चांदबीबी : एका जुन्या चित्राची अंश-प्रतिकृती

चांदबीबी : (सु. १५४७ – ९९). निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री. ती हुसैन निजामशाहाची मुलगी. पहिल्या अली आदिलशाहाशी १५६४ साली तिचे लग्न झाले. तिने त्यास राज्यकारभारात बहुमोल मदत केली. प्रसंगी त्याच्याबरोबर ती युद्धाच्या आघाडीवरही जाई. १५८० साली पतीचा खून झाल्यावर त्याच्या इच्छेनुरूप गादीवर बसलेला तिचा पुतण्या इब्राहीम याचा राज्यकारभार तिने अत्यंत हुशारीने चालविला. ती स्वतः न्यायनिवाडा करी. १५८२ साली बंडखोर सरदार किश्वरखान याने तीस कैद करून साताऱ्याच्या किल्ल्यात ठेवले, पण तिच्या सैन्याने तिची सुटका केली. त्या काळात झालेली बंडे तिने मोडून काढली व आदिलशाहीचे संरक्षण केले. पुढे १५८४-८५ साली ती अहमदनगरला आली. राज्यात बंडाळी माजल्यामुळे कंटाळून ती परत विजापूरला गेली. मुरादच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्य नगरवर चालून आले त्यावेळी निजामी सरदारांनी तिला बोलाविले. बहादुरशाह निजामाचा पक्ष घेऊन मोगल सैन्याशी ती निकराने लढली. एका रात्रीत तिने किल्ल्याच्या पडलेल्या भिंतीची डागडुजी केली. मोगल सैन्य पराभूत केले. तिने दाखविलेल्या शौर्यामुळे तिला मुरादने ‘चांद सुलताना’ हा किताब दिला.

बहादूरशाहाला गादीवर बसवून त्याच्या वतीने ती राज्यकारभार पाहू लागली. तिने राज्यकारभारातील सुधारणांकडे लक्ष दिले. पूर्वीचा पराभव धुवून काढण्यासाठी १५९७ साली मोगल सैन्य पुन्हा अहमदनगरवर चालून आले. या वेळीही चांदबीबीने त्याची डाळ शिजू दिली नाही. १५९९ साली शाहजादा दानियालच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्याने पुन्हा एकदा अहमदनगरवर निकराने हल्ला चढविला. प्रसंग ओळखून तिने तडजोडीचा सल्ला दिला. हा मुत्सद्देगिरीचा सल्ला पसंत न पडल्याने तिचा तिच्याच लोकांकडून खून झाला. काही इतिहासकार तिने तेजाबच्या रांजणात उडी टाकून आत्महत्या केल्याचे सांगतात. तिच्या मृत्युमुळे निजामशाहीची फार मोठी हानी झाली.

तिला उर्दू व फार्सी या भाषा तर येतच पण कन्नड आणि मराठी या भाषांचेही तिला ज्ञान होते. संगीत व चित्रकला यांतही ती रस घेई. शौर्य, धैर्य, उदारता, प्रसंगावधान व कार्यक्षम राज्यकारभार या गुणांनी तिने इतिहास घडविला. आपत्काळी सासरच्या व माहेरच्या घराण्यांची अमूल्य सेवा तिने केली व त्यांच्या प्रतिष्ठेकरिता समर्पित जीवन ती जगली.

खोडवे, अच्युत