डॉल्फिन : स्तनिवर्गाच्या सीटॅसिया गणातील डेल्फिनिडी कुलातील प्राणी आहेत. यांचे नातेवाईक जे देवमासे त्यांच्याशी तुलना करता डॉल्फिन हे मध्यम ते लहान आकारमानाचे असतात. डॉल्फिन उघड्या समुद्रात राहणारे आहेत, पण काही गोड्या पाण्यात (नद्या, सरोवरे वगैरे) राहणारेही आहेत. डॉल्फिनांच्या कित्येक जातींपैकी एक जाती जगातील सर्व समुद्रांत आढळणारी आहे हिला सामान्य डॉल्फिन म्हणतात.

सामान्य डॉल्फिन : याचे शास्त्रीय नाव डेल्फिनस डेल्फिस असे आहे. हा सर्व समुद्रांत सापडणारा असला, तरी उष्ण आणि समशीतोष्ण समुद्रांत तो विपुल असतो. क्वचित उत्तरेकडील थंड समुद्रातही तो आढळतो. हा एक देखणा प्राणी आहे.

याचे अंग सडपातळ असून डोक्यासकट शरीराची लांबी १·५ – २·५ मी. असते चोच १५ सेंमी. लांब व अणकुचीदार असते. एका खोल खोबणीने ती कपाळापासून स्पष्टपणे वेगळी झालेली असते. जबड्यांवर पुष्कळ दात असतात, कधीकधी प्रत्येक जबड्यावर ते शंभर असतात. फ्लिपर (वक्षावरील पर) सु. ०·३ मी. लांब असतात पृष्ठपक्षाची

आ. १. सामान्य डॉल्फिन

(पाठीवरील पराची) उंची सु. ०·६ मी. पुच्छपालींची रुंदी साधारणपणे ०·५ मी. व वजन ७५ किग्रॅ.पर्यंत असते. प्रत्येक डोळ्याभोवती काळे वलय असल्यामुळे त्याने चष्मा लावला आहे असे वाटते. डोळ्याभोवतालच्या वलयापासून एक काळा पट्टा निघून मुस्काटापर्यंत गेलेला असतो. वातछिद्र एकच असते. पाठीचा रंग तपकिरी अथवा काळा आणि पोटाचा पांढरा असतो. दोन्ही बाजूंवर करड्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांचे पट्टे असतात. हिंदी महासागरातील आणि मलेशियाच्या समुद्रातील सामान्य डॉल्फिनाची पाठ काळसर करड्या रंगाची आणि खालची बाजू फिक्कट करड्या रंगाची असते व बाजूंवर पट्टे नसतात.

शरीरातील उष्णतेचे नियमन करण्याकरिता देवमाशांप्रमाणेच यांच्या त्वचेखाली ‘ब्लबर’ चा (चरबी आणि तेल यांचा) जाड थर असतो.

यांची श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात. हे निरनिराळ्या प्रकारचे ऐकू येण्यासारखे आवाज काढतात त्यांचा एकमएकांशी दळणवळण ठेवण्याकरिता उपयोग होतो. हे प्राणी शीळदेखील घालू शकतात.

हे प्राणी सामान्यतः तासाला ४–६ नॉट वेगाने पोहत असतात, पण तासाला ३० नॉट वेगाने जाण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य असते. सामान्य डॉल्फिन बरेच खेळकर आहेत. जहाजांच्या भोवताली समुद्रात उड्या मारताना व बागडताना ते वारंवार दिसतात. यांचे थवे असतात व एका थव्यात शेकडो डॉल्फिन असतात. मासे आणि पाण्याच्या पृष्ठभागाजवळ जमावाने राहणारे सेफॅलोपॉड प्राणी हे यांचे भक्ष्य होय.

हिवाळ्याच्या मध्यापासून तो उन्हाळ्यापर्यंतच्या काळात पिल्ले जन्मतात. गर्भावधी सु. नऊ महिन्यांचा असतो. मादी दर खेपेला एकाच पिलाला जन्म देते. जन्मल्याबरोबर श्वासोच्छ्‌वासाकरिता पिलाला पाण्याच्या पृष्ठभागावर जावे लागते. मादी त्याला मदत करून पृष्ठभागावर घेऊन जाते. मादी एक तासाच्या अंतराने पिलाला पाण्याखालीच दूध पाजते. पिलू चोखून दूध पीत नाही, मादीच ते त्याच्या तोंडात सोडते. 

सामान्य डॉल्फिन कुत्र्यापेक्षाही जास्त बुद्धिमान आहे. त्याला शिकविले तर तो बऱ्याच गोष्टी शिकतो. हा प्राणी निरुपद्रवी असून काही तर माणसाशी मित्रत्वाने वागतात.

गंगा-डॉल्फिन : गोड्या पाण्यातील डॉल्फिन हल्ली दक्षिण आशियातील व दक्षिण अमेरिकेतील नद्यांत आढळतात. गंगा-डॉल्फिन हा गोड्या पाण्यातील डॉल्फिन भारतात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांत आणि त्यांच्या उपनद्यांत आढळतो. उत्तर भारतातील लोक याला ‘सूसू’ म्हणतात. हा प्राणी एक प्रकारचा सूसू असा आवाज करतो, त्यावरून हे नाव दिलेले आहे. याचे शास्त्रीय नाव प्लॅटानिस्टा गँजेटिका हे आहे. हा एक अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे.

याचे शरीर तुर्करूप असून डोक्यासकट त्याची लांबी सामान्यतः २–३ मी. असते तथापि ४ मी. लांबीची मादी आढळल्याची नोंद आहे. मादी नरापेक्षा मोठी असते. चोच दबलेली व १८–२१ सेंमी. लांब असते कपाळ चोचीच्या मागे सरळ उभे असते मान स्पष्टपणे संकोचित असते प्रत्येक जबड्यात ५४–६४ दात असतात खालच्या जबड्यात वरच्यापेक्षा थोडे जास्त असतात फ्लिपर साधारण तिकोनी असून त्यांची लांबी शरीराच्या लांबीच्या/असते डोळे वाटाण्याएवढे लहान असून त्यांत भिंग नसते वातछिद्र लांब चिरेसारखे असते पुच्छपाली आडव्या असून त्यांची रुंदी ४५ सेंमी. असते. पाठ शिशाच्या रंगाप्रमाणे (काळसर) किंवा काजळासारखी काळी असते आणि पोट काहीसे फिक्कट रंगाचे असते. वरच्या बाजूला शरीराच्या साधारणपणे मध्यावर एक मांसल कंगोरा असतो हा अल्पविकसित पृष्ठपक्ष होय.

यांचे जरी लहान लहान जमाव आढळत असले, तरी हे प्राणी संघचारी नाहीत. एका जमावात ३–१० प्राणी असतात. उन्हाळ्यात नदीच्या काही भागांतून नियमितपणे दिसून येणारी यांची अनुपस्थिती स्थलांतराची प्रवृत्ती दर्शविते या प्रवृत्तीला कारणीभूत होणाऱ्या गोष्टी अन्न, तापमान, पाण्याच्या खारटपणात होणारी वाढ या आहेत किंवा दुसऱ्या काही आहेत, हे अद्याप कळलेले नाही. 

आ. २. गंगा-डॉल्फिन (सूसू)

हे प्राणी दर दोन-तीन मिनिटांनी श्वासोच्छ्‌वासाकरिता पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. नदीच्या तळाशी असलेल्या चिखलात आपले मुस्कट (चोच) खुपसून त्यात असलेले कवचधारी प्राणी (क्रस्टेशियन) व मासे हे खातात. गढूळ पाण्यात राहत असल्यामुळे हे प्राणी जवळजवळ आंधळे झालेले असतात.

यांच्या प्रजोत्पदनाच्या सवयींविषयी फारशी माहिती मिळालेली नाही. मादी ८-९ महिन्यांच्या गर्भावधीनंतर एप्रिल ते जुलैच्या दरम्यान दर पाळीला एकाच (क्वचित दोन) पिलाला जन्म देते. नुकत्याच जन्मलेल्या पिलाचे वजन ७ किग्रॅ. पर्यंत असते.

या प्राण्यांना जाळ्यात पकडतात किंवा बरच्यांनी मारतात. यांचे मांस खातात. शरीरात मिळणारे तेल दिव्यासाठी वापरतात. या तेलाच्या अंगी औषधी गुणधर्म आहेत असे म्हणतात. संधिवातावर या तेलाचे मालीश करतात आणि शक्ती येण्याकरिता हे तोल पाठीला व कंबरेला चोळतात.

 कर्वे, ज. नी. कुलकर्णी, सतीश वि.