ठुमरी : अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. ठुमरी (ठुंबरी) या नावावरूनच तो नृत्याशी संबंधित असलेला एक संगीतप्रकार आहे, हे समजून येते. प्राचीन संगीतपरंपरेमध्ये नृत्यासहित अभिनय करून जे गीत म्हटले जात असे, त्यावरून ठुमरी हा गीतप्रकार पुढे शास्त्रीय संगीतात रूढ झाला, असे तज्ञांचे मत आहे. म्हणजे नामभेदाने का होईना ठुमरीची परंपरा थेट कालिदासाच्या काळापर्यंत नेता येते. ठुमरी हा गीतप्रकार अशा तऱ्हेने प्राचीन परंपरेतील असला, तरी ठुमरी या नावाने मात्र तो गेली दोनतीनशे वर्षे प्रचारात आहे. विशेषतः १८५०च्या सुमारास लखनौचा नवाब वाजीदअली शाह याच्या दरबारात या ठुमरीला विशेष स्थान मिळाले. सादिक अलिखाँ या दरबारी गायकाने जनसामान्यांमध्ये रूढ असलेल्या या गायनप्रकाराला वैशिष्ट्यपूर्ण घाट दिला, असे मानले जाते. साधारणतः तेव्हापासून रसिकांमध्ये हा प्रकार अतिशय लोकप्रिय ठरला आहे.
ठुमरी गायकीचे पाच वेगवेगळे ढंग आहेत. त्यांना लखनौ ढंग, पूरब अथवा बनारसी ढंग, पंजाबी ढंग, ख्याल अंगाची ठुमरी आणि राजस्थानी अंगाची ठुमरी असे म्हटले जाते. या प्रत्येक ढंगाचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. स्वर, लय व बोल यांच्या सारख्या वापराने भावनिर्मिती करणे, हे ठुमरीचे खास लक्षण मानले जाते. गेल्या शेदीडशे वर्षांत हे निरनिराळे ढंग गाऊन लोकप्रियता मिळवलेले अनेक कलावंत प्रसिद्ध आहेत. लखनौ ढंगाचे सनदपिया, कदरपिया, अख्तरपिया, बिंदादीन महाराज, ललनपिया इ. बनारसी ढंगाचे मौजुद्दीनखाँ, भैय्या गणपत राव, विद्याधरी देवी, सिद्धेश्वरी देवी, रसूलनबाई इ. पंजाबी ढंगाचे बडे गुलामअलीखाँ ख्याल ढंगाचे अब्दुल करीमखाँ आणि राजस्थानी ढंगाचे हनुमान प्रसाद हे गायक प्रसिद्ध आहेत. हे सर्व कलावंत त्या त्या ढंगाचे प्रतिनिधी मानले जातात. महाराष्ट्रात मल्लूबाई, बाई सुंदराबाई, सुरेशबाबू, वत्सलाबाई कुमठेकर, शोभा गुर्टू, माणिक वर्मा हे ठुमरी गायकीचे प्रतिनिधी मानता येतील.