डन, जॉन : (? १५७२–३१ मार्च १६३१). एक श्रेष्ठ इंग्रज कवी. लंडनमधील एका कॅथलिक कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले. ‘लिंकन्स इन’ ह्या संस्थेत त्याने कायद्याचा अभ्यास केला. कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट धर्मपंथांचा तौलनिक अभ्यास करून अँग्लिकन धर्मपंथांचा त्याने स्वीकार केला. काही काळ सर टॉमस एगरटन ह्या उच्च शासकीय अधिकाऱ्याचा चिटणीस म्हणून त्याने काम केले. तथापि एगरटनच्या नात्यातील ॲन पूर हिच्याशी गुप्तपणे प्रेमविवाह केल्यामुळे त्याला कारावास भोगावा लागला. १६१५ मध्ये तो धर्मोपदेशक झाला. १६२१ पासून सेंट पॉल कॅथीड्रलच्या डीनपदावर त्याने काम केले.
इंग्रजी काव्येतीहासातील मीमांसाक (मेटॅफिजिकल) काव्यसंप्रदायाचा डन हा प्रवर्तक मानला जातो. मानवाचे अधःपतन, विनाशी शरीर आणि ह्यांमधून वाट काढणारी धर्मश्रद्धा ह्यांसंबंधीच्या संकल्पना त्याच्या कवितेत आढळतात. धर्मशास्त्रात सांगितलेल्या विश्वरचनेचा विज्ञानाच्या सहाय्याने एक नवीन अर्थ सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. दैनंदिन अनुभवातून प्रेरित झालेल्या त्याच्या कवितांनाही एक वैश्विक संकल्पनांचा संदर्भव्यूह सहजगत्या प्राप्त होतो. विज्ञान, खगोलशास्त्र, धर्मशास्त्र ह्यांचे संदर्भ व प्रेम, परमेश्वर, मृत्यू ह्यांसारखे विषय ह्यांची वरवर चमत्कृतीपूर्ण वाटणारी पण बुद्धिनिष्ठ संगती त्याच्या कवितेत प्रत्ययास येते. त्याच्या कवितेचे हे संकुल स्वरूप पाहून सॅम्युएल जॉन्सनने ‘मेटॅफिजिकल’ हे विशेषण तिला लावले.
डनचे बरेच साहित्य त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. अठराव्या शतकातील वाचकांना तो क्लिष्ट, दुर्बोध वाटला. एकोणिसाव्या शतकापासून मात्र त्याने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विसाव्या शतकातील टी. एस्. एलियट आणि डब्ल्यू. बी. येट्स ह्यांनी डनच्या काव्याचे मार्मिक पुनर्मूल्यांकन करून त्याच्या काव्याचे महत्त्व स्पष्ट केले. डनने धर्मविषयक गद्यलेखनही केलेले आहे. विचारांची तर्कशुद्ध मांडणी त्यात आढळते. रोमन कॅथलिकांना चर्चनिष्ठेची शपथ घ्यावयास आवाहन करणारा स्यूडो-मार्टिन हा त्याचा गद्यग्रंथ १६१० मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याला ‘एम्.ए.’ ही सन्मान्य पदवी देऊन त्याचा गौरव केला. लंडन येथे तो निधन पावला. सर हर्बर्ट जे. सी. ग्रीअर्सन ह्यांनी त्याची कविता २ खंडांत संपादिली आहे (१९१२).
संदर्भ : 1. Coffin, C. M. John Donne and The New Philosophy, New York, 1937.