डेव्हिस, विल्यम मॉरिस : (१२ फेब्रुवारी १८५० – ५ फेब्रुवारी १९३४). अमेरिकन भूगोलज्ञ व भूवैज्ञानिक. फिलाडेल्फिया येथे जन्म. १८७० साली हार्व्हर्ड विद्यापीठाची पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १८७३ पर्यंत अर्जेंटिनातील कॉर्दोव्हा येथील वेधशाळेत त्याने काम केले. पुढील चार वर्षे तो उत्तर पॅसिफिक सर्वेक्षण विभागात होता. १८७७ ते १९१२ या काळात त्याने हार्व्हर्ड विद्यापीठात प्राकृतिक भूगोल व भूविज्ञान या विषयांचे अध्यापन केले. त्यानंतर त्याचा अमेरिकेतील अनेक विद्यापीठांशी संबंध होता. १९०४ साली त्याच्याच प्रयत्नाने ‘असोसिएशन ऑफ अमेरिकन जीओग्राफर्स’ या संस्थेची स्थापना झाली. ‘कलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे १९३० ते १९३४ या काळात त्याने अध्यापन केले. 

हार्व्हर्डला असताना डेव्हिसने मुख्यतः प्राकृतिक भूगोल व भूगोलाचे अध्यापनतंत्र यांविषयी सु. ५०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. एलिमेंटरी मीटीऑरॉलॉजी (१८९४) हे त्याचे पाठ्यपुस्तक प्रसिद्ध आहे. १८८९ मध्ये नॅशनल जीऑग्राफिक मॅगझिनच्या पहिल्या अंकात त्याचा ‘पेनसिल्व्हेनियातील नद्या व दऱ्या’ हा निबंध प्रसिद्ध झाला. हळूहळू त्याने आपला ‘अपक्षरणचक्राचा सिद्धांत’ विकसित केला. त्यानुसार प्राकृतिक भूस्वरूपे ही दीर्घकालीन व सततच्या क्षरणामुळे निर्माण होत असतात. भूस्वरूपात क्रमाने होणारे बदल हे अशा क्षरणचक्राचे परिणाम होत. हे चक्र सध्याची भूदृश्ये व भूगर्भाचा इतिहास समजण्यासाठी आवश्यक आहे. डेव्हिसचा हा सिद्धांत महत्त्वाचा पण वादग्रस्त मानला जातो.

१९१२ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डेव्हिसने जास्तीत जास्त वेळ लेखन व क्षेत्र-अभ्यासाला देऊन प्रवाळ खडक व प्रवाळ द्वीपांचा सखोल अभ्यास केला. द कोरल रीफ प्रॉब्लेम (१९२९), फिजिकल जीऑग्राफी (१८९८), जीऑग्राफिकल एसेज (१९०९), द इलस्ट्रेटेड डिस्क्रिप्शन ऑफ लँडफार्म्स (१९१२) व ओरिजिन ऑफ लाइमस्टोन कॅव्हर्न्स (१९३०), ही त्याची उल्लेखनीय पुस्तके कॅलिफोर्नियातील पॅसाडीना येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : James, P. E. Jones, C. F. Eds. American Geography : Inventory and Prospect, New York, 1954.

जाधव, रा. ग.