istanbul.
3. Gibb, E. J. W. History of Ottoman Poetry, 6 Vols., London, 1900–09.
4. Koprulu, F. Turk Edebiyati Tarihi, Istanbul, 1926.
नईमुद्दीन, सैय्यद
“