तास्सो, तोरक्वातो : (११ मार्च १५४४–२५ एप्रिल १५९५). इटालियन महाकवी. बेरनार्दो तास्सो ह्या कवीचा पुत्र. सॉरेंतॉ येथे जन्मला. पॅड्युआ आणि बोलोन्या येथे कायदा, तत्त्वज्ञान व अलंकारशास्त्र ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला (१५६०–६५). पॅड्युआ येथे असतानाच त्याने रीनाल्दो (१५६२) हे आपले पहिले महाकाव्य रचिले. १५६५ मध्ये फेरारा येथे कार्डिनल लूईजी देस्ते ह्याच्याकडे त्यास नोकरी मिळाली. त्यानंतर काही वर्षांनी फेराराचा ड्यूक आल्फॉन्सो दुसरा ह्याच्या आश्रयास तो राहिला. ह्या ड्यूकच्या दरबारात त्याची काही वर्षे सुखाची गेली. तेथे असताना दरबाराच्या करमणुकीसाठी त्याने आमींता हे उत्कृष्ट गोपनाटक लिहिले (१५७३, प्रकाशन १५८०). त्यानंतर जेरूसालेमे लीबेराता (इ. शी. जेरूसलेम लिबरेटेड) हे आपले सर्वश्रेष्ठ महाकाव्य त्याने पूर्ण केले (१५७५). पहिल्या धर्मयुद्धात गॉडफ्री ऑफ बूयाँने जेरूसलेम कसे जिंकून घेतले हा ह्या महाकाव्याचा विषय. प्रकाशित करण्यापूर्वी तास्सोने ते काही जाणकार व्यक्तींना वाचावयास दिले. तथापि त्यांच्याकडून ह्या महाकाव्यावर झालेल्या कठोर टीकेमुळे तो खचून गेला. त्याला वेडाचे झटके येऊ लागले. १५७७ मध्ये त्याने एका नोकरावर चाकूने हल्ला केल्यामुळे त्याला कैद करण्यात आले, तथापि तेथून निसटून तो सॉरेंतॉ येथे आपल्या बहिणीकडे आला. १५७८ मध्ये तो फेरारास परतला. परंतु तेथून निघून त्याने इटलीत भ्रमंती आरंभिली. १५७९ मध्ये तो पुन्हा फेरारा येथे आला. तेथे त्यावेळी चालू असलेल्या ड्यूकच्या विवाहोत्सवात आपली दखल घेतली गेली नाही, असे जाणवल्यावरून त्याला पुन्हा वेडाचा झटका आला. परिणामतः त्याला अटक करून एका रुग्णालयात ठेवण्यात आले. तेथून १५८६ मध्ये त्याची सुटका झाली. ड्यूकची बहिण लेओनारा हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली, ही केवळ आख्यायिकाच. सुटकेनंतर तो पुन्हा इटलीत भटकत राहिला. सर्वत्र त्याला चांगली वागणूक मिळत राहिली. परंतु त्याचे मन सावरले नाही. ह्या काळात त्याने गालेआल्तो ही अपूर्ण राहिलेली शोकात्मिका तोरीस्मोंदो हे नवे नाव देऊन पूर्ण केली. ‘जेरूसलेम लिबरेटेड’ वर झालेल्या टीकेचे शल्य मनात होतेच, ती ध्यानात घेऊन हे महाकाव्य त्याने जेरूसालेमे कॉनक्विस्ताता ह्या नावाने पुन्हा लिहून काढले परंतु ते निःसत्त्व ठरले. १५९४ मध्ये तो रोमला आला. तेथे त्याचा भव्य सत्कार होणार होता, तथापि त्यापूर्वीच तो आजारी पडला आणि त्यात त्याचे निधन झाले. तास्सो हा त्याच्या विशिष्ट काळाचा बळी होता, असे म्हणता येईल. प्रबोधनकाळाचा अस्त आणि काउंटर रेफॉर्मेशनचा (ल्यूथरच्या धर्मसुधारणांना उत्तर देण्यासाठी कॅथलिकांनी आरंभिलेली धर्मसुधारणा) प्रकर्ष ह्यांच्या संधिकाळातील हा कवी. एकीकडे सर्जनशील प्रेरणांच्या उत्स्फूर्त आविष्काराची निकड आणि दुसरीकडे काटेकोर नियमांनी कला–वाङ्मयाचे नियंत्रण करू पाहणाऱ्या शक्ती ह्यांतून वाट काढण्याचा त्याने प्रयत्न केला. ‘जेरूसलेम लिबरेटेड’ ह्या त्याच्या महाकाव्यात ह्याचा प्रत्यय येतो. ख्रिस्ती धर्मयुद्ध हा त्याचा विषय असला, तरी त्याच्या हाताळणीत स्वच्छंदतावादी प्रवृत्ती स्पष्टपणे दिसून येतात. ॲरिस्टॉटलच्या नियमांचे काटेकोर पालन त्याने त्यात केले नाही, त्यात त्याने अनेक उपकथानके आणली आणि ती भावगेय (लिरिकल) पद्धतीने उभी केली. तास्सोच्या ह्या महाकाव्याबाबत तत्कालीन समीक्षकांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली असली, तरी इटलीच्या श्रेष्ठ महाकाव्यांत आज त्याची गणना होते.
तास्सोने सु. २,००० भावकविता लिहिल्या. आधुनिक कवितेची काही वैशिष्ट्ये त्यांत आजच्या समीक्षकांना आढळली आहेत. फ्रेंच प्रतीकवादाची पूर्वरूपे त्याच्या काही कवितात त्यांना प्रत्ययास आली आहेत. ह्या दिशेने त्याच्या कवितेचे पुनर्मूल्यांकन चालू आहे.
संदर्भ : 1. Boulting, William, Tasso and His Times, New York, 1907.
2. Brand, C. P. Torquato Tasso, New York, 1965.
कुलकर्णी, अ. र.