डॉल्टन योजना : एक आधुनिक अध्यापनपद्धती. शिक्षण क्षेत्रातील हेलेन पार्कहर्स्ट या एका अमेरिकन विदुषीने या पद्धतीचा प्रयोग केला. हा प्रयोग प्रथम अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स राज्यातील डॉल्टन या गावी एका माध्यमिक शाळेत करण्यात आला, म्हणून त्यास डॉल्टन योजना हे नाव प्राप्त झाले. पार्कहर्स्ट-पद्धती असेही त्यास म्हणतात. या पद्धतीची सांगोपांग चर्चा पार्कहर्स्ट हिने एज्युकेशन ऑन द डॉल्टन प्लॅन या पुस्तकात केली आहे. ती १९११–२० च्या दरम्यान मारीया माँटेसरीने चालविलेल्या एका शाळेत लीडर म्हणून काम करीत होती. त्या वेळी तिने या पद्धतीची पूर्वतयारी केली. म्हणून माँटेसरी पद्धतीची एक प्रगत पायरी, असा डॉल्टन योजनेचा उल्लेख अनेक शिक्षणतज्ञ करतात.
योजना मुख्यत्वे स्वातंत्र्य, सहकार्य़ व स्वयंशिक्षण या तीन तत्त्वांवर आधारलेली आहे. या योजनेत पूर्वीच्या पारंपरिक शिक्षणपद्धतीस महत्त्व नाही कारण पारंपरिक पद्धतीत विद्यार्थी हा वयोगटाप्रमाणे शिक्षण घेई. तीत मंदबुद्धी, मध्यमबुद्धी व कुशाग्रबुद्धी अशा सर्वांना एकच प्रकारचा अभ्यास असे. पण डॉल्टन योजनेत बौद्धिक चाचण्या व बुद्धिमापन यांच्या नवीन उपक्रमांमुळे मुलांच्या शारीरिक व बौद्धिक उणिवांचे अंतर विचारात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी केलेली असते आणि बुद्धीच्या तफावतीप्रमाणे व्यक्तिश: प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार केला जातो. यात पारंपरिक वर्गाऐवजी प्रयोगशाळा किंवा कृतिशाळा असतात. त्यांतील शिक्षिक विद्यार्थ्यांना सल्ला देतात, मार्गदर्शन करतात आणि अभ्यासानुकूल वातावरण निर्माण करून त्यांच्या कृतींचे निरीक्षण करतात. ठराविक बौद्धिक गटातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या बैठका होतात आणि भिन्न भिन्न विषयांवर चर्चा होते. प्रत्येक विद्यार्थी एखाद्या महिन्याभराच्या दीर्घ किंवा सप्ताहाच्या अल्प मुदतीच्या करारातील प्रश्नमालिका सोडवितो. हा करार म्हणजे एखाद्याला विशिष्ट प्रसंगाशी निगडित असणाऱ्या मार्गदर्शक प्रश्नांच्या मालिकेचे मासिक अभ्यास-पत्रक असते. प्रत्येक विद्यार्थी यथामती काम करतो व साजेशी प्रयोगशाळा निवडतो. अशा प्रसंगी तो शिक्षक व सहकारी विद्यार्थी यांच्याशी आवश्यकतेनुसार चर्चा-विनियम करतो तसेच पुस्तकांचा उपयोग करतो. हे करताना त्याच्या कृतीवर वा फिरण्यावर बंधन नसते. या करारातील अधिक प्रश्न हुशार मुले सोडवितात, तर मंदबुद्धीची मुले कमी प्रश्न हाताळतात. अर्थात बौद्धिक पात्रतेनुसार पुढील करार सोपविण्यात येतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार कामाची आखणी करण्याची मुभा असते. प्रसंगोपात्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, एवढेच काम शिक्षकांचे असते मात्र विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा तयार झाल्यावर तो तपासणे व तत्संबंधी चर्चा करणे हेही काम शिक्षक करतात. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत गुणांना व बौद्धिक कसोटीस वाव मिळतो आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणेने आपली जबाबदारी पार पाडतो, असा एकूण या योजनेमागे हेतू आहे.
ही योजना जरी प्रथम अमेरिकेत उगम पावली, तरी तिथे ती फारशी रुजली नाही मात्र काही फेरफार करून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड या देशांनी ती स्वीकारली. तिचे प्रयोग काही प्रमाणात पौर्वात्य देशांतही झाले. तथापि पूर्णतः ही योजना कुठेच फारशी स्थिरावली नाही. तिच्यात पुढे अनेक फेरबदल झाले. नवीन डॉल्टन योजना ज्या इंग्लंडमधील शाळांतून चालू आहे तिथे जुने वर्गशिक्षण आणि नवे वैयक्तिक स्वयंशिक्षण योग्य प्रमाणात संमिश्र झालेले आढळते.
घाणेकर, मु. मा.