तिखॉनॉव्ह, न्यिकलाय : (४ डिसेंबर १८९६– ). आधुनिक रशियन लेखक. सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. व्यापारविषयक शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्याने कारकुनाची नोकरी केली. पुढे त्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला. त्यानंतर तो ‘रेड आर्मी’ मध्ये दाखल झाला व त्याने क्रांतीमध्ये तसेच यादवी युद्धात भाग घेतला. १९२० नंतर तो लेनिनग्राड येथे स्थायिक झाला व ‘सेरेपिअन ब्रदरहूड’ या लेखकसंघटनेचे त्याने सदस्यत्व स्वीकारले. ओर्दा (१९२२, इं. शी. द होर्ड) व ब्रागा (१९२३ इं. शी. कंट्री–बिअर) हे त्याचे सुरवातीचे काव्यसंग्रह. त्यांत त्याच्या क्रांतिविषयक अनुभूती तसेच यादवी युद्धातील वीरवृत्ती यांचा स्वच्छंदतावादी दृष्टीकोनातून आविष्कार केलेला आहे. आंतरराष्ट्रीयत्व व राष्ट्राराष्ट्रांतील मित्रत्वाचे संबंध हा त्याच्या साहित्यातून प्रामुख्याने आलेला विषय. त्याच्या काही प्रख्यात साहित्यकृती पुढीलप्रमाणे होत : कीरव स नामी (दीर्घकाव्य १९४१, इं. शी. कीरव इज विथ अस), लेनिनग्रादस्किये रासस्काजी (१९४२, इं. शी. स्टोरीज ऑफ लेनिनग्राड), ग्रुजीन्स्काया विस्ना (१९४८–४९, इं. शी. द जॉर्जियन स्प्रिंग), ना व्तरोम व्सिमीरस्कम कंग्रसे स्तरोन्निकव मीरा (१९५१, इं. शी. इन सेकंड यूनिर्वसल काँग्रेस ऑफ सपोर्टर्स ऑफ पीस) इत्यादी. त्याने कॉकेशस, मध्य आशिया, भारत, पाकिस्तान इ. ठिकाणी प्रवास केला. त्याचे प्रतिबिंब त्याच्या काव्यातून उमटले आहे. भारताविषयी प्रशंसेची भावना त्याच्या अनेक कवितांतून दिसून येते. तो जागतिक शांतता परिषदेचा स्थायी सदस्य आहे. त्याला शांततेचे लेनिन पारितोषिक लाभले (१९५७), तसेच अनेक शासकीय पारितोषिकेही लाभली (१९४२, १९४९ व १९५२). त्यांत साहित्यविषयक स्टालिन पारितोषिकाचाही अंतर्भाव आहे.
पांडे, म. प. (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)