चंद्रपूर जिल्हा : चांदा जिल्हा. क्षेत्रफळदृष्ट्या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा, विदर्भ विभागातील आणि राज्याचा पूर्व सरहद्दीवरील जिल्हा. १८° ४१’ उ. ते २०° ५०’ उ. आणि ७८° ४८’ पू. ते ८०° ५५’ पू. यांदरम्यान हा जिल्हा पसरला असून याचे क्षेत्रफळ २५,६४१ चौ.किमी. व लोकसंख्या १६,४०,१३७ (१९७१) आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस वर्धा आणि यवतमाळ हे जिल्हे, उत्तरेस वर्धा, नागपूर व भंडारा जिल्हे, पूर्वेस मध्य प्रदेश राज्य आणि दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य आहे. जिल्ह्याचे जास्तीत जास्त पूर्वपश्चिम अंतर १९२ किमी. व दक्षिणोत्तर अंतर २४० किमी. आहे. ब्रह्मपुरी, वरोडा, गडचिरोली, चंद्रपूर, राजुरा आणि सिरोंचा असे जिल्ह्याचे सहा तालुके असून महाराष्ट्राच्या ८·५३% क्षेत्रफळ व ३·२% लोकसंख्या या जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण चंद्रपूर आहे.
भूवर्णन : मागासलेला, जंगलव्याप्त व डोंगराळ अशी या जिल्ह्याची अद्याप प्रसिद्धी आहे. जिल्ह्याचा दक्षिण व पूर्व भाग बहुतेक डोंगराळ आहे. दक्षिणेला तिपागड, सिरोंचाजवळ सिरकोंडा, पूर्व घाटाचाच एक भाग असलेली गदुलगुट्टा पर्वतरांग व सुरजगड टेकड्या या महत्त्वाच्या पर्वतरांगा या भागात आहेत. सुरजगडच्या नैर्ऋत्येला इंद्रावती नदीजवळ भामरागड हा निसर्गरम्य डोंगर आहे. गदुलगुट्टामधील ९६७ मी. उंचीचे शिखर जिल्ह्यात सर्वोच्च आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगर हे सर्वसामान्यपणे कमी उंचीचे आहेत. वरोडा तालुक्याच्या उत्तरेकडे सरासरी १३७ मी. रांग असून त्याच्या दक्षिणेस मूल रांगा आहेत. चिमूरच्या पूर्वेला पारसगड नावाने ओळखली जाणारी पर्वतरांग आहे.
पर्वत आणि नद्यांची रचना यांमुळे जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या चार भाग पडतात : वर्धा नदीच्या पश्चिमेकडील कपाशीच्या काळ्या जमिनीचा मैदानी प्रदेश वर्धा आणि वैनगंगा नदीखोऱ्यांदरम्यानचा उंचसखल प्रदेश वैनगंगा नदीखोऱ्याचा प्रदेश आणि सिरोंचा व गडचिरोली तालुक्यांचा पूर्वेचा डोंगराळ प्रदेश. नदीखोऱ्यांची सुपीक तर डोंगराळ भागात निकृष्ट अशी जिल्ह्यातील जमीन असून लाळी-कन्हार, बार्शी-कन्हार, मोरंड, खुरडी, बर्डी, रेताडी किंवा भरडी, पांढरी आणि कछर अशा विविध स्थानिक नावांनी ती प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात विपुल खनिजसंपत्ती आहे. कोळसा व लोखंड ही या जिल्ह्यातील महत्त्वाची खनिजे होत. यांशिवाय येथे मँगॅनीज, अभ्रक, गेरू, चिनीमाती, चिकणमाती, चुनखडी इत्यादींचे साठे आहेत.
वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. वर्धा, प्राणहिता आणि गोदावरी नद्यांनी जिल्ह्याची संपूर्ण पश्चिम सीमा व्यापली आहे. वर्धा नदीला वैनगंगा व एराई नद्या मिळतात. त्यानंतर तिला प्राणहिता नाव मिळाले आहे. प्राणहिता पुढे सिरोंचाजवळ गोदावरीला मिळते. जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवर इंद्रावती गोदावरीस मिळते. वैनगंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, ती जिल्ह्याचे दोन विषम भाग करते. पश्चिमेच्या वरोडा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी व राजुरा या तालुक्यांचा सुपीक भाग आणि पूर्वेकडील गडचिरोली व सिरोंचा या तालुक्यांचा मागासलेला भाग. वैनगंगेला डाव्या बाजूने गाढवी, खोब्रागडी, कथणी (काठाणी) व पोटफोडी आणि उजव्या बाजूने अंधारी या महत्त्वाच्या नद्या मिळाल्या आहेत. यांशिवाय जिल्ह्यात अनेक छोट्या नद्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सु. ३,००० बारमाही तलाव व ८,००० हंगामी तलाव आणि तळी असून पाटबंधारे, मच्छीमार यांसाठी यांचा प्रामुख्याने उपयोग होतो.
महाराष्ट्रातील अतिशय विषम हवामानाचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची प्रसिद्धी आहे. मे-जून महिन्यांत येथील तपमान ४५° से. असते, तर डिसेंबरमध्ये ८° से. असते. मुख्यतः नैर्ऋत्य मान्सूनपासून जिल्ह्याला पाऊस मिळतो. गडचिरोली, सिरोंचा, ब्रह्मपूरी या तालुक्यांतील डोंगरांमुळे येथे सु. १५२ सेंमी. पाऊस पडतो, तर चंद्रपूर-राजुरा तालुक्यांत १३० सेंमी. व पश्चिमेकडे ११४ सेंमी. पाऊस पडतो.
महाराष्ट्रातील जंगलांपैकी २०% जंगल या जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा ५६% भाग जंगलयुक्त असून त्यापैकी ३१% राखीव आणि ५९% संरक्षित आहे. साग, बिजा, ऐन, धावडा, हळदू, कळंब, शिसवे, अंजन, सेमल, मोवई, सेलाई इ. महत्त्वाची झाडे या जंगलांतून आढळतात. दारूसाठी व खाण्याकरिता मोहाची फळे व फुले, विड्यासाठी तेंदूची पाने गोंदासाठी कडई व धावडा लाखेसाठी पळस कातासाठी खैर कातडी कमाविण्यासाठी हेरा, हिरडा, बेहडा कागदासाठी बांबू काड्यापेट्यांसाठी सेमल लाकडी खोक्यांसाठी मोवई व सेलाई इमारती लाकडांसाठी कळंब आणि मिरा अशी महत्त्वाची जंगलउत्पन्ने जिल्ह्यात होतात.
येथील निसर्गरम्य जंगलामुळेच शासनाने ताडोबा तलावाजवळ ११६ चौ.किमी.चे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य निर्माण केले असून, पर्यटकांना आवश्यक अशा सोई येथे केल्या आहेत.
पट्ट्यांचे वाघ, चित्ता, हरिण, अस्वल, नीलगाय, गवा, काळवीट, लांडगा, कोल्हा, तरस वगैरे वन्य पशू सरपटणारे प्राणी आणि अनेक प्रकारचे पक्षी जिल्ह्यात आढळतात. नद्या व सरोवरांत अनेक जातींचे मासे मिळतात.
आर्थिक स्थिती : शेती हा या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. येथील कामकरी लोकांपैकी ८o % लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत. १९७१–७२ मध्ये जिल्ह्यातील एकूण भौगलिक जमिनीपैकी ५६·३% जंगलांतील, ५·८% नापीक व शेतीस अयोग्य, ३·४% लागवडयोग्य पण पडीत, ६·२% कुरणांखाली, o·७% झाडे व बागायती यांखाली, १·८% लागवड नसलेली आणि २५·८% लागवडीखाली होती. लागवडीखालील जमिनीपैकी १६·८% ओलीताखाली होती. भात (धान), ज्वारी, तूर आणि कापूस ही खरीपातील प्रमुख पिके तर गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके होत. १९७२-७३ मध्ये एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ३४% भाताखाली, ३३%ज्वारीखाली व ५% गव्हाखाली होती. यांशिवाय जिल्ह्यात बाजरी, डाळी, ऊस, भुईमूग, तीळ, जवस, तंबाखू, मिरची, हळद इ. पिके होतात. १९७२ मध्ये जिल्ह्यात १o·७९ लक्ष गाईबैल १·३४ लक्ष म्हशी ४८,६०९ शेळ्या २·६४ लक्ष मेंढ्या आणि ८·३o लक्ष कोंबड्या होत्या.
शेतीखालोखाल जिल्ह्यात जंगलउद्योग महत्त्वाचा आहे. १९७२–७३ मध्ये जिल्ह्यात ६·१४ कोटी रुपयांचे जंगलउत्पन्न झाले. त्यापैकी २·४१ कोटी रुपयांचे कापीव लाकूड, ४९·८ लक्ष रुपयांचे जळण, २८·८ लक्ष रुपयांचे बांबू व १·६३ लक्ष रुपयांचे गवत होते.
घुगुस, तेलवासा, चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी या भागातील कोळशाच्या अनेक खाणींव्यतिरिक्त कागद, काच, मातीची भांडी आणि तेल तयार करणारे चार मोठे निर्मिती उद्योगधंदे जिल्ह्यात आहेत.१९७५ साली चंद्रपूरपासून पाच किमी. अंतरावर एक पोलाद कारखाना निघाला असून पाचव्या पंचवार्षिक योजनेत जिल्ह्यात दोन सिमेंट कारखाने निघणार आहेत. यांशिवाय कागद कारखानाही अपेक्षित आहे. १९७१ मध्ये जिल्ह्यात नोंदलेल्यांपैकी ४४ कारखाने चालू असून त्यांत दररोज सरासरी ५,३५७ लोक काम करीत होते. लाकूड कापणे, भात सडणे, पोहे तयार करणे, विड्या, कापूस पिंजणी व दाबणी, कौले, साबण, अभियांत्रिकी कामे, काच, लाकूडकाम, बांबूकाम, बर्फ, हातमाग कापड इत्यांदीचे अनेक छोटे उद्योग जिल्ह्यात चालतात. इमारती लाकूड, बांबू, तेंदूची पाने, लाख, गोंद, कोसा आणि हिरडा यांसारख्या जंगलमाल कोळसा, तांदूळ, अशुद्ध लोखंड, व्हर्जिनीया तंबाखू गळिताची धान्ये, कापूस, कडधान्ये, कातडी, कागद इ. वस्तू जिल्ह्यातून निर्यात होतात. बल्लारपूर ही देशातील इमारती लाकडाची अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे, तर आल्लापल्ली सागाचे लाकूड ब्रह्मी सागाखालोखाल महत्त्वाचे समजले जाते. आसरल्ली आणि अंकिसा येथून उत्तम प्रतीची व्हर्जिनिया तंबाखू परदेशी निर्यात केली जाते.
मद्रास-दिल्ली हा रुंदमापी रेल्वेमार्ग व चंद्रपूर–नागपूर व चंद्रपूर–गोंदिया हे अरुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. रुंदमापी लोहमार्गाची लांबी १९७३ मध्ये १४१ किमी. होती, तर अरुंदमापी रेल्वेची जिल्ह्यातील लांबी १५५ किमी. होती. जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय हमरस्ता जात नाही. जिल्ह्यात नगरपालिकांच्या हद्दीत १०९ किमी. व इतर २,५५३ किमी. रस्ते होते. यांपैकी फक्त २७२ किमी. सिमेंट काँक्रीटचे होते. जिल्ह्यात १९७३ मध्ये ३१,८६१ वाहने होती. त्यांपैकी १६,५९५ मोटारसायकली व स्कूटर, ७,६५७ मोटारी, २४१ टॅक्सी होत्या.१९७३ मध्ये २७५ टपालकचेऱ्या, २४ तारकचेऱ्या, ४८८ टपालपेट्या, १,२०६ दूरध्वनी व २०,१८८ रेडिओ परवाने होते.
लोक व समाजजीवन : १९६१–७१ या दशकात जिल्ह्याची लोकसंख्या ३२ टक्क्यांनी वाढली. १९७१ साली जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, घुगुस, वरोडा, देसाईगंज, राजुरा व साष्टी ही सात शहरे ५,००० वरील वस्तीची सोळा गावे आणि २,८४० वस्ती असलेली गावे होती. शहरी लोकसंख्या ११% व साक्षर २६·७७% होती. एकूण लोकसंख्येच्या ४०% कामगार व त्यांपैकी १८% शेती, १४% शेतमजुरी, १% जंगल, मच्छीमार, शिकार इ. ०·४% खाणी, १० % घरगुती उद्योग, ०·९४% इतर उद्योग. ०·४४% बांधकाम, ०·९८% व्यापार, ०·३६% दळणवळण आणि २·२४% इतर सेवा यांमध्ये गुंतलेले होते. लोकसंख्येपैकी ४·६९% अनुसूचित जाती व १४·११% अनुसूचित जमाती होत्या. अनुसूचित जमातींपैकी ५३·३% गडचिरोली तालुक्यात, ३२·१% सिरोंचा व १४·६% राजुरा तालुक्यात होते. आदिवासींपैकी गोंड ही प्रमुख जमात असून परधान, हलबा, कवार, माडिया आणि कोलाम या येथील महत्त्वाच्या जमाती होत. सरहद्दीवरील आदिवासींवर तेलुगूचा प्रभाव जाणवतो. या भागातच इतिहासकाळात प्रबळ ⇨गोंड सत्ता नांदत होती. त्यामुळेच गोंड लोक आणि त्यांच्या बोली इत्यादींच्या अभ्यासासाठी हा भाग महत्त्वाचा समजला जातो. बऱ्याच आदिवासींची राहणी अद्यापही मागासलेली असून फिरती शेती, शिकार, कंदमुळे इत्यादींवर त्यांची गुजराण चालते.
जिल्ह्यात १९७१ — ७२ मध्ये १,९६७ प्राथमिक शाळा आणि त्यांत १,५४,३०४ विद्यार्थी व ५,७७७ शिक्षक ३४१ माध्यमिक शाळांत ३९,९६४ विद्यार्थी व १,८५५ शिक्षक १२ उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था व त्यांत ६,९१० विद्यार्थी व २१५ शिक्षक होते. नवीन योजनांमध्ये आदिवासींचे शिक्षण व योजना यांवर भर दिला गेला आहे.
१९७२ साली जिल्ह्यात चार रुग्णालये, ८४ दवाखाने, ५५७ खाटा होत्या. कुटुंब नियोजन, कुष्टरोग निवारण, मलेरिया निवारण, हत्तीरोग प्रतिबंध, देवीरोग निर्मूलन यांसारख्या योजना आणि फिरते दवाखाने यांमुळे जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सांभाळले जाते.
प्रेक्षणीय स्थळे : निसर्गसुंदर अरण्ये, वनराजीने वेष्ठिलेले तलाव, वन्य श्वापदे, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले आदिवासी यांमुळे चंद्रपूर जिल्ह्याला आगळे महत्त्व आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान ताडोबा तलावाकाठी असून, त्यात अनेकविध वन्य श्वापदांचे निरीक्षण करता येते. चंद्रपूर-नागभीड रस्त्यावरील आसोलमेंढा, घोडाझरी यांसारखे विस्तीर्ण वनराजीने वेष्ठिलेले तलाव असून तीन राज्यांच्या सरहद्दींवर भामरागड, सोमनूर ही निसर्गसुंदर गिरिस्थाने आहेत. मुल-चार्मोशी मार्गावर मार्कंडा देव येथे हेमाडपंथी शिल्पातील कलाकुसरपूर्ण शिवाचे मंदिर आहे. चंद्रपूर व बल्लारपूर या गोंड राजांच्या राजधान्या असल्याने तेथील प्राचीन वास्तू प्रसिद्ध आहेत. चंद्रपूर जवळील भद्रावती हे जैनांचे तीर्थस्थान असून येथील प्राचीन इतिहास अद्याप पूर्ण उपलब्ध नाही. परंतु या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाबा आमटे यांनी सुरू केलेले वरोड्यापासून चार किमी. वरील आनंदवन हे महारोग्यांसाठी असलेले केंद्र होय.
शाह, र. रू.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..