चलशिल्प : (मोबाइल). नेहमीच्या स्थिर स्वरूपाच्या शिल्पाकृतींहून वेगळ्या अशा या हलत्या-फिरत्या शिल्पाकृतींचा जनक अलेक्झांडर कॉल्डर (१८९८–   ) हा अमेरिकन शिल्पकार होय. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कलाक्षेत्रात जे नवे प्रयोग करण्यात आले, त्यांपैकी हा चलशिल्पांचा प्रयोग होय. धातू, लाकूड, प्लॅस्टिक, काच, पुठ्ठा यांसारख्या विविध माध्यमांच्या शिल्पाकृती तारेच्या साहाय्याने अधांतरी टांगण्यात येतात. या शिल्पाकृतींची मुक्त वायुलहरींनी होणारी खुल्या अवकाशातील हालचाल पूर्वनियोजित अशा ठराविक पद्धतीनेच होत असते. सामान्यतः चलशिल्पे छताला अडकविण्यात येतात तथापि पुष्कळदा एखाद्या टेकूवर वा बैठकीवर ती उभी करून हव्या त्या जागी ठेवता येतात. चलशिल्पांची विविध अंगे चलनक्षम राखण्यासाठी ती बारीक तारेने किंवा सुताने जोडलेली असतात. हवेच्या गतीनुसार ती फिरतात. चलशिल्पांची आकारिक विविधता व गुंतागुंतीची रूपरचना अबाधित राखून त्यांच्या हालचालींत तोल राखणे महत्त्वाचे असते. रंग, आकार व अवकाश या घटकांत कलात्मक संवाद साधणे आणि तो शिल्पाच्या आंदोलनकक्षेत टिकवून ठेवणे, हे चांगल्या चलशिल्पाचे वैशिष्ट्य होय. अलेक्झांडर कॉल्डर याने आपल्या अभिनव चलशिल्पांचे पहिले प्रदर्शन पॅरिस येथे १९३२ मध्ये भरविले. तेव्हापासून चलशिल्पे लोकप्रिय ठरली. गृहशोभनासाठी त्यांचा वापर केला जातो. विक्रीच्या वस्तू आकर्षक दिसाव्यात, म्हणूनही दुकानांतून त्यांचा उपयोग केला जातो. शालेय कलाशिक्षणात चलशिल्पांचे पाठ ठेवण्यात येतात. एक कलात्मक छंदविषय म्हणूनही चलशिल्प लोकप्रिय आहे.

संदर्भ : Lynch, John, How to Make Mobiles, New York, 1953.

जाधव, रा. ग.