चिंतामणि, चिरावूरी यज्ञेश्वर : (११ एप्रिल १८८०– ? –१९४१). स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रागतिक पक्षाचे एक निष्ठावान कार्यकर्ते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, विशाखापट्टनम् (आंध्र प्रदेश) येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. शिक्षण विजयानगर येथे. महाविद्यालयात एफ्.वाय.च्या परीक्षेत नापास झाल्याने पुढील शिक्षणाला त्यांनी रामराम ठोकला. वयाच्या अठराव्या वर्षी वृत्तपत्र व्यवसायात प्रवेश. प्रथम काही वर्षे ते द इंडियन पीपल  या साप्ताहिकाचे संपादन करीत. पुढे ते द लीडर   या दैनिकामध्ये गेले आणि अल्पावधीतच त्याचे संपादक झाले (१९०९). तत्पूर्वीची काही वर्षे त्यांनी रा. ब. मुधोळकरांच्या नेतृत्वाखाली सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद व प्रदर्शने यांच्या कार्यात घालविली. द लीडरचे ते जवळजवळ अखेरपर्यंत संपादक होते. तथापि मधील काही वर्षे त्यांनी संयुक्त प्रांतातील विधिमंडळाचे सभासदस्व व मंत्रिपद (शिक्षण व उद्योग मंत्री) स्वीकारले (१९१६–२६). प्रागतिक पक्षाची भूमिका मांडण्याकरिता ते दोनदा इंग्लंडला गेले. लखनौच्या काँग्रेस-मुस्लिम लीग करारामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पुढे ते नॅशनल लिबरल फेडरेशनचे सचिव, उपाध्यक्ष व अध्यक्ष होते (१९२३–२९). ते पहिल्या गोलमेज परिषदेचेही सभासद होते. द लीडर  या दैनिकातून ते आपले विचार मांडीत.

त्यांच्या या वृत्तपत्रांतील बहुविध कार्यांमुळे त्यांना अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेचे अध्यक्षस्थान देण्यात आले (कलकत्ता, १९३५). याशिवाय बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ यांनी डॉक्टरेट ही बहुमानार्थ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांशी त्यांचे अनेक बाबतींत मतभेद असूनही ब्रिटिश सरकारने त्यांना निस्पृह व निःस्वार्थी सेवेबद्दल ‘सर’ हा किताब दिला. इंडियन पॉलिटिक्स सिन्स द म्युटिनी  (१९३७) या पुस्तकात त्यांनी आंध्र विद्यापीठात दिलेली व्याख्याने संगृहीत करण्यात आली आहेत. फिरोजशाह मेहतांची व्याख्याने आणि लेखही त्यांनी संपादित केले (१९०५).

देशपांडे, सु. र.